फूड हंट :  घर का तडका! 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

बेकरी व टेक होम सेवा सुरू झाल्याने बाहेरचे घरचा तडका देऊन खाण्याकडं लोकांचा कल वाढला आहे.बेकरी किंवा दुकानांमधून कच्चा माल आणून आपल्या आवडीचे पदार्थ घरीच बनवत लोक बाहेर खाण्याची भूक घरातच भागवत आहेत.

कोरोनानंतरचे लॉकडाउन संपून काही प्रमाणात ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, हॉटेलमध्ये जाऊन खाणे अद्यापही दुरापास्तच आहे. बेकरी व टेक होम सेवा सुरू झाल्याने बाहेरचे घरचा तडका देऊन खाण्याकडं लोकांचा कल वाढला आहे. बेकरी किंवा दुकानांमधून कच्चा माल आणून आपल्या आवडीचे पदार्थ घरीच बनवत लोक बाहेर खाण्याची भूक घरातच भागवत आहेत. अशाच काही बेकरी कम होम मेड पदार्थांची ओळख... 

कच्छी दाबेली 
कच्छी दाबेली हा खरंतर रस्त्यावरच्या गाडीवर गरमागरम खायचा पदार्थ. ब्रेड तापलेल्या तव्यावर अमूलच्या बटरवर भाजताना येणारा आवाज आणि वास हाच या पदार्थाचा यूएसपी. मात्र, दाबेलीच्या गाड्या बंद असल्याने या पदार्थाची हौसही घरातच भागवली जाते आहे. बेकरीमध्ये ‘दाबेली ब्रेड’ मागणीनुसार मिळतात, त्याचबरोबर कच्छी दाबेली मसालाही मिळतो. बेकरीतला ब्रेड आणि मसाला आणल्यानंतर घरीच बटाटा उकडून तो मॅश करून त्यात दाबेली मसाला घालायचा. ब्रेडला खालून-वरून अमूल बटर लावायचे, त्यात मसाला घातलेला मॅश बटाटा लावायचा आणि तव्यावर छानपैकी सर्व बाजूंनी ब्रेड भाजायचा. पुरेसा गरम झाल्यावर त्यावर चीज किसून घालायचे. बटाट्याबरोबर तिखट शेंगदाणे, डाळिंबाचे दाणेही घालू शकता. घरातली अशी शुद्ध आणि सात्त्विक दाबेली मुलांबरोबरच मोठ्यांनाही खूप आवडते. 

पाणी-पुरी 
भारतीयांचा हा तुफान आवडता पदार्थ. आठवड्यातून एकदा आंबट-गोड-तिखट चवीची पाणीपुरी घशाखाली उतरली नाही तर चुकल्यासारखं वाटतं. आता पदार्थ घरी बनवून व ‘आरोग्यासाठी हेच उत्तम’ असं म्हणत घराघरांतून बनतो आहे. यासाठी बाजारातून तयार पुऱ्या आणता येतात किंवा पाकीटबंद कच्च्या पुऱ्या आणून घरी तळता येतात. हल्ली गोड पाणी, तिखट पाणी यांची पाकिटं कोणत्याही बेकरी अथवा सुपरशॉपीमध्ये मिळतात. त्याच्या जोडीला तुम्ही घरी रगडा बनवू शकता. बटाटा उकडून त्यात विविध मसाले घालू शकता, खारी बुंदी आणि कांदाही तयार ठेवू शकता. आपल्या आवडत्या चवीचं कॉम्बिनेशन करत हा पदार्थ आता घरातला ‘वीकेंड स्पेशल’ बनला आहे. 

पिझ्झा 
मल्टिनॅशनल कंपन्यांचा विविध स्वादांचा चटपटीत पिझ्झा लॉकडाउनच्या काळातही घरपोच मिळत होता. मात्र, संसर्गाच्या भीतीने लोक हा स्पेशल पदार्थ घरीच बनवत आहेत. बेकरी सुरू झाल्यानंतर पिझ्झा बेस सहज मिळू लागले आहेत. त्यावर घालण्यासाठी घरातच ढोबळी मिरची, ओनिअन, मश्रूम किंवा तुम्हाला हव्या त्या भाज्या शिजवून घ्यायच्या. बेसवर या भाज्या पसरवून त्यावर भरपूर चीज किसून घालायचे आणि तव्यावर किंवा ओव्हनमध्ये गरमागरम पिझ्झा तय्यार! हा पिझ्‍झा आपल्या देखरेखीखाली बनत असल्यानं तो खाताना भीतीही वाटत नाही आणि पैसे वाचल्याचं समाधानही मिळतं. 

या पदार्थांच्या जोडीला सॅण्डवीच, भेळ, ढोकळा, भडंग, हक्का नूडल्स, व्हेज व नॉनव्हेज मंचाव बॉल्स, मंचाव सूप अशा अनेक गोष्टी घरीच बनवल्या जात आहेत. लॉकडाउननं पदार्थांच्या बाबतीत आणलेली ‘आत्मनिर्भरता’ आरोग्य व खिशासाठी फायद्याचीच ठरते आहे... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about foodhunt