पिठलं भाकरी
पिठलं भाकरी

फूडहंट : मिलेनिअल्सना हवाय 'घर का खाना'!

कोरोनाच्या संसर्गामुळं देशभरात मार्च महिन्यात लॉकडाउन लागला आणि परिस्थिती झपाट्यानं बदलली. बहुतेकांचा प्रत्येक विकएंडला आउटिंग आणि त्यावेळी हॉटेलमध्ये खाणं हा सिलसिला थांबला. या परिस्थितीची सर्वांत मोठी झळ ‘मिलेनिअल्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजच्या तरुणाईला पोचली आणि त्यांना घरच्या खाण्याला पहिली पसंती देण्याशिवाय तरणोपायच राहिला नाही, असे देशभरात केलेल्या एका ऑनलाइन सर्वेक्षणातून पुढं आलं आहे. गंमत म्हणजे, मिलेनिअल्स काय खावं या बाबतीत आता घरातील ज्येष्ठांचा सल्ला घेत त्यांच्या मताला किंमत देऊ लागले आहेत!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खाद्यसंस्कृतीचा बदललेला ट्रेंड अभ्यासण्यासाठी ‘पुछो’ या संस्थेने भारतातील १८ ते ३५ या वयोगटातील शहरात राहणाऱ्या मिलेनिअल्सच्या दररोजच्या जेवणावर कोरोनानंतर काय परिणाम झाला आहे, याचा दोन महिने अभ्यास केला. यामध्ये १३ व्हिडिओ इंटरव्ह्यू, ५० ऑडिओ रेकॉर्डिंग, १३ लाइव्ह चॅट्स, ३८७ फोटोग्राफ व ६४ जणांची मते जाणून घेतली गेली. या अनिश्चित भविष्याच्या काळात मिलेनिअल्स काय खात आहेत, यावर घरातील ज्येष्ठांच्या मताचा मोठा प्रभाव दिसून आला. मिलेनिअल्सनी पार्सल आणणे किंवा बाहेर जाऊन जेवणावर स्वच्छतेचा व सोशल डिस्टंन्सिंगच्या शंकेवरून कायमच अविश्वास दाखवल्याचे सर्वेक्षणात आढळले. त्यामुळंच त्यांनी लॉकडाउनच्या काळात घरातील पदार्थांनाच पहिली पसंती दिली.

घरात जेवण बनवण्यासाठी लागणारे जिन्नस मिळवण्यासाठी पहिले पंधरा दिवस अडचणी आल्याचं, मात्र नंतर होम डिलिव्हरी मिळू लागल्यानं व भाजी विक्रेते दारावर येऊ लागल्यानं सर्व वस्तू व्यवस्थित मिळत असल्याचं मत त्यांनी नोंदविले. विशेष म्हणजे, लॉकडाउनच्या पहिल्या आठवड्यात ६९ टक्के जणांनी फक्त शाकाहारी अन्न घेतल्याचं, तर दोन महिन्यांच्या काळात हे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं आढळले. चिकन व मटण सहज उपलब्ध होऊ लागल्यानं हा फरक पडल्याचं दिसून आलं. पहिल्या पंधरा दिवसांतील जेवण खिचडी-दही, भाजी-पोळी, पाव-भाजी, इडली-सांबर असं होतं, तर दोन महिन्यांनंतर ते ऑम्लेट, मटण-रोटी, चिकन, अंडा भूर्जी-रोटी असं झाल्याचं आढळलं. आता मिलेनिअल्स हेल्थी फुड व इम्युनिटीची भाषा बोलू लागले आहेत. याचं कारण कोरोनाच्या भीती बरोबरच लॉकडाउनमुळं हालचालींवर मर्यादा आल्यानं वजन वाढण्याची भीती असल्याचं सर्वेक्षणात आढळलं. ‘हॉटेल्स पुन्हा सुरू झाल्यावर आम्ही इम्युनिटी बुस्टर पदार्थांनाच पसंती देऊ व हॉटेल्सनही अशाच प्रकारचे पदार्थ सर्व्ह करावेत,’ असं त्यांना वाटतं.

सर्वेक्षणात अनेक घरांतील फूड हॅबिट पिझ्झाकडून ब्रोकोलीच्या दिशेनं गेल्याचंही आढळलं. अन्नपदार्थांच्या सुरक्षेला आता महत्त्व आलं असून, त्यासाठी घरात बनवलेले पदार्थ खाणं हाच उत्तम पर्याय असल्याचं सर्वांचच मत बनलं आहे. घरात पदार्थ बनवताना त्यांचा दर्जा तपासता येतो, तो बनवताना पूर्ण स्वच्छता पाळल्याचं आपल्या समोरच दिसतं व पदार्थ थोडा गार झाला तरी तो मायक्रोवेव्हमध्ये २० ते ३० सेकंद गरम केल्यावर अत्यंत सुरक्षित पदार्थ खात असल्याचा आत्मविश्वास येतो, असं मिलेनिअल्स सांगतात. हॉटेल्स सुरू झाल्यावरही कोरोना, तसेच स्वच्छता व सोशल डिन्स्टन्सिंग पाळली जाणार नाही या भीतीनं हॉटेलमध्ये जाणं टाळू, असं सर्वच सहभागींनी मान्य केलं. 

थोडक्यात, कोरोनाच्या संसर्गामुळं मिलेनिअल्सची खाद्यसंस्कृती बदलणार व त्यावर घरातील ज्येष्ठांचा प्रभाव असणार, हेच या सर्वेक्षणातून पुढं आलं आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com