
Food culture : खाद्य संस्कृती जपणारे डोंगरी मीठ
आपल्या देशामध्ये विविधांगी संस्कृती नांदत आहे. या संस्कृतीला अतिशय प्राचीन आणि उपयुक्त अशी परंपरा आहे. परंतु, आधुनिकतेच्या वाटेवर जाताना या संस्कृती आणि परंपरांकडे दुर्लक्ष करून आपले नुकसान होत आहे. नेमकी ही बाब उत्तराखंडमधील शशी बहुगुणा रातुरी यांनी ओळखली. या संस्कृती आणि परंपरेचे संवर्धन करण्याच्या दिशेने त्यांनी चांगल्या पद्धतीने आखणी केली.
उत्तराखंडमध्ये लोप पावत चाललेली खाद्य संस्कृती जतन करण्यासाठी शशी यांनी प्रयत्न सुरू केले. या खाद्य संस्कृतीमधील सर्वांत महत्त्वाचा घटक होता, ते म्हणजे त्या परिसरात प्रसिद्ध असलेले ‘डोंगरी मीठ’. या मीठामध्ये अनेक गुणधर्म आहेत. ‘पिस्यू लून’ या नावाने हे मीठ प्रसिद्ध आहे. खडे मीठ, आयुर्वेदिक वनस्पती आणि काही मसाले यापासून हे मीठ तयार होते.
हे मीठ आले, लसूण, भांग अशा वेगवेगळ्या मसाल्यांच्या स्वादामध्ये तयार होते. उत्तराखंडमधील ग्रामीण भागातील महिला हे मीठ तयार करण्यामध्ये निष्णात आहेत. हिवाळ्यामध्ये जेव्हा भाजीपाला कमी प्रमाणात उपलब्ध असतो, तेव्हा हे रंगीबेरंगी मीठ भाजीपाल्याला पर्याय म्हणून गृहिणी वापरतात. स्वयंपाकातील पदार्थांमध्ये या मिठाचा वापर करून पदार्थ चवदार आणि स्वादिष्ट बनविले जातात.
शशी यांनी परिसरातील काही महिलांना यानिमित्ताने रोजगार निर्माण करून दिला. या मिठासाठी ‘नमकवाली’ असा ब्रँड त्यांनी तयार केला. शशी यांच्या मार्गदर्शनाखाली या महिला मीठ बनविण्यासाठी लागणारे सर्व घटक जंगलातून, डोंगरातून आणतात. हे सर्व घटक एकत्रित करून त्यावर योग्य प्रक्रिया करून हे मीठ तयार केले जाते.
त्यानंतर तयार झालेले हे मीठ नमकवाली या ब्रँडच्या नावाने सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. छोट्या प्रमाणात सुरू झालेला डोंगरी मिठाचा हा प्रवास आता वाढत चालला आहे. आले आणि मिक्स स्वादाच्या मिठाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.
उत्तराखंडमधील खाद्यसंस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी नमकवाली या ब्रँडच्या माध्यमातून शशी यांनी केलेल्या प्रयत्नांना आता फळे येताना दिसताहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे उत्तराखंडचे पदार्थ सर्वदूर पोहोचत असून त्याचबरोबर तेथील स्थानिक महिलांना यामुळे रोजगार उपलब्ध होत आहे. सध्या या महिला हे
डोंगरी मीठ विकून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. स्थानिक महिलांना घरबसल्या हा रोजगार उपलब्ध झाला असून या ब्रँडमुळे महिला सबलीकरण होण्यास मदत झाली आहे.