काय आहे हे 'फ्युजन फुड' ?

अमोल सावंत
Saturday, 7 December 2019

खाद्यातील फ्युजन हे काही १९ व्या शतकापासून सुरू नाही, ते प्राचीन काळापासून सुरू आहे. आताच्या नवीन तंत्रज्ञानाने ते सोपे करून दिले आहे.

कोल्हापूर - उप्पीट किंवा पोहे केलेले असतात. नेहमीसारखी चव असते. चव बदलण्यासाठी अन्य राज्यांतील, देशांतील एखादा पदार्थ उप्पीट किंवा पोह्यात टाकला जातो. वरती शेंगतेल किंवा सरकी तेल न वापरता अन्य तेलाची फोडणी दिली जाते; मग चव बदलून जाते. हे असते फ्युजन.

कोल्हापुरात वाढता ट्रेंड

फ्युजन फूडचा हा ट्रेंड जसा जगभरात विस्तारत आहे, तसाच तो कोल्हापुरातही सुरू आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, खाऊ गल्लीत अशा फ्युजन फूड ट्रेंडला खूप मागणी आहे. आपण एखादा पदार्थ खात असतो; पण आपल्याला अनेकदा तो फ्युजन फूडचा प्रकार आहे, हे समजत नाही. तो पदार्थ खातो. खूप आवडतो. असेच फ्युजन फूड तुम्हीसुद्धा घरी कधी ना कधी करत असता. हे फूड प्रत्येकाला आवडते. या फूडमधील सर्व घटक एकत्र आलेले असतात, ते सर्व घटक फ्युजन फूडमधून शरीराला मिळतात. जे लोक कॅलरीज, बॅलन्सड्‌ डाएट- फूडचे शौकीन; तसेच बॉडी बिल्डर, मॉडेलिंग, कॉर्पोरेट कल्चर आदींमध्ये सफर करणारे लोक अशा फ्युजन फूडला विशेष पसंती देतात.  

सोशल नेटवर्किंगवर फ्युजन फूडचे ट्रेंड एका क्‍लिकवर 

खाद्यसंस्कृतीत नेहमी उत्क्रांती होत असते. नवे खाद्याचे ट्रेंडस्‌ उदयाला येत असतात. भौगोलिक परिस्थितीनुसार जे अन्नधान्य उगवते, त्यानुसार खाद्य तयार होते. वेगवेगळे अन्नधान्य एकत्रित करून नवा खाद्यपदार्थ तयार केला, तर तो अनेकांना आवडतो. विशेषत: प्रत्येक प्रांतागणिक बदलत जाणारी आपली खाद्यसंस्कृती आहे. सोशल नेटवर्किंगवरून तर अशा फ्युजन फूडचे ट्रेंड एका क्‍लिकने पाहायला मिळतात. फ्युजन हे व्हेज-नॉनव्हेजमध्ये तयार केले जाते. तुम्ही कोल्हापुरातील कोणत्याही मोठ्या-छोट्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गेलात, की फूड बोनान्झा, फूड फेस्टिव्हल्स्‌, फूड ट्रेंडस्‌ असे फलक दिसतात. एखाद्या राज्याचे खाद्यपदार्थ फेस्टिव्हलमध्ये असतात. अशा फेस्टमध्ये सर्रास फ्युजन फूड सर्व्ह होते. ते आपल्याला खायला मिळते. 

हेही वाचा - चॉकलेट, ड्रायफ्रुट्‌स, रंग अन्‌ टेस्टची रंगत...! 

 हॉटेल, रेस्टॉरंट, खाऊ गल्लीत फ्युजन फूडची रेलचेल

आता तर मॉल्सची संस्कृती कोल्हापूरमध्ये उदयाला आली आहे. या मॉल्स्‌मध्ये विविध देशांतील सॉसेजेस, फळे, पालेभाज्या, कडधान्ये सहजपणे मिळतात. ज्यांना फ्युजन फूडचा आनंद घ्यायचा आहे, ते घरी, पार्टीमध्ये असे फूड करू शकतात. कोणत्याही सण-उत्सवात फ्युजन पदार्थांचा ट्रेंड पाहायला मिळतो. विशेषत: दिवाळीतील फराळ, मिठाईमध्ये तर हमखास दिसतो. फ्युजन पदार्थ खाणे तर होते; पण यातून नवीन व्यवसायाची कळत-नकळत मुहूर्तमेढ रोवली जाते. तुम्ही हा फ्युजन पदार्थांचा व्यवसाय ‘कॅश’ केला, तर तुमच्या अर्थकारणालाही गती येते. 

काय आहे फ्युजन? 

फ्युजन म्हणजे एक प्रकारची हायब्रीड डिश. या डिशमध्ये अनेक पदार्थ एकत्र करून एक अफलातून चव निर्माण होते. हा पदार्थ खाल्ल्यानंतर जिभेवर त्याची चव रेंगाळते. हे पदार्थ कुठे मिळतात, याचा शोध घेता. जगभरातील सांस्कृतिक देवाणघेवाण खाद्यपदार्थांच्या माध्यमातून होत असते. खाद्यपदार्थांतून नवीन संशोधनही सुरू असते. खाद्यातील फ्युजन हे काही १९ व्या शतकापासून सुरू नाही, ते प्राचीन काळापासून सुरू आहे. आताच्या नवीन तंत्रज्ञानाने ते सोपे करून दिले आहे. कोणत्याही व्यक्तीला फ्युजन असलेले पदार्थ तयार करता येतात. चव, वास, समाधान या त्रिसूत्रीवर हे फ्युजन आपलेसे वाटते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fuggan food trend in kolhapur