हेल्दी रेसिपी : केळफुलाचे बेसन 

शिल्पा परांडेकर 
Tuesday, 15 September 2020

केळफुलातून प्रोटिन, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॉपर, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फायबर्स आणि लोह भरपूर प्रमाणात मिळते. केळफुलामुळे इनफेक्शपासून संरक्षण होते.

‘बस थोडेसे ** बनवेल तुमच्या बोअरिंग भाजीला टेस्टी..’ छोटा वरुण गंमत म्हणून टीव्हीतल्या शेफप्रमाणे रेसिपीचा व्हिडिओ बनवीत होता. अर्थातच, हे एका जाहिरातीतील वाक्य होते. आपल्या आई-आजीने मोठ्या प्रेमाने बनविलेली भाजी ‘बोअरिंग’ कशी काय? 

शिवाय आपल्या खाद्यसंस्कृतीत अनेक स्वादिष्ट व पौष्टिक पदार्थ आहेत. आपल्याकडील जेवण बनविण्याच्या पद्धती, मसाले, घटक वैशिष्ट्यपूर्ण असताना या बाहेरील लोकांना आपल्या पदार्थांना बोअरिंग किंवा निकृष्ट दर्जा देण्याचा अधिकार दिला कोणी? आपण विविध खाद्यसंकृतींचा आस्वाद घेणे जरूर योग्य, परंतु यामुळे तीच आपली जीवनशैली बनविणे किंवा त्यापुढे आपल्या खाद्यसंस्कृतीला कमी लेखणे, हे अयोग्य. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशा अपोषक उत्पादनांच्या जाहिरातींना बहुतांशी लोक विशेषतः लहान मुले आकर्षित होतात आणि अशा उत्पादनांचा आहारात समावेश करण्याचा आग्रह धरतात. कधीतरी चवीत बदल म्हणून आस्वाद घेणे एकवेळ ठीक, परंतु रोजच अशा गोष्टी आहारात घेण्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात. याचा आपण सर्वांनी एकदा विचार करायला हवा, नाही का? 

केळफुलातून प्रोटिन, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॉपर, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फायबर्स आणि लोह भरपूर प्रमाणात मिळते. केळफुलामुळे इनफेक्शपासून संरक्षण होते. दुग्धवर्धक असल्यामुळे स्तनपान देणाऱ्या मातांकरिता उपयुक्त. शिवाय बाळंतपणानंतर किंवा मासिक पाळीतील अतिरक्तस्त्रावावर केळफुलाच्या सेवनाने आराम मिळतो. केळफुलामधील अॅंटिएजिंग घटक त्वचेसाठी वरदान ठरू शकतात. केळफुलामुळे अपचन, बद्धकोष्ठतेच्या समस्या कमी होतात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रेसिपी 
साहित्य - केळफुल, कांदा, लसूण, तिखट, मीठ, धने पूड, गोडा मसाला, बेसन किंवा कुळथाचे पीठ, कोथिंबीर. फोडणीसाठी ः तेल, जिरे-मोहरी, हिंग. 

कृती - 
१. केळफुलाच्या प्रत्येक पानातील छोटी-छोटी फुले काढून त्यातील पातळ पाकळी व कडक दांडी काढून टाकावी. 
२. निवडलेली फुले चिरून मिठाच्या पाण्यात अथवा ताकात २ तास भिजवून ठेवावीत. 
३. फोडणी करून कांदा, लसूण घालून परतणे. 
४. तिखट, मीठ, धणे पूड व गोडा मसाला घालून परतणे. 
५. भिजवलेली फुले पिळून त्यात घालणे व मध्यम आचेवर शिजवून घेणे. 
६. खोबरे घालून पुन्हा एक वाफ आणणे. 
७. साधारण ओलसर असताना मावेल इतके पीठ पेरून बेसन परतणे व वाफेवर साधारण पाच मिनिटे वाफवणे. 
८. खोबरे व कोथिंबीर घालून सजविणे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टीप – वाटण, काळे वाटाणे वगैरे घालूनदेखील भाजी बनविता येईल. तसेच केळफुलापासून सॅलड, वडे, कटलेट देखील बनविता येऊ शकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healthy recipe: Kelphula gram flour

Tags
टॉपिकस