Christmas 2019 : डिलिशीयस प्लम केकची अशी आहे गोष्ट!

प्रशांत ननावरे
Thursday, 19 December 2019

नाताळच्या रात्री चर्चमध्ये प्रार्थना करून आल्यावर जो पदार्थ चाखण्याची सर्वांना आतुरता असते, तो पदार्थ म्हणजे "ख्रिसमस केक'. 

पदार्थांची कुळकथा : ख्रिसमस केक (Christmas Festival)

प्रत्येक सणाला वैशिष्ट्यपूर्ण बनवणारा महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्यपदार्थ. त्याशिवाय कोणताही सण पूर्ण होऊच शकत नाही. मग वर्षअखेरीस येणारा "नाताळ सण' त्याला कसा अपवाद असू शकेल? नाताळच्या रात्री चर्चमध्ये प्रार्थना करून आल्यावर जो पदार्थ चाखण्याची सर्वांना आतुरता असते, तो पदार्थ म्हणजे "ख्रिसमस केक'. 

Image result for plum cake

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपण सर्वजण "ख्रिसमस केक'ला "प्लम केक' या नावाने ओळखत असलो तरी जगभर या केकला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. ब्रिटिश त्याला "प्लम पुडिंग' म्हणतात, तर कॅरेबियन प्रदेशातील लोकांसाठी तो "ब्लॅक केक', स्कॉटिश लोकांसाठी ऍप्पल क्रिम केक; तर अनेक देशांमध्ये तो "फ्रूट केक' म्हणूनही ओळखला जातो. जितकी त्याची नावं तितक्‍याच त्याच्या बनवण्याच्या पद्धती, त्यातील घटकपदार्थ आणि दिसायला व चवीला तो वेगळा असतो. अर्थातच त्याचं मूळ त्या त्या संस्कृतीमध्ये लपलेलं आहे.
डिसेंबर महिन्यात बाजारात "प्लम' म्हणजेच "आलुबुखार' नावाचे तांबुस रंगाचे गोलाकार फळ दिसू लागते. त्या प्लमचा आणि या केकचा काही संबंध आहे का, असा प्रश्‍न अनेकांना पडतो. परंतु, "प्लम केक'मध्ये या फळाचा नाही तर कायमच मनुक्‍यांचा वापर करण्याची पद्धत चालत आलेली आहे. कॅरेबियन देशांमध्ये नाताळच्या महिनाभर आधी मनुके आणि इतर सुकामेवा बाटलीमध्ये भरून त्यामध्ये "रम' (कॅरेबियन आणि लॅटिन अमेरिकेत दारूच्या या प्रकाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते) ओतून भिजत ठेवला जातो आणि नाताळच्या एक आठवडा आधी तयार केल्या जाणाऱ्या केकमध्ये त्याचा वापर करतात.

Related image

पदार्थांना सॉसशिवाय मजाच नाही तर पहा हे साॅसचे प्रकार...

जुन्या इंग्रजी भाषेत "प्लम' हा शब्द मध्ययुगीन लॅटिन शब्द "प्रुना' (pruna) या लॅटिन "प्रोनम' (pronum) या शब्दावरून तयार झाला होता, जो "प्रुन' या शब्दाचा समानअर्थी आहे. "प्लम' या शब्दाला आधुनिक फ्रेंच भाषेत "प्रुन' (म्हणजेच मनुका) (Prune) असे म्हणतात. सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये "फ्रूट केक' बनविण्यास सुरुवात झाली; तर मनुक्‍यांचा वापर असलेल्या केकला साधारणपणे 1660 च्या सुमारास "प्लम केक' म्हणण्यास सुरुवात झाली. याच काळात ब्रिटिशांनी जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशात व्यापाराच्या निमित्ताने वसाहती उभारण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्यासोबत हा केकही वेगवगेगळ्या प्रदेशात पोहोचला आणि विविध प्रदेशातील लोकांनी आपापल्या पद्धतीने त्यामध्ये बदल केले.

Related image

काय आहे जॉर्जियन पिझ्झाची कहाणी?

युरोपप्रमाणेच दक्षिण-पूर्ण आशियातील देशामध्येही हा केक मोठ्या चवीने खाल्ला जातो. जपानमध्ये स्ट्रॉबेरी, चॉकलेट आणि हंगामी फळांचा वापर करून "ख्रिसमस केक' तयार केला जातो. जपानमध्ये 25 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणींना "ख्रिसमस केक' म्हणून संबोधले जाते. याचाच अर्थ या महिला आता तरुण (लग्नासाठी पात्र) राहिलेल्या नाहीत. पण गंमत म्हणजे आता हे वय 31 पर्यंत वाढविण्यात आले आहे. फिलिपिन्स लोक ब्रॅन्डी किंवा रम आणि ताडाच्या साखरेमध्ये मुरवलेला पिवळ्या रंगाचा केक तयार करतात. त्यामध्ये अनेकदा गुलाबपाणी किंवा केशरी रंगाच्या फुलाचे पाणीसुद्धा टाकले जाते. या केकचे आयुष्य कैक महिने असते. नाताळनंतर येणाऱ्या इस्टरपर्यंत किंवा पुढच्या ख्रिसमसपर्यंतही तो खाल्ला जातो. मुंबईत फोर्ट येथील यझदानी बेकरीमध्ये सर्वात चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेला "रम केक' मिळतो.

(nanawareprashant@gmail.com)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: history of plum cake for Christmas Festival