#InternationalTeaDay : पेयांचा राजा... 'चहा'चा इतिहास...

महेश कराडकर
Sunday, 15 December 2019

चहा म्हणजे काम फत्ते करणारा असा माणसां माणसांगणिक चहाच्या हजारो व्याख्या सहज करता येतील एवढा चहा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे.

कोल्हापूर - चहा म्हणजे तरतरीतपणा, चहा म्हणजे फ्रेशनेस, चहा म्हणजे शीणवटा, मरगळ घालवणारा, चहा म्हणजे भांडणं मिटवणारा, चहा म्हणजे नाती दृढ करणारा, चहा म्हणजे काम फत्ते करणारा असा माणसां माणसांगणिक चहाच्या हजारो व्याख्या सहज करता येतील एवढा चहा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे.  सामान्य माणसाचा उत्साह, आत्मविश्‍वास वाढविणारं पेय म्हणून प्रत्येकजण वेळी-अवेळी निःसंकोचपणे चहाचा आस्वाद घेण्याची ऑफर कधीच टाळत नाहीत. यातच चहाच्या ‘नंबर एकचं पेय’ या अढळ स्थानाचं गुपित लपलेलं असावं. आज जागतिक चहा दिनानिमित्त ‘चाय पे चर्चा’चा घेतलेला आढावा.

कोठून आला हा चहा ?

जगात सर्वप्रथम चहाचा पेय म्हणून आस्वाद घेण्यात आला तो चीनमध्ये. क्‍वीन राजवटीत म्हणजे ख्रिस्तपूर्व २०० व्या शतकात चीनमध्ये चहा विलक्षण लोकप्रिय होता. चिनी लोकांनी कित्येक वर्षं चहा बनविण्याची पद्धत, कला जगापासून लपवून ठेवली होती. कोणीही चिनी व्यक्‍ती इतर लोकांसमोर चहा बनवत नसे. चीन ही ब्रिटिशांची वसाहत असून देखील ब्रिटिशांना चहाचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. अखेर चिन्यांकडून ब्रिटिशांना चहाची ओळख झाल्यावर मात्र त्यात ब्रिटिशांना चहाचा व्यापार दिसू लागला. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून मग ब्रिटिशांनी चहाचा खात्रीशीर पुरवठा आणि मोठा नफा मिळावा यासाठी कठोर व्यापारनीतीचा अवलंब केला. चिनी लोकांच्या गुप्ततेमुळे केवळ चीनमध्येच चहाचे उत्पादन होत होते. ब्रिटनकडून पुरवठादार म्हणजे चीन या चहाची किंमत केवळ चांदीच्या स्वरुपात घेण्यावर आग्रही होता. मात्र इतक्‍या मोठ्या प्रमाणावर चांदी देणे ब्रिटनला शक्‍य नसल्याने अखेर आयात चहाचे मूल्य चुकविण्यासाठी ब्रिटिशांनी चिनी लोकांना अफूची सवय लावून व्यापारातील (बॅलन्स ऑफ पेमेंट) सांभाळण्याचा प्रयत्न केला. ब्रिटीशांनी चिनी लोकांना व्यसनाधीनतेच्या खाईत लोटून चांदीच्या ऐवजी अफू देऊन चहाची आयात सुरू केली. मात्र चिनी सम्राटाने अफूपासून वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले. परिणामी चीनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे मग ब्रिटीशांनी चहासाठी आपला मोर्चा भारताकडे वळविला.

भारतीयांच्या मनावर कधी राज्य करु लागला हा चहा ?

चहा हे पेय आहे हे खऱ्या अर्थाने भारतीयांच्या मनावर ठसविले गेले ते १८२० पासून. चीनमधून येणारा चहाचा पुरवठा खात्रीशीर न राहिल्याने ब्रिटीशांनी भारतात चहा लागवडीला प्रोत्साहन दिले. भारतात चहाचे झाड होते, त्याचा वापरही स्थानिक करत. पण ब्रिटीशांनी भारताला व्यापारी पध्दतीने चहाची लागवड करण्यास शिकविले. चहामळ्यांची लागवड करण्यासाठी १५ वर्षांपर्यंत बिनाभाड्याने जमिनी देण्यासह प्रचंड सवलती देऊ केल्या.१९ व्या शतकात ब्रिटनमध्ये चहा ही उच्चभ्रू वर्गाची मक्‍तेदारी होती. त्यानंतर लंडनमधील उच्चभ्रू भांडवलदारांचा या नवीन स्टार्टअपसाठी भारताकडे ओढा वाढला. तेथील भांडवलदारांना चहाच्या रुपाने एक वेगळा उद्योग मिळाला. ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची लागवड केली. १८४० मध्ये आसाम टी कंपनीने व्यावसायिक तत्त्वावर चहाचे उत्पादन, ब्रॅंडींग विक्री, करण्यास सुरूवात केली. त्यावेळी चहाचे ब्रॅंडींग ब्रिटनच्या राणीकडून करण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून १८५० च्या दशकामध्ये भारतामध्ये चहाविक्रीचे प्रमाण झपाट्याने वाढले. भारतातील चहा व्यवसायाला १७२ वर्षांची परंपरा आहे. या १७२ वर्षांच्या परंपरेत भारतीय चहा उद्योगाने अनेक चढउतार बघितले आहेत. 

भारताचा चहा जातो जग भर

जगात सर्वाधिक चहाचे सेवन करणारा भारत एक प्रमुख देश आहे. देशातल्या चहाच्या एकूण उत्पादनांपैकी तीन चतुर्थांश चहाचे उत्पादन देशातच उपभोगले जाते. २०१७-१८ मध्ये भारतातून ५ हजार ८४० कोटी रुपये मूल्याच्या चहाची निर्यात करण्यात आली. इराण, रशिया, संयुक्‍त अरब अमिरात, युएसए आणि युके हे भारतातून मोठ्या प्रमाणावर चहाची आयात करतात, खरं तर जगातील एकही देश असा नाही, की जिथे भारताचा चहा घेतला जात नाही. सध्या केनिया (शेजारील आफ्रिकन देशांसह) चीन आणि श्रीलंका यानंतर चहा निर्यातीच्या बाबतीत भारताचा चौथा क्रमांक लागतो.

भारतात चहा व्यापाराच्या पद्धती

भारतात दोन पद्धतीने चहाची विक्री केली जाते. एक म्हणजे बोली लावून (ऑक्‍शन) आणि दुसरी थेट व्यापाऱ्याला विक्री केली जाते. कलकत्ता, गुवाहाटी, सिलिगुडी, कोची, कोन्नूर आणि कोइम्बतुर येथील चहाच्या मुख्य बाजारपेठांमध्ये बोली लावून चहाची मोठ्या प्रमाणात विक्री होते.

इतकी आहे चहाची उलाढाल

भारतातील चहाखालील क्षेत्र वाढत असून जगातील सर्वाधिक म्हणजे १३ हजार चहाचे मळे भारतात लागवडीखाली आले. शिवाय त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या २० लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. भारताच्या निर्यातीत चहाचा मोठा वाटा असून चहा व्यवसायाची उलाढाल ११ हजार कोटींची आहे. यातून देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. भारतात सध्या १६९२ चहाचे नोंदणीकृत उत्पादक (प्रक्रिया उद्योग), २२०० नोंदणीकृत चहा निर्यातदार, ५५४८ नोंदणीकृत चहाचे खरेदीदार आहेत. आसाममध्ये सर्वाधिक चहाचे उत्पादन घेतले जाते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: history of tea