आवळा कँडी घरच्या घरी कशी तयार करायची ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amla candy

आवळा कँडी घरच्या घरी कशी तयार करायची?

चवीला आंबट, तुरट आणि थोडासा गोड असा आवळा अनेकांना आवडतो. खरं तर आवळ्याचं प्रत्येकाने सेवन केलं पाहिजे. आवळ्याचे अनेक फायदे आहेत. दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहारात आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करतात. आवळ्याचे ‘पांढरे आवळे’ आणि ‘रान आवळे’ असे दोन प्रमुख प्रकार आहेत. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे.  बहुगुणी आवळा हा आरोग्याच्या अनेक समस्यांवरील उत्तम औषध आहे हे आपल्याला माहित आहे. 

बहुगुणी आवळा हा आरोग्याच्या अनेक समस्यांवरील उत्तम औषध आहे हे आपल्याला माहित आहे. मात्र तरीही आपल्याकडून म्हणावा तितका हा पदार्थ नियमित खाल्ला जात नाही. आवळा हा पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे, यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आवळ्यातील गुणधर्म तणावापासून दूर राहण्यास मदत करतात. तसेच केस आणि त्वचेसाठीही आवळा खाल्ला जातो. 

उन्हाळ्यात होणारे आम्लपित्त, लघवी साफ न होणे, पचनाच्या किंवा पोटाच्या तक्रारींवर आवळा कँडी खाणे फायदेशीर असते. तसेच याच्या सेवनाने उन्हामुळे होणारी मळमळ कमी होते, तरतरी येते. हिवाळा सुरू झाला की मोठ्या प्रमाणात आवळा मार्केटमध्ये उपलब्ध होतो आणि तोही अगदी माफक दरात त्यामुळे आज आपण स्वस्त आणि मस्त लागणाऱ्या आवळ्याची कँडी घरच्या घरी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य 

1) आवळा - अर्धा किलो

2) साखर - अर्धा किलो 

कृती 

सर्वप्रथम मोठ्या आकाराचे आवळे घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यावेत.हे आवळे आहेत तसेच न चिरता कुकरला शिट्ट्या करुन वाफवून घ्यावेत. शिजवल्यावर आवळ्याच्या फोडी होतात. त्यातील बिया काढून फोडी एका भांड्यात घ्याव्यात. आवळ्याच्या फोडी थंड झाल्यावर त्यामध्ये अर्धा किलो साखर घालावी. तीन दिवस हे मिश्रण तसेच ठेवायचे, मात्र दिवसातून दोन वेळा ते हलवायचे म्हणजे खराब होत नाही. तीन दिवसांनी या साखरेचा पाक होऊन त्यात आवळा अतिशय चांगला मुरतो. 

पाकातून मुरलेला आवळा बाहेर काढून तो सुकवायचा. मात्र तो उन्हात सुकवू नये त्यामुळे तो चिवट होतो. तर घरात सावलीत कुठेही तो वाऱ्याने सुकतो. अशारितीने पौष्टीक आवळा कँडी अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी तयार करु शकतो. मात्र याला कुठेही पाणी लागणार नाही याची काळजी घ्यायची. पाण्याने आवळ्याला बुरशी लागायची शक्यता असते. खाली उरलेला पाक टाकून न देता तो सरबत करण्यासाठी वापरु शकतो. या पाकात आवळ्याचा अर्क उतरलेला असल्याने तो आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो.

टॅग्स :recipefood culture