ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’:‘कूल’ कुल्फी

ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’:‘कूल’ कुल्फी

सोळाव्या शतकात मोगल राजवटीमध्ये कुल्फी राजाच्या किचनमध्ये तयार होत असे. हिमालयातून बर्फाचे मोठे तुकडे नदीमार्फत आणून एका जागी तळघरात साठवले जायचे आणि मग त्याचा उपयोग अनेक गोष्टींकरता केला जायचा. त्या बर्फाचा वापर करून राजाकरता खास कुल्फी तयार केली जायची. बासुंदी आणि रबडी ही भारतात प्रचलित होतीच, त्यात गुलाबपाणी, केशर आणि पिस्ता इत्यादी पदार्थ टाकून त्यापासून कुल्फी तयार होऊ लागली. त्याकाळात थंडगार फालुदा उत्तरेतील बाजारात मिळत असे. गुलाबाच्या स्वादाचे दूध, सब्जा, शेवया आणि रबडी अस खास पर्शियन पेय लोकप्रिय होते. नंतर आइस्क्रीम बाजारात मिळू लागल्यावर आइस्क्रीमचा वापर सुरू झाला. 

आइस्क्रीम सर्वांत आधी कोणी तयार केलं, याविषयी बऱ्याच वदंता आहेत. रोमन राजा निरो वाईन आणि मधापासून सोर्बेट तयार करवून घेत असे किंवा पर्शियात ख्रिस्तपूर्व ५५० वर्षापासून आइस्क्रीम तयार केले जायचे, तर काही जण म्हणतात, की मंगोल आइस्क्रीमचे जनक आहेत. यांच्यापैकी कोणी का असेना; पण त्यांच्यामुळे आपल्याला एक भन्नाट पदार्थ खायला मिळतोय.  

भारतात दूध आणि फळांच्या रसापासून तयार केलेले आइस्क्रीम लोक पसंत करतात; पण जगभरात इतक्या निरनिराळ्या चवीची आणि पदार्थांपासून तयार केलेली आइस्क्रीम मिळतात हे ऐकलंत तर अचंबित व्हाल. पालक, केल, सेलरी, गाजर अशा भाज्या वापरून फ्रोजन डेझर्ट केली जातात आणि डाएट कॉन्शस लोक आनंदानं हे खातात. आशियामध्ये जांभळं, कंद, रताळी, नारळाचं दूध वापरून आइस्क्रीम केलं जातं आणि ते खरंच खूप छान लागतं. जपानमध्ये रेडबीन्स म्हणजे लाल चवळीपासून असंख्य पदार्थ तयार होतात- त्यातही याचं आइस्क्रीम त्यांचं सर्वांत जास्त लाडकं आहे. ताडीचा गूळ, रेड बीन्स आणि सोया मिल्कपासून तयार केलेली आईस कँडी मस्त लागते. चिकन विंग, इंडिअन करी, हॉर्स मिट, फिश किंवा लसणाच्या चवीची आइस्क्रीमसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. 

सन १६०० मध्ये इंग्लडचा राजा चार्ल्स फर्स्टला ‘क्रिम आईस’ प्रचंड आवडत असे. हा पदार्थ निव्वळ राजघराण्यातील लोकांकरिता आहे आणि तो कधीच जनतेपर्यंत पोचू नये याकरता त्याच्या खानसाम्याला प्रचंड पगार देत असे. त्यानंतर १७०० मध्ये  फ्रान्समध्ये एक आइस्क्रीम कॅफे उघडला आणि तिथं हे किमती ‘स्नो क्रीम’ विकले जाऊ लागले. त्या काळात गोड पदार्थ हे सोन्याच्या भावात विकले जायचे, त्यामुळे निव्वळ अतिश्रीमंत लोकांना ते परवडत असे. सन १८०० शतकाच्या मध्यापर्यंत महाग असल्यानं आइस्क्रीम सामान्य जनतेपर्यंत पोचले नाही. नंतर फ्रिजिंग टेक्नॉलॉजीचा शोध लागला आणि बऱ्याच गोष्टी बदलल्या. सन १८७० मध्ये इंडस्ट्रीयल फ्रिज तयार होऊ लागले आणि सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडेल अस आइस्क्रीम सगळीकडे मिळू लागले.

आज आइस्क्रीम जगभरातल्या सर्वांत आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. कोणतंही सेलिब्रेशन आइस्क्रीमशिवाय अपूर्ण वाटतं. जगभरातील निरनिराळ्या ब्रँडची आइस्क्रीम आज भारतात सहज उपलब्ध आहेत, तरीही भारताची प्रथम पसंती मात्र कुल्फी किंवा फालुदा असते. आज एक अशीच मस्त रेसिपी पाहूयात.

केशर पिस्ता कुल्फी डेझर्ट
साहित्य ः
 २ कप तयार बासुंदी (साखरेसहित), १ कप क्रीम, २ टेबलस्पून खवा किसून, १५ ते १७ केशर काड्या, ४ थेंब पिवळा रंग, १५ ते २० पिस्ते बारीक काप करून, १ चमचा गुलाब पाकळ्या, गुलाब इसेन्स. 

कृती ः
बासुंदी थंड करून घ्या. 
खवा किसून घ्या आणि २ चमचे क्रीममध्ये मिक्स करून गरम करायला ठेवा. खवा विरघळला, की गॅस बंद करून थंड करायला ठेवा. 
उरलेलं सर्व क्रीममध्ये गुलाब इसेन्स टाकून हलकं फेटून घ्या. त्यातील ४ चमचे क्रीम बाजूला काढून थंड करत ठेवा. 
फेटलेल्या क्रीममध्ये खव्याचं मिश्रण, थंड बासुंदी, केशर, पिवळा रंग एकत्र करून फेटून घ्या. 
वरील मिश्रणात कापलेले पिस्ता आणि गुलाब पाकळ्या चुरून टाका. 
कुल्फीचे मिश्रण प्लॅस्टिक टबमध्ये ७ ते ८ तास थंड करायला डीप फ्रिजमध्ये ठेवा. मध्ये २ वेळा वर-खाली करून मिक्स करा आणि पुन्हा थंड करत ठेवा. 
तयार कुल्फी सॉफ्ट करून घ्या आणि एक काचेच्या ग्लासमध्ये सर्व्ह करा. त्यावर थंड केलेलं गुलाब क्रीमचा एक लेयर द्या. वरून पिस्ता पावडर, पिस्ता काप आणि गुलाब पाकळ्यांनी सजावट करून सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com