बांबूची भाजी कधी खाल्लीय का? हे आहेत प्रकार; अशी बनते भाजी

सुस्मिता वडतिले 
Sunday, 6 September 2020

भारतात उत्तर-पूर्वेकडील राज्यांत राहणारे लोक विशेषतः आदिवासी लोक बांबूच्या कोवळ्या कोंबांना आपला मुख्य आहार मानतात. विविध प्रकाचे पदार्थ सुद्धा बाबूंमध्ये शिजवतात. बांबू त्याच्या जीवनाचा मोठा आधार आहे. हल्ली काही हॉटेल मध्ये बांबूचे विविध पदार्थ व बांबू मध्ये शिजवलेले बिर्याणी सारखे पदार्थ  मिळत आहेत 

पुणे : पृथ्वीतलावावर २०० दशलक्ष वर्षापासून बांबूचे अस्तित्व आहे. बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. महाराष्ट्रात ही वनस्पती प्रामुख्याने कोकण, पश्चिम घाट, खानदेश आणि विदर्भात आढळते. बांबू हे नाव ऐकले तरी तुमच्या डोळ्यांसमोर बांबूपासून तयार केलेल्या वस्तू म्हणेजच सूप, टोपली, दुरडी, परडी, परसराम, कोंबडीचे खुराडे या वस्तू येत असतील बरोबर ना. पण तुम्हाला हे माहित आहे का...? बांबूपासून जसे अनेक वस्तू तयार केल्या जातात, त्याच पद्धतीने बांबूपासून काही रुचकर पदार्थसुद्धा म्हणजेच बांबूपासून पातळ-सुखी भाजी, भजी-वडे, बिर्याणी बनवता येते. आता हे ऐकून तुम्ही म्हणाल, हे कसे शक्य आहे. बांबूपासून कुणी भाजी कशी बरं बनवेल. हो तुम्ही जे वाचताय ते बरोबर आहे. चला तर मग त्याचबद्दल जाणून घेऊयात.

अमरावती जिल्ह्यात वडाळी येथे बांबूच्या २९ प्रजातींचे संवर्धन करण्यात आले आहे. विविध प्रजातींचे संवर्धन करण्यात देशातील डेहराडूनचा पहिला, केरळचा दुसरा क्रमांक आहे. अमरावती येथे तिसाव्या क्रमांकाचे बांबूचे संग्रहालय आहे. जगातल्या दुर्मीळ व औषधी अशा ६४ प्रजाती रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जून ते ऑगस्ट या महिन्यात बांबूचे कोंब जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. भारतात उत्तर-पूर्वेकडील राज्यांत राहणारे लोक विशेषतः आदिवासी लोक बांबूच्या कोवळ्या कोंबांना आपला मुख्य आहार मानतात. विविध प्रकाचे पदार्थ सुद्धा बाबूंमध्ये शिजवतात. बांबू त्याच्या जीवनाचा मोठा आधार आहे. हल्ली काही हॉटेलमध्ये बांबूचे विविध पदार्थ व बांबूमध्ये शिजवलेले बिर्याणी सारखे पदार्थ  मिळत आहेत 

Image may contain: one or more people, people sitting and food

बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात (जाती नुसार ३०-६० वर्षांतून) एकदाच फुले-फळे देत असते व नंतर जीवनयात्रा संपते, बांबू पूर्णपणे वाळून जातो. बांबूचे बहूवर्षायू सरळसोट वाढणारे उंच वृक्ष, समूहाने वाढतात. त्यांची बने किंवा बेटे तयार होतात. बांबूच्या बनाला रांझी म्हणतात. ओढ्यांच्या व नद्यांच्या काठांवर बांबू वाढतात. जगामध्ये बांबूच्या सुमारे ९० जाती आणि १५०० प्रजाती आहेत. यातील २२ जाती व १४० प्रजाती भारतात आहेत, त्यापैकी ६० प्रजाती या लागवडीखाली आहेत. तर ५०% बांबू हा पूर्व भारतात होतो. जगात चीन हा सर्वात चांगल्या प्रतीच्या बांबूचा उत्पादन घेणारा प्रथम क्रमांकाचा देश आहे. तर चीनच्या खालोखाल भारतात बांबू मोठ्या प्रमाणात आढळतो.

अमरावती जिल्ह्यात बाबूंच्या कोंबापासून वडे आणि भाजी बनवतात. आपण वडे आणि त्यापासून बनवल्या जाणाऱ्या दोन प्रकारच्या भाज्या कशा पद्धतीने बनवल्या जातात ते पाहूया. 

बांबूपासून असे बनवले जातात वडे...
 
साहित्य - तयार बांबूचे कोंब, भिजवलेली उडीद डाळ, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे, धने, तेल, मीठ, लाल तिखट, हळद 
कृती - प्रथम बांबूची कोंब सोलून त्यावरील साली काढून घ्या. सोलून घेतलेल्या कोंबातील आतील कोवळा गाभा चिरून घ्या. त्याचे बारीक चकत्या करा. त्या चकत्या रात्रभर मिठाच्या पाण्यात ठेवा किंवा लगेच करायचे असल्यास २०-२५ मिनटे पाण्यात मीठ टाकून उकळून घ्या. उडीद डाळ किंवा सोला साधारण ३ तास भिजून घ्या. तयार बांबूचे कोंब, भिजवलेली डाळ, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे, धने सर्व पाटा वरवंट्याने बारीक वाटून घ्या. तयार वाटणमध्ये हळद, थोडे लाल तिखट व मीठ घालून मिसळून घ्या. त्यानंतर एका कढईत तेल तापवून, छोटे छोटे गोल वडे थापून ते तळून घ्या. अशा पद्धतीने बांबूपासून वडे तयार झाले. 

Image may contain: food

बांबूपासून अशी बनवली जाते पातळ भाजी... 

साहित्य - तयार बांबूचे कोंब, तेल, जिरे, कांदा, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, हळद, धणेपूड, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर
कृती - प्रथम बांबूचे कोंब चिरून रात्रभर पाण्यात ठेवा किंवा पाण्यात २० मिनिटे उकळून घ्या. तयार बांबूचे कोंब पाटा वरवंट्यावर बारीक वाटून घ्या. लोखंडी कढईत तेल टाकून त्यात जिरे, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लसूण-अद्रक पेस्ट, हळद, धणेपूड, लाल तिखट टाकून फोडणी टाका. फोडणी झाल्यावर बांबूच्या कोंबाचा वाटलेला गोळा करून परतून घ्या. त्यात मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घाला. पाच मिनिटे उकळी घेऊन भाजी शिजवून घ्या. त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 

बांबूपासून अशी बनवली जाते सुकी भाजी...
 
साहित्य -  तयार बांबूचे कोंब, मसूर डाळ, तेल, जिरे, कांदा, लसूण, हळद, लाल तिखट आणि कोथिंबीर
कृती - प्रथम बांबूचे कोंब चिरून घ्या. त्यांनतर ते सात ते आठ तास मीठाच्या पाण्यात ठेवा. त्यांनतर मसूर डाळ एक तास भिजवून घ्या. बांबूचे कोंब पाण्यातून काढून निथळून घेऊन ते खलबत्यामध्ये बारीक कांडून घ्या. त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेला कांदा, लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट टाकून तेलामध्ये फोडणी घाला. फोडणीमध्ये भिजवलेली मसूर डाळ व कोंब घालून भाजी शिजवून घ्या. त्यानंतर त्या भाजीत चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून चपाती किंवा भाकरीसोबत खावा. 

पोषकतत्वे...

- बांबूमध्ये जीवनसत्व ब कॉम्प्लेक्स थायामीन, रिबोफ्लॅविन, नियासिन, बी-६ (पायरीडॉक्सिन) आणि पँटोथिनिक ऍसिड, पोटॅशियम, कॅल्शियम, तंतुमय पदार्थ, कमी प्रमाणात प्रथिने व फॉस्फरस आहे.
- जीवनसत्व ब हे तोंड, जीभ व डोळे यांच्याकरिता आवश्यक आहे. त्वचा, हाडे, केस, रक्तपेशी, मज्जातंतू व पचनसंथा स्वस्थ ठेवते. रोग प्रतीकारक शक्ती वाढवते.
- पोटॅशिअम स्नायूचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक आहे.
- कॅल्शिअम व फास्फोरस हाडे व दातांना मजबुती देते.
-  तंतुमय पदार्थ पचन करण्यास मदत करते.
- प्रथिने शरीराची झीज भरून काढते.
- बांबू हा क्षारयुक्त आहे. यातील तंतू आणि क्षार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.

औषधी गुणधर्म... 

-  बांबूचे कोंब, पेर, पाने, अंकुर, फुले सर्व औषधी आहेत.
-  बांबूच्या कोंबाचा शक्तीवर्धक म्हणून उपयोग आहे.
-  जखमेतील किडे काढण्याकरिता बाबूंच्या कोंबाचे पोटास बांधतात
-  बांबूचा कोवळा भाग श्वसन विकारावर उपयोगी आहे.
-  कोवळ्या कोंबाचे लोणचे अपचनात उपयुक्त आहे. भाजीमुळे भूक व पचनशक्ती वाढते.
-  कोवळे कोंब कुटून सांधेसुजीत बांधतात.
-  बाळंतपणानंतर गर्भाशयाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात.
-  बांबू खोडांच्या पेऱ्यात तयार होणारे वंशलोचन हे दम्यावरील उत्तम औषध आहे. तसेच थंड, पौष्टिक आणि रूचकर भाजी म्हणून वापरतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many dishes like Vade Bhaji can be made from bamboo