ग्लॅम-फूड : ‘मिसळ खूप आवडते’ | Misal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monalisa Bagal
ग्लॅम-फूड : ‘मिसळ खूप आवडते’

ग्लॅम-फूड : ‘मिसळ खूप आवडते’

sakal_logo
By
मोनालिसा बागल

पुरणपोळी मला प्रचंड आवडते. लहानपणापासून घरी सणासुदीला गोडधोड बनायचे; पण त्यात पुरणपोळी ही माझी जास्त फेव्हरेट आहे. पुरणपोळी आणि तूप टाकून आंब्याचा रस हे कॉम्बिनेशन आमच्याकडे आवडतं. आंबा वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे या कॉम्बिनेशनची चव चाखायला मला वर्षभर वाट पाहावी लागते.

पुरणपोळीसोबतच मला मिसळ खूप आवडते आणि बाहेर गेल्यावर मला मिसळीचे प्रकार चाखायला मिळतात. पुण्यातील मिसळ बऱ्याचदा खाल्ली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जेव्हा मी पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये गेले होते, त्या वेळी मी तिथली मिसळ खाल्ली. सहसा, मिसळसोबत पाव देतात; पण तिथं ब्रेडचे स्लाईस होते. मी ‘पाव नाहीयेत का,’ असं विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, ‘इथं मिसळसोबत ब्रेडच खातात.’ मला ती मिसळ आवडली. कोल्हापूरची मिसळ ही पुणे आणि मुंबईच्या मिसळपेक्षा खूप वेगळी आहे.

मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. जेव्हा रिकामा वेळ असतो, त्यावेळी मी आवडीनं स्वयंपाक करते, नवनवीन पदार्थ ट्राय करते. व्हेज येतंच आणि नॉन-व्हेजही बनवायला येतं. गेल्या लॉकडाउनमध्ये मी मासवडी नावाचा पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला होता. तो बनवायला कठीण आहे; पण सुपर टेस्टी आहे. माझा स्वभाव असा आहे की, जोपर्यंत मला एखाद्या गोष्टीबद्दल कॉन्फिडन्स येत नाही, तोपर्यंत ती गोष्ट मी करत नाही. त्यामुळे असा कोणता पदार्थ मला आठवत नाही, की मी करायला गेले आणि तो बिघडलाय. कोणता पदार्थ आवडत नाही असं माझ्या बाबतीत काहीही नाही. ताटात जे वाढलं असेल ते मी खाते. मग प्रमाण कमी का असेना; पण मी खाते. आईनं बनवलेला प्रत्येक पदार्थ आपल्याला आवडतोच आणि तिच्यासारखा कोणताच पदार्थ आपण बनवू शकत नाही, ही गोष्टदेखील तितकीच खरी आहे. माझ्या आईसारखी फिशकरी मी अजूनही कुठे टेस्ट केली नाही. आई सर्व पदार्थ चविष्ट बनवायची. तिच्या हातचा गाजराचा हलवा तर सुरेख, अप्रतिम. गाजराचा हलवा असं नाव जरी काढलं तरी तिची आठवण येते. आई होती, तेव्हा ती प्रत्येक सणाला गाजरचा हलवा करायची. आईचे हे दोन पदार्थ मी खूप मिस करते आणि आईला तर दररोज मिस करते.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

loading image
go to top