फ्युजन किचन : शिरवाळे रस शेवया

या आंब्याच्या मोसमात सुरुवातीलाच मी पाच डझन आंब्याची पेटी मागवली. विचार केला कुठेही कमी पडायला नको, म्हणजे ज्या ज्या पदार्थांचे बेत मनात आखले आहेत ते सर्व करून बघायला मला सोपं जाणार होतं.
shirvale ras shevaya
shirvale ras shevayasakal
Summary

या आंब्याच्या मोसमात सुरुवातीलाच मी पाच डझन आंब्याची पेटी मागवली. विचार केला कुठेही कमी पडायला नको, म्हणजे ज्या ज्या पदार्थांचे बेत मनात आखले आहेत ते सर्व करून बघायला मला सोपं जाणार होतं.

- नीलिमा नितीन, फूड ब्लॉगर

या आंब्याच्या मोसमात सुरुवातीलाच मी पाच डझन आंब्याची पेटी मागवली. विचार केला कुठेही कमी पडायला नको, म्हणजे ज्या ज्या पदार्थांचे बेत मनात आखले आहेत ते सर्व करून बघायला मला सोपं जाणार होतं.

अख्खा उन्हाळा आंबामय करून टाकायचा माझा विचार होता आणि आहे. आंब्याचा रस, अंबा आईस्क्रीम, कुल्फी, हे तर असणारच आहे; पण आंब्याचे मोदक, आंब्याचे ओट्स, आंब्याची फिरणी असे नवे जुने अनेक पदार्थही मी बनवले. अजूनही भरपूर पदार्थांत मी आंबा वापरणार आहे; पण फक्त आंबा वापरायचा म्हणून प्रत्येक पदार्थात न घालता आंब्याने त्या पदार्थाची लज्जत वाढावी, तसेच त्या पदार्थाची पुनरुज्जीवन व्हावे हा आपल्या फ्युजन किचनचा हेतू नाही का? मग खूप विचार केला, कुठल्या पदार्थात आंबा जास्त चांगला लागेल? कोणती कॉम्बिनेशन छान वाटतील?

मग विचार केला, ज्या कोकणातून हा हापूस आंबा आला आहे त्या काही कोकणी पारंपरिक रेसिपीजमध्ये वापरला तर? कोकणातले निसर्गसौंदर्य व खाद्यसंस्कृतीने मला नेहमीच भुरळ पाडली आहे आणि आपल्या खाद्यसंस्कृतीबद्दल माझे असे ठाम मत आहे, की त्या रेसिपीजना तोड नाही. फक्त नव्या युगाला या रेसिपीज नव्या पद्धतीने प्रेझेंट करायला हव्यात. जेणेकरून आपल्या खाद्य संस्कृतीची ओळख जगाला होईल. त्याच विचारातून निर्माण झालेली आजची रेसिपी शिरवाळ्या आणि नारळाचा रस.

आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय? तर या शिरवाळ्या/शेवया मी आंब्याच्या रस वापरून बनवल्या आहेत आणि नारळाच्या रसात गुळाऐवजी रंगसंगतीसाठी मी साखरेचा वापर केला आहे. हवे असल्यास तुम्ही गूळ वापरू शकता. तसेच याचे प्रेझेंटेशन थोडेसे वेगळे केले आहे. बघा तुम्हाला आवडते का ते.

साहित्य -

एक वाटी तांदळाची (मोदकाची) पिठी, पाऊण वाटी पाणी, पाव वाटीला थोडासा जास्त आंब्याचा रस, चिमूटभर मीठ, थोड्या केशर काड्या, नारळाच्या रसासाठी एका नारळाचे घट्ट दूध (रस); साखर, वेलदोडा पूड, सजावटीसाठी आंब्याच्या फोडी आणि नारळाच्या दुधावर जमणारे थोडे घट्ट (ऑप्शनल) क्रीम

कृती -

  • प्रथम एका पात्रात पाऊण वाटी पाणी उकळत ठेवावे.

  • एक उकळी आली म्हणजे त्यात चिमूटभर मीठ व अगदी थोडेसे तूप, केशर काड्या घालाव्यात, यातच आंब्याचा रसही घालावा. मग तांदळाची पिठी घालून हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.

  • गॅस बंद करून हे पीठ छान मळून घ्यावे. नंतर शेवयाच्या साच्याने याच्या शेवया पाडून त्या इडली पात्रात वाफवून घ्याव्यात. नारळाच्या रसासाठी

  • एका नारळाचे वेलदोडा घालून घट्ट दूध काढून घ्यावे. त्यातच आवडीप्रमाणे साखर घालून ती मिक्स करावी.

  • सर्व्हिंगसाठी शेवया या आंब्याच्या शेवया/शिरवाळ्या प्लेटमध्ये ठेवून त्यावर नारळाचे घट्ट दूध ओतावे. सोबत आंब्याच्या काही फोडीने व नारळाच्या दुधाच्या क्रीमने हे सजवावे. तुम्ही नारळाच्या दुधातही केशर घालू शकता.

  • अतिशय सुंदर लागतात. नक्की करून बघा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com