
गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. गुढीपाडवा- साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. चैतन्यानं भारलेला दिवस. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात. या सणाभोवती माझ्या भरपूर आठवणी आहेत.
फ्युजन किचन : श्रीखंड पुरी टार्ट
- नीलिमा नितीन, फूड ब्लॉगर
वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः तथैव नववर्षेऽस्मिन् नूतनं यश आजुहि ॥
सूर्य संवेदना षुष्पैः दीप्तिः कारुण्यगंधने।
लब्ध्वा शुभं नववर्षेऽस्मिन्
कुर्यात्सर्वस्य मंगलम् ||
गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. गुढीपाडवा- साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. चैतन्यानं भारलेला दिवस. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात. या सणाभोवती माझ्या भरपूर आठवणी आहेत. लहानपणी या दिवशी प्रथम हनुमानाचं दर्शन घेण्याची आमच्या घरची प्रथा.
मग काय सकाळी पाच वाजता उठून डोळे किलकिले करून, जेणेकरून दुसरं कोणी प्रथम दिसणार नाही आणि आपणही धडपडणार नाही याची काळजी घेत आम्ही भावंडं एकमेकाचा हात घेऊन मंदिरात जायचो. देवाला नमस्कार केल्यावरच डोळे पूर्ण उघडायचो. या सर्व धांदलीतही मज्जा यायची. आजही मंदिरात जाणं होत नसलं तरीही देवघरातल्या देवाचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. मग लगबग सुरू होते ती गुढी उभारायची, स्वयंपाकाची.
आजचा स्वयंपाकाचा बेत तसा ठरलेला असतो. त्यामुळे करण्यास फारसा वेळ लागत नाही. चित्रान्न, भजी, पापड, कोशिंबीर, बटाट्याची भाजी, आणि श्रीखंड-पुरी असा तामझाम बहुतेक सगळ्यांच्या घरी दिसून येतो. याच पारंपरिक रेसिपीचं ‘फ्युजन’ स्वरूप आज मी घेऊन आले आहे. आजची रेसिपी आहे श्रीखंड पुरी टार्ट. नेहमीच्या श्रीखंडापेक्षा हे थोडंसं वेगळं आहे आणि आपण ते वेगळ्या पद्धतीनं सर्व करणार आहोत. म्हणजे अगदी पाडव्यालाच नाही, तर एरवी पार्टीजमध्ये पाहुण्यांना सर्व्ह करण्यासाठी ही अतिशय छान रेसिपी आहे.
साहित्य
श्रीखंडासाठी : साईच्या दह्याचा चक्का पाव किलो, पिठीसाखर अर्धी वाटी किंवा आवडीप्रमाणे, रोझ सिरप चार ते पाच टेबलस्पून, गुलकंद पाव वाटी, रोझ इसेन्स दोन ते तीन थेंब (आवड असल्यास), पिस्ता काप, गुलाबाच्या पाकळ्या सजावटीसाठी.
टार्ट बनवण्यासाठी : मैदा एक वाटी, मोहनासाठी तूप तीन ते चार चमचे, मीठ चिमूटभर, तळण्यासाठी तेल.
कृती
प्रथम मैदा आपण करंजीला भिजवतो तसा मोहन व मीठ घालून घट्ट भिजवून बाजूला ठेवून द्यावा.
दुसरीकडे मलई चक्का घेऊन त्यात पिठीसाखर, रोझ सिरप, गुलकंद घालून व्यवस्थित करावं, मिक्स करावं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यावं.
वर भिजवलेल्या पिठाची वाटी अर्थात टार्ट शेप तळून घ्यावेत. नंतर यात आपण तयार केलेल्या श्रीखंड पायपिंग बॅगच्या साह्याने व्यवस्थित भरावं.
वरून पिस्ता गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवावं.
हे श्रीखंड अतिशय चविष्ट लागतं