Food News ओडिशात घरोघरी पखाल दिन साजरा | Pakhal Day celebrated at home Odisha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

food news

Food News : ओडिशात घरोघरी पखाल दिन साजरा...

भुवनेश्‍वर : ओडिशातील नागरिकांना पारंपरिक खाद्यपदार्थांवर अतिशय प्रेम असते. यातील एक म्हणजे ‘पखाल’. कडक उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी हा पदार्थ घरोघरी बनवितात. या खास पारंपरिक पदार्थाचा आधुनिक युगात प्रसार करण्यासाठी ‘पखाल दिन’ राज्यात साजरा केला जातो.

ओडिशाने त्यांची पारंपरिक व्यंजने जगभरात पोचविण्यासाठी हा उपक्रम २० मार्च २०१५ पासून सुरू केला आहे. आरोग्यदायी आणि रुचकर पखाल म्हणजेच आंबवलेला भात हा उन्हाळ्यात शरीराला शीतलता तर देतोच पण पचण्यासही तो हलका असतो. दही, काकडी, जिरे, तळलेला कांदा, कढीपत्त्याच्या फोडणीने भात अधिक चविष्ट बनतो.

पखालबरोबर तळलेले बटाटे (अलू भजा), वांग्याचे तळलेले काप (बैगण भजा), बडी चुरा (तांदूळ आणि मसूरपासून तयार केलेला पदार्थ), तळलेल्या हिरव्या भाज्या (साग भजा), तळलेले मासे (मच्छा भजा) आणि लाल भोपळ्याच्या तळलेल्या बिया असे तोंडीलावणे असल्याने भोजन लज्जतदार होते.

‘पखाल’ हा शब्द संस्कृतमधील ‘प्रख्याला’ या शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ ‘पाण्याने धुणे’ असा होतो. परंपरागत पद्धतीनुसार शिळ्या भातापासून पखाल तयार करतात. असा भात एका मातीच्या भांड्यात ठेवून त्यात पाणी घालतात.

वरून थोडे दही घालतात किंवा लिंबू पिळतात. सात-आठ तासानंतर भात आंबतो आणि ‘पखाल’ तयार होतो. ‘पखाल’ची महती पर्यटक आणि अन्य माध्यमांतून देश आणि जगभर पोहोचविण्यासाठी ओडिशातील लहान-मोठ्या हॉटेलच्या मेन्यूत हा पदार्थ हमखास दिसतो. पखाल दिनानिमित्त काही तारांकित हॉटेलमध्येही तो उपलब्ध केला जातो.

अन्य राज्यांतही लोकप्रिय

हा पदार्थ केवळ ओडिशातच नाही, तर शेजारील पश्‍चिम बंगाल, झारखंड, आसाम, छत्तीसगड आणि तमिळनाडूतही तो लोकप्रिय आहे. वेगवेगळ्या प्रदेशांत त्‍याला वेगळी नावे आहेत. बंगालमध्ये त्याला ‘पंता भात’ म्हणतात, तर झारखंड व छत्तीसगडमध्ये तो ‘पाणी भात’ असतो. आसाममध्ये ‘पोयटा भात’, तर तमिळनाडूत पखालची ओळख ‘पझाया सादम’ अशी आहे.