ग्लॅम-फूड : ‘स्वयंपाक करणे, हे एखाद्या थेरपीसारखे’ | Food | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pariva pranati
ग्लॅम-फूड : ‘स्वयंपाक करणे, हे एखाद्या थेरपीसारखे’

ग्लॅम-फूड : ‘स्वयंपाक करणे, हे एखाद्या थेरपीसारखे’

- परिवा प्रणती

मला संगीत ऐकण्‍याचा आनंद घेत स्वयंपाक करायला आवडते. तसेच विविध प्रयोग करायला आवडते आणि कॉन्टिनेन्‍टल खाद्यपदार्थ करायला खूप आवडतात. घरात शिल्लक राहिलेल्या पोळ्यांबाबत मी प्रयोग करते. त्यांचा वापर करून मी मस्तपैकी सँडविचेस बनवते.

मी दिल्‍लीमध्‍ये शिक्षण घेतले आहे, त्‍यामुळे दिल्‍लीच्‍या ‘स्ट्रीट फूड’चा आस्‍वाद घेतल्‍याशिवाय राहूच शकले नाही. आता मुंबई हे आणखी एक शहर मिळाले आहे, जे स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे मुंबईतही आस्वाद सुरू असतोच. मी नुकताच नागपूरमधल्या प्रसिद्ध ऑरेंज बर्फीचा आस्‍वाद घेतला आहे आणि मला ती खूपच आवडली. पाणीपुरी हा माझी आवडता पदार्थ आहे.

सध्या मी ‘सोनी सब’वरील ‘वागले की दुनिया - नयी पिढी नये किस्‍से’मध्‍ये वंदना वागलेची भूमिका साकारत आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी फारसा वेळ मिळत नाही. पण, स्वयंपाक करणे ही गोष्ट माझ्यासाठी थेरपीसारखी आहे. मी उत्तमरीत्‍या सगळे पदार्थ बनवू शकते आणि संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेते. मी स्‍वादिष्‍ट अमृतसर छोले, काही चायनीज रेसिपीज व केक्‍स बनवू शकते. माझ्या मते, एखादा पदार्थ आवडतच नाही असे शक्यतो नसावे; पण अगदीच नावडती गोष्ट सांगायची म्हटली, तर दुधी भोपळा आणि पडवळ खाणे मी टाळते.

आम्‍ही अनेकदा गेट-टुगेदर्स करतो आणि अशा गेट टुगेदर्समध्ये माझ्या पाककुशल काकूंनी बनवलेले खाद्यपदार्थ मला आवडतात. माझे पती उत्तम स्वयंपाक करतात. ते अगदी चविष्‍ट पोहे, पावभाजी व स्‍वादिष्‍ट सँडविच बनवतात. माझ्या आईने बनवलेले चायनीज फूड मला खूप आवडते. आई उत्तम स्वयंपाक करते. चायनीजबरोबरच तिने बनविलेले सामोसे व चाट, बेक केलेले बन्‍स व केक्‍स हे पदार्थ मला खूप आवडतात. ती ज्‍वारी आणि बाजरीच्‍या पिठाचे फ्रूट फ्लेवर्ड केक्‍स बनवण्‍यामध्‍ये कुशल आहे. ती खाद्यपदार्थामध्‍ये ताज्‍या लसूण-आल्‍याची पेस्‍ट टाकते, ज्‍यामुळे खाद्यपदार्थाला वेगळी चव मिळते. मी प्री-पॅकिंग केलेले मसाले व पेस्‍ट्स टाळते.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

loading image
go to top