लाडू आधी होता औषध; आता झाला मिठाई ते गोड पदार्थ!

Ladu
Ladu

राष्ट्रीय गोड पदार्थ म्हणून जर कोणत्या पदार्थाची निवड करायची असेल, तर ‘लाडू’ सर्वांत अग्रस्थानी असेल. देशाच्या कुठल्याही कानाकोप-यात गेल्यास लाडूचे वेगवेगळे प्रकार पाहायला, चाखायला मिळतातच, पण त्यामागचा इतिहास आणि उपयोगही अचंबित करून टाकणारा आहे.

कुठलाही मोठ सण उत्सव वा आनंदाचा छोटाचा क्षण असो, तोंड गोड करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा ज्या पदार्थाचं नाव मुखी येतं ते म्हणजे ‘लाडू’ होय.

बदललेली जीवनशैली पाहता डॉक्टरांनी लाडू खाण्यावर बंधनं आणली असली तरी त्याचा पहिल्यांदा वापर हा औषध म्हणून केला गेला होता. लाडूचा सर्वात सुरूवातीचा उल्लेख कुठे आढळत असेल तर तो म्हणजे ‘नलपाकशास्त्र' या प्रसिद्ध ग्रंथात. त्यामध्ये तिळगुळाच्या लाडूबद्दलची माहिती नमूद करण्यात आलेली आहे. त्याकाळी रोग्यावरील उपचारानंतर त्याला तिळगुळाचा लाडू दिला जात असे. तीळ, गूळ आणि शेंगदाण्यापासून तयार होणारा हा लाडू रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उत्तम असल्याने तो रोग्यावर अँटी सेप्टिक म्हणून काम करत असे.

तसेच ज्या स्त्रियांची पाळी जात आहे (मोनोपॉज) आणि ज्यांना पाळीमध्ये त्रास होतो, अशांसाठी तिळगूळ हे उत्तम औषध आहे. म्हणून तिळाचा लाडू खायला दिला जात असे. एवढंच नव्हे तर, पूर्वीच्या काळी वयात आलेल्या मुलींमधील राग उत्पन्न करणा-या संप्रेरकांवर नियंत्रण ठेवणारं औषध म्हणूनही विशिष्ट प्रकारचे लाडू खायला दिले जात असत. लाडूला असलेला गोल आकार कसा प्राप्त झाला याबाबतही अनेक कथा सांगितल्या जातात.

त्यापैकी खात्रीलायक कथा म्हणजे जगातील पहिला शल्यचिकित्सक म्हणून ओळख असलेला सुश्रृत रूग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांना विविध घटकांपासून तयार केलेली औषधे देताना त्यामध्ये गूळ किंवा मध टाकून त्याचा गोळा तयार करत असे. जेणेकरून औषधे प्रवासासाठी आणि खाण्यास सहजसुलभ होतील. पुढे हाच तर्क लावून टिकाऊपणा आणि प्रवासादरम्यानची हाताळणी लक्षात घेता विविध प्रदेशांतील लोकांकडून स्थानिकरित्या उपलब्ध घटकांपासून लाडू तयार करण्याची पद्धत रूढ झाली.    

दक्षिण भारतातील 'नारियल नाकरू’ हा पदार्थ लाडवाचा अतिशय जुना वंशज मानला जातो. नारळापासून तयार केलेले लाडू चोला साम्राज्यात सैनिक लढाईवर जाताना शुभेच्छांचं प्रतिक म्हणून त्यांच्यासोबत दिले जात. वेदिक काळातील भगवान मुरूगाला त्या काळापासून आजतागायत बाजरीपासून तयार करण्यात आलेले लाडू चढविले जातात. लाडू तयार करण्यासाठी गूळ आणि मधाचा वापर फार पूर्वीपासूनच केला जात असला तरी ब्रिटिश भारतात दाखल झाल्यानतर लाडू ख-या अर्थाने बदलला.

कारण ब्रिटिशांसोबत भारतात साखरेचे आगमन झाले आणि एकेकाळी औषध म्हणून खाल्ला जाणारा लाडू साखरेतील गुणधर्मांमुळे विष (शरीराला अपायकारक गोड पदार्थ) समजला जाऊ लागला. ब्रिटिशांनी जशी साखर आणली त्याचप्रमाणे पर्शियन लोकांनी खजूर, विविध फळे आणि त्यांच्या बियांची लाडूच्या वापरात सुरूवात केली. अशाप्रकारे प्रत्येकवेळी भारतात दाखल झालेले व्यापारी, राज्यकर्ते, स्थलांतरीत लोकांनी आपल्या संस्कृतीतील घटकांचा लाडूमध्ये मोठ्या खुबीने वापर केला आणि त्याला चवदार बनविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com