रेसिपी : आलू कटोरी चाट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

चाटचे अनेक प्रकार तुम्ही आजवर खाल्ले असतील, पण त्याला थोडासा ट्विस्ट देऊन काहीतरी वेगळं नक्कीच करता येईल. रोजच्या जेवणात आवर्जुन वापरल्या जाणाऱ्या बटाट्याचं बास्केट कसं करायचं, याची रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत.

चाटचे अनेक प्रकार तुम्ही आजवर खाल्ले असतील, पण त्याला थोडासा ट्विस्ट देऊन काहीतरी वेगळं नक्कीच करता येईल. रोजच्या जेवणात आवर्जुन वापरल्या जाणाऱ्या बटाट्याचं बास्केट कसं करायचं, याची रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत. 

साहित्य - अर्धा किलो बटाटे (साधारण ३ मोठे), कॉर्नफ्लोर (मक्याचं पीठ), मीठ, तेल, दही, उकडलेले चणे, उकडलेले बटाटे, एक कापलेला टोमॅटो, चिंचेची चटणी, चाट मसाला, शेव, कोथिंबीर. 

कृती - बटाट्यांना चांगले सोलून घ्या. एका भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन त्यामध्ये बटाटे किसणीने किसून घ्यावे. किसलेल्या बटाट्याला स्वच्छ पाण्यात टाकून नंतर गाळणीने पाणी वेगळे करावे. एका कोरड्या कपड्यामध्ये किसलेल्या बटाटे घ्यावेत आणि राहिलेले पाणी काढून टाकावे. राहिलेल्या किसलेल्या बटाट्यामध्ये एक चमचा मीठ, एक टेबलस्पून कॉर्नफ्लोर टाकून चांगले एकजीव करुन घ्यावे. किसलेल्या बटाट्यांचे तळून बास्केट करण्यासाठी एक लहान आणि एक मोठी अशा दोन वेगवेगळ्या आकाराच्या गाळण्या घ्याव्यात. मोठ्या आकाराच्या गाळणीमध्ये बटाट्याचा किस घ्या आणि गाळणीच्या आकारप्रमाणे त्यावर जोर द्या. जेणेकरुन तळल्यावर त्याला बास्केटप्रमाणे शेप येईल. त्यामध्ये लहान आकाराची गाळणी ठेवा. तळताना बटाट्याचा किस बाहेर येऊ नये, त्यासाठी ही लहान आकाराची गाळणी ठेवणे आवश्यक आहे. गरम तेलात मध्यम आचेवर गाळणीसह तळून घ्यावे. गाळणीतून बास्केट चाकूच्या साहाय्याने अलगद काढावे. तुमचे आलू बास्केट तयार आहे!

चाट तयार करण्यासाठी - एका भांड्यामध्ये दही, उकडलेले चणे, बटाटे, बारीक कापलेला टोमॅटो, चिंचेची चटणी, शेव, चाट मसाला, कोथिंबीर घ्यावे आणि मिश्रण करावे. यामध्ये तुम्ही मक्याचे दाणे, डाळिंबाचे दाणेही टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे चाट तयार करा. तयार केलेले चाट आलू बास्केटमध्ये टाकून सजवा. तुमचे आलू चाट बास्केट तयार आहे!  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recipe aalu katori chat