esakal | ग्लॅम-फूड : ‘खवय्येगिरीवर मनापासून प्रेम’
sakal

बोलून बातमी शोधा

Sonam Kapoor

ग्लॅम-फूड : ‘खवय्येगिरीवर मनापासून प्रेम’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सोनम कपूर

सोनम कपूर पुरेपूर ‘फूडी’ आहे. एकीकडे ‘डाएट प्लॅन’ ती काटेकोरपणे पाळत असली, तरी आवडत्या पदार्थांची वेळ येते, तेव्हा मॅडम आस्वादाची संधी सोडत नाहीत. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू; पण काही वर्षांपूर्वी सोनमनं तिचे वडील अनिल कपूर यांच्याबरोबर एका पार्टीतल्या स्पर्धेत तब्बल तीसपेक्षा जास्त सामोसे फस्त केले होते, असं खुद्द तिच्या आईनं एका शोमध्ये सांगितलं होतं. मात्र, याच सोनमनं चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी जिभेवर नियंत्रण ठेवून वजन तब्बल ३५ किलो कमी केलं होतं.

थाई, जापनीज आणि व्हिएतनामीज प्रकारचं फूड सोनमला आवडतं. तिच्या आवडत्या पदार्थांची रेंज अतिशय वैविध्यपूर्ण आहे. तिला सगळ्या प्रकारचं ‘स्ट्रीट फूड’ आवडतं. भेळ, पाणीपुरी काहीही. हे ‘स्ट्रीट फूड’ आत्ता खाता येत नाही याची तिला खंत वाटते. वांद्रेमधल्या एल्को पाणीपुरी सेंटरसारखी पाणीपुरी कुठंही बनत नाही, असं तिचं ठाम मत आहे. विलेपार्लेमधल्या अमर ज्यूस सेंटरमधली पावभाजीही तिच्या आवडीची. आर्यभवनमधली इडली तिला खूप आवडते. मुंबईत बाबुलनाथ मंदिरजवळच्या ब्रिजवासी सेंटरमधलं मसाला दूध खूप छान असतं, असं ती सांगते. प्रकृती उत्तम राहण्यासाठी नारळाचं पाणी, ताक आणि काकडीचा ज्युस पीत राहणं ती पसंत करते. सोनमला स्वयंपाकसुद्धा करायला आवडतो. विशेषतः स्वीट डिशेस करायला तिला आवडतात आणि सुजी का हलवा आणि मावा केक या तिच्या हातखंडा पाककृती आहेत.

मुंबईतलं सगळ्या प्रकारचं फूड आवडत असलं, तरी दिल्लीतली खाद्ययात्राही सोनम चुकवत नाही. तिच्या आईचं माहेर दिल्लीतलं असल्यानं तिथल्या पदार्थांसाठी तिच्या ‘पोटात’ विशेष जागा आहे. दिल्लीतल्या बेंगाल स्वीट हाऊस, पराठेवाली गल्ली आणि जेएनयूबाहेरच ढाबे लई भारी! ‘दिल्ली-६’साठी शूटिंग करत असताना चांदनी चौकातली पाणीपुरी आणि चाट तिनं चुकवली नाही. शूटिंगला गेली तरी सोनम ‘घर का खाना’च पसंत करते. टोमॅटो आणि कांदा असलेली भेंडीची भाजी असली तरी मॅडम खूश!

loading image
go to top