पौष्टिक खा, तंदुरुस्त राहा... (Sunday स्पेशल)

Food
Food

हिवाळ्यात आरोग्यसंवर्धनासाठी जसा व्यायामावर भर दिला जातो, तसेच आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास फिटनेस तर साधतोच, शिवाय आजार आणि इतर संसर्गांनाही दूर ठेवता येते. सर्दी, पडसे, विषाणूंची बाधा यांच्यापासून दूर राहायला मदत होते. मग खावे तरी काय, याविषयी...

हिवाळ्याला सुरुवात झाली, की आहार- विहाराकडे लक्ष दिलेच पाहिजे, असे प्रत्येकाला वाटू लागते. व्यायामासाठी कधीही लवकर न उठणाऱ्यांची पावले आपोआपच सकाळी सकाळी जॉगिंग ट्रॅक, मैदाने याकडे वळू लागतात. जिममधील गर्दी वाढू लागते. व्यायामाने तालमी घुमू लागतात. मग सुरू होतो खुराक... परंपरेनुसार डिंकाचे लाडू, सुकामेवा यांना हिवाळ्यात मागणी वाढू लागते. नाही म्हटले तरी अग्नी प्रदीप्त झाल्याने भूक वाढू लागते. खाऊ तेवढे पचू लागते. काहीजण भूक खूप लागते, असे सांगू लागतात. तरीही हिवाळ्यात आरोग्यसंवर्धन करत असताना, वजन कमी करणे किंवा वाढवत असताना आहार नेमका काय घेतला पाहिजे, काय खाल्ले पाहिजे आणि का व किती हेही महत्त्वाचे असते. हे लक्षात घेऊन आहाराकडे लक्ष दिले तर त्वचासंवर्धन, थंडीत हमखास होणारे सर्दी, पडसे, संसर्ग यांच्यासारखे आजार, जीवनसत्त्वांच्या कमतरतेने होणारे आजार टाळता येऊ शकतात किंवा किमान त्यांना शक्‍य तितके दूर तरी ठेवता येते.

हिवाळ्याला प्रारंभ होतो तेव्हा स्वाभाविकपणे तापमानाचा पारा उतरू लागतो. थंडीच्या कडाक्‍याला सोसता येईल, यासाठी शरीरातही बदल होऊ लागतात. त्याची गरज लक्षात घेऊन शरीरात रोगप्रतिबंधक ताकद निर्माण करावी लागते, त्यासाठी आरोग्यवर्धक आहाराची गरज असते.

जीवनसत्त्व सी (क) - हिवाळ्यात साधारणतः सर्दी, पडसे यांसारखे आजार बळावतात. नव्हे, हंगामात कधी ना कधी ते आपल्याला गाठतातच. अशावेळी अँटिऑक्‍सिडंट असलेल्या क जीवनसत्त्वाच्या सेवनाने आपल्या शरीरात रोगप्रतिबंधक शक्ती वाढू लागते. हे जीवनसत्त्व हिवाळ्यातील विषाणूबाधेला पुरून उरायला मदत करते.

जीवनसत्त्व ई - हिवाळ्यात बहुतांश जणांना त्वचा कोरडी पडण्याचा त्रास होतो. अशावेळी त्वचेचे आरोग्य राखणे महत्त्वाचे असते. त्यासाठी ई जीवनसत्त्व मोलाची कामगिरी बजावते. 

ओमेगा थ्री फॅटी ॲसिड - जळजळ कमी करण्यासाठी हे फॅट उपयुक्त या वर्गात मोडते, त्याला ‘गुड फॅटी ॲसिड’ असेही म्हणतात. शरीरात ऊर्जा निर्माण करून ओमेगा थ्री फॅटी ॲसिड त्वचेची झीज भरून काढतात.

जीवनसत्त्व अ - अँटिऑक्‍सिडंड असलेले जीवनसत्त्व अ आरोग्यसंवर्धन, शरीर सुदृढ राखण्यासाठी उपयुक्त ठरते.

वरील जीवनसत्त्वे ज्या- ज्या प्रकारच्या फळे, भाजीपाला, सुकामेवा, मसाले, पोल्ट्रीमध्ये विपुल प्रमाणात आढळतात, त्यांची यादी सोबत दिली आहे.
फळे : किवी, आवळा, ॲव्होकॅडो, संत्री, मोसंबी, टोमॅटो, अननस.
भाजीपाला : ब्रोकोली, फ्लॉवर, पालक, गाजर, ढोबळी मिरची.
सुकामेवा आणि इतर : बदाम, सूर्यफुलाच्या बिया, जवस, अक्रोड, किया बिया, बाजरी, नाचणी, मोहरी.
वेलदोडे, काळी मिरी.
पोल्ट्री : अंडी, माशाचे तेल, सालमन, टुना, चीज, शुद्ध तूप.
इतर : खाण्याचा डिंक, गूळ, ऑलिव्ह तेल.

हिवाळ्याला जशी सुरवात होते तशी रात्र मोठी, दिवस लहान होऊ लागतो. डी जीवनसत्त्व चरबी कमी करणारे म्हणून ओळखले जाते. एकूण निरोगी राहण्यासाठी जीवनसत्त्व डी आवश्‍यक असते. ते आपल्या प्रामुख्याने मिळते ते सूर्यकिरणांतून, ते अन्नपदार्थांतून तुलनेने खूप कमी मिळते. त्यामुळेच शक्‍यतो, दररोज सकाळी कोवळ्या उन्हात फिरायला गेलेले निश्‍चितच उपयुक्त ठरू शकते. त्याने शरीराला आपसूकच हे जीवनसत्त्व मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com