
कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. तर, रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते.
घोडेगाव : रानभाज्या या जास्त करून जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात येतात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी रानभाज्यांचे महोत्सवही भरविण्यात येतात. उत्तर पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेतील आदिवासी भागात या भाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात.
- ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
पावसाची रिपरिप सुरू झाली, की रानभाज्याही डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात. त्यामुळे रानभाज्या आवर्जून बनवून खाल्ल्या जातात. आंबेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या अभयारण्यात पावसाळ्यात रानभाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात.
अभयारण्याजवळील आहुपे गावात आदिवासी बांधव काही मोबदला घेऊन येणाऱ्या नागरिकांना माहिती नसलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्या, लालसर भाकरी, ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी, चपाती अन् घरगुती तांदळाचा भात खाऊ घालतात अन् रानभाज्यांची माहिती सांगतात.
- पौष्टिक खा, तंदुरुस्त राहा... (Sunday स्पेशल)
शहरी भागातील नागरिकांना भाजी म्हटले की अळू, मेथी, पालक, कोबी, फ्लॉवर, बीट, तोंडली, कारले, भोपळा, काकडी अशा मोजक्याच ठरावीक भाज्यांची नावे माहीत असतात. मात्र, कधी नावही ऐकलेले नाही अशा नावांच्या भाज्या पाहण्याची, खरेदी करण्याची आणि या रानभाज्यांचा आस्वाद घेण्याची संधी या भागात उपलब्ध आहे.
रानभाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या आदिवासी महिला शहरी भागात बाजारात त्या विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, या रानभाज्यांची माहिती नसल्याने कोणी विकत घेण्यास लवकर तयार होत नाही. ज्या व्यक्तीला त्याची माहिती आहे तीच व्यक्ती या भाज्या विकत घेताना दिसून येत आहे.
- अख्खं गाव कांदा-लसूण खात नाही! काय असेल कारण?
विषारी-बिनविषारी
रानभाज्यांतील काही भाज्यांमध्ये विषद्रव्ये असतात. ती नेमकी ओळखता आली नाहीत, तर त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते. भाज्या काढल्यावर त्यात खडे मीठ घालून उकळवून घेतल्या जातात. तर, काही रानभाज्यांच्या देठाकडचा चीक काढूनच त्या शिजवल्या जातात. या भाज्यांचा रंग, वास आणि आकार यावरून ते विषारी-बिनविषारी म्हणून ओळखले जाते. रानभाज्यांमध्ये काही भाज्या थंड तर काही उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात.
- फ्रीजमधील पीठाच्या पोळ्या खाताय? मग हे वाचा...
विविध रानभाज्या
कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. तर, रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते. टाकळ्याच्या पानांचा लेप विविध त्वचाविकारांवर लावतात. या भाजीला 'तखटा' असेही म्हणतात. कोंब आलेली भारंगी, शेकट्यांच्या भाजीमध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू व कुवाळूची भाजी ही गवतासारखी असते. त्यामुळे यात अनेकदा विषारी गवतही वाढते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात. पातेरे, भारंग, बिंडासारख्या रानभाज्या बिनविषारी व सुरक्षित असतात.
- कोल्हापूरपेक्षा 'या' गावात मटणाचा दर जादा
पौष्टिक गुणधर्म
ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र, त्यात पौष्टिक गुणधर्मही अधिक असतात. करटुलसारख्या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्त्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात. आघाडा, माळा, पुननवर्वा, कर्डू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वागोटी, टाकळा, आंबाडी, भोकर, खडकतेरी, भोवरी यासारख्या भाज्यांमध्ये जस्त, तांबे, कॅल्शियम याचे प्रमाण अधिक असते.
रानभाज्यांचे उत्सव
रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी रानभाज्यांचे उत्सवही भरविण्यात येतात. रानभाज्यांची चव चाखायला भेटते. शहरी नागरिकांना भाज्यांची ओळख व्हावी आणि फायदा व्हावा, या उद्देशाने हे उपक्रम राबविले जात आहेत. यात प्रत्येक व्यक्तीला या नैसर्गिक पद्धतीने येणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व पटवून सांगितले जाते.
यामध्ये माड, चावा वेल, टेरा, कर्टुल, शेऊळ, लोथी, सतरा, हळंदा, शेवळे, कोरड, शेवगा, तेरे, कुडाची फुल, घोळ, रताळ्याचे कोंब, टेंभरण, भोपा, बोंडारा, चायवळ, मोखा आदी वेगवेगळ्या रानभाज्यांचा समावेश असतो. आज जगभरातील शास्त्रज्ञ देशी रानभाज्यांकडे वळले आहेत.