तिखट तरीही न बाधणारं नॉनव्हेज खायचंय? चला ‘सावजी खमंग’ला!

सुवर्णा येनपुरे-कामठे
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सावजी व वऱ्हाडी म्हणजे आहाहा! चटपटीत, मसालेदार, खूप तिखट असेच सावजी व वऱ्हाडीचे वर्णन केले जाते. सावजी व वऱ्हाडी खायचा कितीही मोह झाला तरी त्याच्या तिखट चवीमुळे पोट खराब होईल, अपचन होईल या भीतीने अनेक जण खव्वये असूनही सावजी व वऱ्हाडीचा मोह टाळतात.

Image may contain: food

त्यात पुण्यात अस्सल सावजी व वऱ्हाडी मटण-चिकन मिळेलच का, इथपासून प्रश्‍न सुरू होतात. परंतु, आपल्या जिव्हेची ही इच्छा ‘सावजी खमंग’ पूर्ण करते. सावजी तसेच वऱ्हाडी चिकन, मटण मिळण्याचे हे खास ठिकाण! तिखट तरीही न बाधणाऱ्या सावजी व वऱ्हाडीची नवी ओळख करून दिली ती सूचक आणि प्रियंका गायगोले या जोडप्याने!

आई डबे करत असल्याने सूचक यांना खाद्यसंस्कृतीची ओळख घरातूनच झाली. खास वऱ्हाडी आणि सावजी मसाला योग्य प्रमाणात कसा तयार करावा. तिखट असले तरीही ते बाधू नयेत यासाठी भिवापुरी मिरचीचा वापर केला जातो, याचा दोघांनीही अभ्यास केला. तसे दोघेही आयटी क्षेत्रात काम करणारे, आफ्रिका, दुबई यांसारखे अनेक देश फिरल्यानंतर स्वतःचे हॉटेल सुरू करण्याचा विचार त्यांनी दुबईतच पक्का केला. त्यातच सूचक यांना पुण्यातून काम करण्याची संधी मिळाली... आणि मग ठरले, पुणे हीच आपली कर्मभूमी होणार! 

Image may contain: food

खव्वये म्हणून पुण्याची ओळख आहे. पण इथल्या लोकांना तिखटाची फार सवय नाही त्यामुळे सावजी व वऱ्हाडी इथे चालतील का, या सभ्रमात कोरेगाव पार्क येथे त्यांनी पहिली शाखा उघडली. पुणेकरांच्या आवडीप्रमाणे तिखटाच्या तीन लेव्हल इथे उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यानंतर कोरेगाव पार्क येथे मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर बाणेर येथे ‘सावजी खमंग’ची दुसरी शाखा सुरू केली.   

Image may contain: food

इथे चिकन सावजी, वऱ्हाडी थाळी, मटण सावजी, सुके चिकन, सुके मटण, वऱ्हाडी मॅगी, मटण खूर, मटण बिर्याणी, रोल, पाटवाडी सावजी याबरोबरच त्यांनी चायनीजही सुरू केले. चायनीज बनवताना इथे लाल रंग, मैदा, कॉर्नफ्लॉवर आदींचा वापर केला जात नाही. प्रियंका व सूचक यांना चायनीज आवडत असल्याने त्यांनी खास लहान मुलांनाही खाता येईल असे चायनीजही इथे सुरू केले. इथे आपल्याला चायनीज नुडल्स, लॉलीपॉप, कोरियन डिशही खायला मिळते. ‘ताईयांग’ या नावाने इथे चायनीज सर्व्ह केले जाते. 

इथे गेल्यावर इथली पुरणपोळी खायला अजिबात विसरू नका. तोंडात ठेवल्यावर लगेचच विरघळणारी ही पुरणपोळी खव्वयांसाठी पर्वणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weekend hotel suvarna yenpure kamthe sutaria maitrin supplement sakal pune today