Zomato सबस्क्रायबर्स असाल तर वाचा, ग्राहकांसाठी केलीय मोठी घोषणा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

कोरोनामुळे जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर आता हळू हळू काही व्यवसाय सुरू झाले आहेत. यामध्ये हॉटेल व्यवसायही पुन्हा सुरू होत आहे. 

नवी दिल्ली - कोरोनामुळे जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर आता हळू हळू काही व्यवसाय सुरू झाले आहेत. यामध्ये हॉटेल व्यवसायही पुन्हा सुरू होत आहे. दरम्यान ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणारी कंपनी झोमॅटोने मंगळवारी त्यांचा लोकप्रिय गोल्ड मेंबरशिप प्रोग्रॅम रिब्रँड केला आहे. आता हा प्रोग्रॅम झोमॅटो प्रो म्हणून असेल. यामध्ये अनेक डिस्काउंट आणि फायदे मिळणार आहे. जगातील दहा देशांमध्ये झोमॅटो गोल्ड मेंबर्स आहेत. त्यांची मेंबरशिप एक ऑगस्टपासून आपोआप झोमॅटो प्रोमध्ये बदलेल. झोमॅटोकडून याबाबतची माहिती ब्लॉगमध्ये देण्यात आली आहे. 

झोमॅटो प्रो मेंबर्सना अनेक फायदे मिळणार आहे. यात झोमॅटो अॅप आणि मनी बॅक गॅरंटी असणार आहे. झोमॅटो प्रो मेंबर्सना आधीच्या गोल्ड मेंबरशिपच्या ऑफरनुसार रेस्टॉरंटची निवड करता येणार आहे. यामध्ये रेस्टॉरंट, कॅफे, बार आणि अनेक सर्व्हिस रेस्टॉरंटचा समावेश आहे. प्रो मेंबर्सना डिलिव्हरीमध्ये प्राधान्य मिळणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झोमॅटोने गोल्ड प्रोग्रॅम लाँच केला होता. डिलिव्हरी सर्विसमध्ये ग्राहकांना इन होम ऑर्डरमध्ये अनेक ऑफर दिल्या जात होत्या. 

मास्टर शेफ विकास खन्ना तिसऱ्या पीएचडीच्या तयारीत, ट्विटरवरून दिली माहिती

कोरोनामुळे सध्या हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. या व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी कंपन्या प्रयत्न करत आहेत. झोमॅटो आणि स्विगीने मे महिन्यात नोकर कपात जाहीर केली होती. लॉकडाऊनच्या काळात जवळपास 60 ते 70 टक्के होम डिलिव्हरी आणि ऑर्डरचे प्रमाण कमी झाले. अनलॉक केल्यानंतर भारतात होम डिलिव्हरीमध्ये पुन्हा वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे. अनेक रेस्टॉरंट पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले आहेत. मात्र हॉटेलमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण घटले असून ते पुर्ववत होण्यास वेळ लागेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

झोमॅटोने दिलेल्या माहितीनुसार गोल्ड मेंबरशिपच्या ग्राहकांना झोमॅटो प्रो मेंबरशिपचे फायदे आपोआप मिळतील. यामध्ये डिलिव्हरीमध्ये प्राधान्य मिळेल. यामुळे 15 ते 20 टक्के लवकर ऑर्डर मिळणार असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली. मनी बॅक गॅरंटी ही झोमॅटोच्या प्रो आणि गोल्ड दोन्ही मेंबरशिपवर असेल असंही कंपनीने सांगितलं. 
हे वाचा - रेसिपी : मिक्स भाज्यांचे चटपटीत लोणचे

फूड डिलिव्हरीमध्ये दिल्या जाणाऱ्या डिस्काउंटवरून गेल्या वर्षी झोमॅटो चर्चेत आलं होतं. अनेक रेस्टॉरंटनी झोमॅटोच्या या सिस्टिमवरून टार्गेटही केलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: zomato rebrand gold plan into pro will get more offers