Ganeshotsav 2022: साताऱ्याच्या खिंडीतील गणपतीचा इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lord Ganesha in Satara Pass

Ganeshotsav 2022: साताऱ्याच्या खिंडीतील गणपतीचा इतिहास

गणपती हा नवसाला पावणारा देव आहे. गणपतीच्या भक्तांची संख्या अफाट आहे. नवसाला पावणाऱ्या गणपतीचे देवस्थान देशभरामध्ये अनेक आहेत. त्याचप्रमाणे सातारा या ऐतहासिक शहरात सुद्धा नवसाला पावणाऱ्या गणपतीचे अतिशय सुंदर देवस्थान आहे. या शहरात दक्षिण बाजूला सज्जनगड रस्त्याच्या डाव्या बाजूस निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं देवस्थान आहे. नवसाला पावणारा असा प्रसिद्ध खिंडीतील गणपती आणि कुरणेश्वर देवस्थान या श्रद्धास्थानी भक्तांची गर्दी होत असते. नागरिकांमध्ये सातारकरच नव्हे तर परप्रांतामधून आलेल्या भाविक आणि पर्यटकांचा देखील समावेश असतो. येथे पर्यटक फक्त देवदर्शनासाठीच येतात असे नाही तर, ते देवदर्शनाबरोबरच निसर्गरम्य परिसराची मौज अनुभवण्यासाठी येतात. वैशिट्य म्हणजे या ठिकाणाचा एक वेगळा इतिहास आहे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : हे आहे गणपती स्थापनेचे महत्व, भगरे गुरुजी सांगतात...

१६९८ साली सातारा राजधानी झाली. छत्रपती राजाराम महाराजांनी सातारा या शहराला राजधानी घोषित केले होते. तेव्हापासून अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण उतारावर गर्द झाडीत ही दोन ठिकाणं होती. इतिहास आपण जाणतोच, औरंगजेबाने मराठ्यांचं राज्य नष्ट करण्यासाठी साता-यावर स्वारी करून ही राजधानी बळकावण्याचा प्रयत्न केला होता. त्याने साता-याजवळ उत्तरेला करंजे गावी तळ ठोकला.त्याच्या मुलाला म्हणजेच अझिमशहाला सध्याच्या शहापूर ते सज्जनगड भागात तळ देण्यासाठी पाठवलं होत. कपटी औरंगाजेबाने अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला आणि सज्जनगडावर स्वारी केली.

पावसाळ्यात मराठ्यांच्या गनिमी काव्याला बळी पडत हजारो सैनिक मरण पावून हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज यांनी ताराबाईंकडून किल्ला जिंकून सातारा ही राजधानी केली.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू

हे ठिकाण अजिंक्यतारा किल्ल्याच्या कुशीत सातारा शहरापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर आहे. नागमोडी वळणाच्या स्वच्छ आणि हिरव्यागार घाटात हे ठिकाण आहे. शहरातून तिथे जायच असेल तर स्वतःच खाजगी वाहन असणे आवश्यक आहे किंवा शहरातून रिक्षाही मिळू शकते. वेगळेपण असे आहे कि या देवस्थानला पायी जाणा-यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. या भागात गणपतीबरोबरच कुरणेश्वर महादेव मंदिर आणि दत्त मंदिरही आहे.

मुघलांकडून मूर्ती फोडली जाऊ नये यासाठी किल्याला वेढा पडल्यावर देवभक्तांनी पूर्वीच्या देवालयाच्या प्रवेशद्वारात नवी मूर्ती बसवल्याचं सांगितलं गेलं. मूर्तीचे स्वरूप बघता ती मूर्ती दगडाची नसावी असा अंदाज आहे.या मंदिराचं आणि मूर्तींच वैशिष्ट्य म्हणजे, मूर्तीच्या मागे आजही मूळ आहे. ती मोकळी करण्याचा विचार अनेकदा झाला पण नकार दृष्टांत झाल्याने आहे त्याच मूर्तीची पूजा सुरू राहिली आहे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022: छत्रपती शिवरायांच्या काळातली परंपरा आजही जिवंत; दाभाडे गणपतीचा इतिहास जाणून घ्या!

काही कालावधीनंतर सातारा शहरातील अनेक गणेशभक्त नित्यदर्शनासाठी येऊ लागले.त्यानंतर देवस्थान ट्रस्टची स्थापना करण्यात आली. आता ट्रस्टतर्फे वर्षामध्ये भाद्रपद आणि माघ महिन्यात पाच दिवसांचे दोन उत्सव, मंदिरामध्ये रोज सकाळी आणि सायंकाळी पूजा आणि अभिषेक असे धार्मिक विधी केले जातात. मंदिराचा जीर्णोद्धार, धार्मिक कार्यासाठी दुमजली इमारत, तसेच परिसरात सुशोभित बालोद्यान, वृक्षारोपण, पथदिवे इत्यादी सोयी ट्रस्टतर्फे करण्यात आल्या आहेत.

श्री गणेश मंदिराच्या पूर्वेस दगडी पाय-या उतरून गेल्यावर स्वयंभू महादेवाचं कुरणेश्वर मंदिर आहे. भक्तांच्या सहकार्यातून मंदिरापर्यंत दगडी पाय-या, बालोद्यान, ध्यानकेंद्र, आध्यात्मिक अभ्यासिकाही सुरू आहे. हा परिसर निसर्गरम्य आणि घनदाट झाडीने बहरलेला असल्यामुळे गणेशभक्तांबरोबरच पर्यटकांचंही आकर्षण ठरला आहे.

लेेखन - आकांक्षा मानकर

Web Title: History Of Lord Ganesha In Satara Pass

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..