esakal | गणरायाच्या स्वागतासाठी सातारकर सज्ज! नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

वैविध्यपूर्ण तोरणमाळांनी सजली दुकाने

छोट्या पण आकर्षक सजावटी करत आणि गणरायाच्या स्वागतात कोठेही कमी राहणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

गणरायाच्या स्वागतासाठी सातारकर सज्ज!

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

सातारा: कोरोनाच्या सावटाला थोडेसे बाजूला सारून, काहीसे पावसाचे वातावरण असले, तरी चौदा विद्या अन् चौसष्ट कलांचा अधिपती गणनायक गणरायाच्या स्वागतासाठी समस्त नागरिक सज्ज झाले आहेत. छोट्या पण आकर्षक सजावटी करत आणि गणरायाच्या स्वागतात कोठेही कमी राहणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा: सातारा : दक्षिण तांबवेत सात वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्साह आवरता घेत सजावटी केल्या आहेत. मिरवणुकांवर अद्याप बंदी असल्याने ढोलताशांचे आवाज यंदाही घुमणार नाहीत. गणेशमूर्ती खरेदीसाठी कुंभारवाड्यासह स्टॉलवर होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेक नागरिकांनी टाळांच्या गजरात आणि गणरायाच्या घोषात आदल्यादिवशीच मूर्ती घरी नेल्या.

यंदाही कोरोनाचे संकट आहे. मात्र, उत्सव साजरा करण्याचा सर्वांच्यात उत्साह मोठा आहे. त्यामुळेच गेले काही दिवस घरोघरी सजावटी उत्साहात सुरू होत्या. सार्वजनिक मंडळांनीही काही ठिकाणी छोटे मंडप टाकले आहेत. ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी मंदिरात गणेशाच्या प्रतिष्ठापनेचे नियोजन कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यामध्ये विद्युतरोषणाईवर भर देण्यात आला आहे. गणरायाच्या स्वागताची लगबग सुरू असतानाच महिलांची गौरीच्या फराळाची तयारीही घरोघरी वेगात सुरू आहे. उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मोती चौकात पूजेचे व इतर साहित्य हरळी, सुगंधी केवडा खरेदीसाठी नागरिकांची, तसेच खणआळी परिसरात गौरींसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती.

हेही वाचा: सातारा जिल्ह्यात आज महा लसीकरण! दीड लाख डोस उपलब्ध

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. राज्य राखीव पोलिस दल, जलद प्रतिसाद पथक व होमगार्ड जवान तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून उत्सव साधेपणाने आणि शांततेने साजरा करण्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मंडळांच्या उत्सव मंडपात जाऊन गणेशमूर्तींचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यावर प्रतिबंध घातले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भक्तांना गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून द्यायची आहे. त्यामुळे यंदा नागरिकांना गणेश दर्शनासाठी बाहेर पडता येणार नाही.

प्रतिष्ठापना मुहूर्त

शुक्रवारी (ता. १०) सकाळी साडेसात ते साडेदहा आणि दुपारी बारा ते दीड असा गणेश पूजनाचा मुहूर्त आहे. याबाबतची माहिती ज्योतिष विशारद अनामिका मालपुरे यांनी दिली.

loading image
go to top