श्रीगणेश व श्रीराम : सुंदर साम्यस्थळे!

श्री गणेशांच्या हातातील दिव्य शस्त्रे म्हणजे एकेक देवताच आहेत.
Ganpati
Ganpatisakal

श्री गणेशांच्या हातातील दिव्य शस्त्रे म्हणजे एकेक देवताच आहेत. हातातील कमळ हे सृष्टीनिर्माता ब्रह्मदेवांचे प्रतीक, अंकुश हे संचालक विष्णूंचे आणि परशू हे निर्दालक शंक‍रांचे प्रतीक आहे. शस्त्रांवर धारणकर्त्याबरोबरच या देवतांवरही त्यांचे नियंत्रण असते, असे गाणपत्य संप्रदायात समजले जाते. गणेश उपासनेच्या सहा संप्रदायातील हरिद्रागणपती संप्रदायाची अशी मान्यता आहे की, रुद्र, ब्रह्मा, विष्णू, इंद्र आदि देवतांच्या गणाचे श्री गजानन हे नायक आहेत. सर्वच ईश्वरी अवतारांमध्ये सर्वगुणसंपन्न श्री गणेशांच्याच निरनिराळ्या गुणसमुदायांचे अविष्कार पहायला मिळतात. एका अर्थाने ही संस्कारांची, सद्‍गुणांची, मूल्यांची साखळी सर्वच देवतांच्या चरित्रांमधून पुढे सुरू रहाते. बाल रामचंद्रांना अध्ययनाला आरंभ करताना त्यांच्या गुरूंनी सांगितले आहे की, लेखनाला आरंभ करताना पानाच्या पहिल्या ओळीवर प्रणवाक्षर म्हणजे ओंकार काढावा.

रामायणाशी संबंधित काही आख्यायिकांमध्ये श्रीगणेशांचा उल्लेख आढळतो. रावण त्याने केलेल्या तपामुळे व मिळालेल्या वरदानांमुळे इतका उन्मत्त झाला होता की, त्याने सर्व देवतांना बंदिवान केले होते. प्रत्येक देवतेला एकेका कामास जुंपले होते. समर्थांनी याचे वर्णन केले आहे.

पुजून देव शंकरु। उदंड साधला वरु।

तया वरेंचि मातला। अधर्म कर्म रातला।

समस्त देव ते भले। परंतु बंद पावले।

नरेंद्र हो फणींद्र हो। विधी सुरेंद्र चंद्र हो।

प्रचेंड दंड दंडिका। सटी गणेश चंडिका।

अशा सर्वांना त्याने वेठीस धरले अन अशी कामं दिली.

वरूण घालतो सडे। सुरेंद्र बाग राखतो।

सटी आरंधळी दळी। गणेश गाढवे वळी।

बहू कठीण काळ हो...

मग राम रावण युद्ध झाले आणि मग -

अनेक बंद तोडिले। समस्त देव सोडिलें।

प्रचीतिने पहा पहा। प्रभु समर्थ राम हा।

अशी श्रीरामांनी श्रीगणेशांसह सर्व देवांची मुक्तता केली.

Ganpati
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा "डॉ. परुळेकर पुरस्कार'

गोकर्ण महाबळेश्वरची कथा

असेच श्रीगणेशही श्रीरामांच्या मदतीला धावून आले होते. ही मजेदार कथा आहे, रावणाच्या दीर्घशंकेची! शंकरांची भक्ती करून रावणाने प्रत्यक्ष आत्मलिंग हस्तगत केले. त्याची प्रतिष्ठापना लंकेत झाली असती तर तो अजिंक्य, अवध्य, अमर झाला असता. या पेच प्रसंगातून सोडवण्याकरता देवतांनी श्रीगणेशांना साकडे घातले. गणेशही मदतीसाठी धावले. याबाबतची क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वरची कथा आपणास माहीत आहेच. पुढे जाऊन असे सांगतात की, रावण बालकाचा शोध घेत दूरवर गेला. गणेश धावत जाऊन पर्वताच्या शिखरावर विसावले होते. रावणाने रागाने त्या गुराखीरुपी गणेशाच्या डोक्यावर प्रहार केला. मस्तकावर अशी प्रहाराची खूण असलेली गणेशमूर्ती तमिळनाडूतील त्रिचीमधील टेकडीवरील मंदिरात पहायला मिळते!

असेच उज्जैनमधले स्थिरमन गणेश मंदिर. रामलक्ष्मणांनी मनाला स्थैर्य येण्यासाठी या मंदिराची स्थापना केली, असे सांगतात. याला चिंतामण गणेश असंही म्हणतात. राजस्थानातील रणथंबोरमधील ‘त्रिनेत्र गणेश’ स्वयंभू आहे आणि रामांनी लंकेला जाण्यापूर्वी इथे अभिषेक केला होता, असे सांगतात.

मुद्गल पुराणात चतुर्थी व्रताचे महात्म्य सांगितले आहे. रावणानेही नारदांच्या सांगण्यावरून संकटनाशक चतुर्थीचे व्रत केले होते. त्यामुळेच त्याला ज्ञान व सामर्थ्य प्राप्त झाले. वसिष्ठांनी दशरथाला हे व्रत करायला संगितले आणि या व्रतामुळेच राजाच्या पोटी साक्षात विष्णू जन्मले व रावणाचा विनाश झाला. श्रीराम व श्रीशिव यांचे नातेही असेच दुहेरी आहे.

लोकनायक श्रीगणेश

समुद्रमंथनात बाहेर आलेले हलाहल भगवान शंकरांनी आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे झालेला दाह शांत करण्याकरता त्यांनी रामनाम मुखी धारण केले. श्रीराम शिवाची आराधना करत असल्याचे उल्लेख आहेत. श्रीरामांनी वनवासाच्या व जानकीमातेच्या शोधाच्या काळात अनेक ठिकाणी शंकरांची मंदिरे स्थापन केली आहेत. परंतु भारतातील एकमेव अशी मानवी मुख असलेली गणेशमूर्ती असलेल्या मंदिराशी श्रीरामांचे विशेष नाते आहे. तमिळनाडूतील तिरुवर जिल्ह्यातील कुटनूर या ठिकाणापसून जवळच ‘तिलतर्पण पुरू’ हे स्थान आहे. याच स्थानी श्रीरामांनी दशरथांना तिलांजली दिली. मांडलेले पिंड विस्कळीत होऊन त्याचे किडे बनत होते. त्यावर श्रीरामांनी शंकरांचे स्मरण केले, तेव्हा त्यांनी श्रीरामांना तेथील आदि विनायक मंदिरात जाऊन पूजा करायला सांगितली. तसे करताना चारही पिंड शिवलिंगात रूपांतरित झाले. ही चारही शिवलिंगे त्या स्थानी पहायला मिळतात.

आणखीही काही सुंदर साम्यस्थळे दोन्ही दैवतांच्या बाबतीत आहेत. रामरक्षा कवच तसेच गणेशकवचही अनेकांनी रचले आहे. एकनाथ श्रीराम अवताराचा हेतू सांगतात, ‘फेडावया देवांची सांकडी। स्वधर्मु वाढवावया वाढी’ तर श्रीगणेशांच्या ब्रह्मणस्पत सूक्तातही ‘हे ब्रह्मणस्पते तू धर्मरक्षणासाठी अवतार घेतोस, सत्य आणि सज्जनता यांना प्रतिष्ठा देतोस’ असे म्हटले आहे. रामायण काळातही मातलेल्या व यज्ञकर्मात विघ्ने आणणा‍ऱ्या राक्षसांचा निःपात करण्यापासून श्रीरामांचे कार्य सुरू होते. महाप्रतापी परंतु महाउपद्रवी रावणाचा विनाश करून ते पृथ्वीला भारमुक्त करतात गणेश लोकनायक.

तळागाळातील समाजाला संघटित करून त्यांना बुद्धी व सामर्थ्य प्रदान करणारे, त्यांची सेना उभारून त्यांना त्यांच्या सामर्थ्याची अनुभूती देणारे, श्रीरामही वनात, जनात मिसळले. वानररुप जनसामान्यांना संघटित करुन त्यांना आपलेसे केले. त्यांच्यातील सामर्थ्य जागृत करून योजनाबद्ध रीतीने रावणासारखा बलाढ्य रिपु परास्त करण्याचे कार्य केले.

श्रीगणेशांनी घालून दिलेल्या आदर्शांचा निर्मल ओघच श्रीरामचरित्रात प्रवाहित होताना दिसतो. या दोन्हींची उपासना करणे म्हणजे यांच्या गुणसमुच्चयाला आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com