बाप्पाचा परतीचा प्रवास 'विसर्जन'

ganesh visarjan
ganesh visarjan esakal

लेखक - सुनील शिरवाडकर.

नाशिक : मला काही काही लोकांचं खुप आश्चर्य वाटतं. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे लोक सकाळीच गणपती विसर्जनाला निघतात. अगदी नऊ काय आणि दहा काय. गणपती विसर्जित करायचा...पण कधी? दुपारी त्याला छान नैवेद्य दाखवायचा. जरा वेळ आराम करु द्यायचा. दुपारी चार पाच नंतर चहापाणी झालं की मग त्याला निरोप द्यायचा. हो..आणि अगदी उशिरा पण नको. आई म्हणायची फार उशीर नको...संध्याकाळी अंधार पडायच्या आत तो त्याच्या घरी पोहोचला पाहिजे.

दुपारी पाच ही अगदी योग्य वेळ. घरी त्याची शेवटची आरती होते. त्याच्यावर चार अक्षता टाकायच्या. म्हणजे एका अर्थी त्याचं प्रतिकात्मक विसर्जन झालं.

ताम्हणात मुर्ती अलगदपणे ठेवली जाते. त्याच्या पुढ्यात केळीच्या पानाचा तुकडा. त्यावर दहीभात. घरी जाताना त्याला भुक लागणार. मग त्यासाठी ही शिदोरी. घरातुन निघताना खरंतर पावलं जड झालेली असतात. गणपतीच्या चेहऱ्यावर देखील एक खिन्नतेची छाया दिसत असते. पहिल्या दिवशी कसा हसरा आणि टवटवीत चेहरा असतो. आता निघतांना त्याचंही मन थोडसं निराश होणारच ना!

उलट दिशेला तोंड करुन, म्हणजे गणपतीचा चेहरा घराकडं करुन बाहेर पडतो. रस्त्यावर आल्यानंतर गंगेच्या दिशेने निघतात. लहान लहान मुले घंटी वाजवत 'गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..' म्हणत पुढे निघतात.

ganesh visarjan
दर वर्षी गणेशस्थापना अन् विसर्जन का?
वाहत्या पाण्याजवळ गंगेकडे तोंड करून गणपती बाप्पा
वाहत्या पाण्याजवळ गंगेकडे तोंड करून गणपती बाप्पाesakal

रस्त्याने सगळीकडे हेच दृष्य. कधी चार पाच वाड्यातले लोक एकत्र विसर्जनाला निघतात. एखाद्या छोट्या हातगाडीवर पाच पंचवीस गणपती. पुढे तीन चार ढोल ताशा वाजवणारे आणि त्या तालावर नाचणारे...

घाटापर्यंत सगळं असंच दृष्य. घाटावर आल्यावर पहिले काम म्हणजे चांगली जागा शोधायची. गंगेतल्या पाण्याने ती जागा जराशी स्वच्छ करायची. अगदी वाहत्या पाण्याजवळ गंगेकडे तोंड करून गणपती ठेवला जातो. त्यापुढे दोन तीन फुलवाती, कापुर एकत्र करुन पेटवला जातो आणि आरती सुरु होते. वाऱ्याच्या झोताने दिवा विझायला नको म्हणून दोन हाताच्या ओंजळीने आडोसा केला जातो. आरती होते. मंत्रपुष्पांजली होते.

आजुबाजुला लहान लहान मुले पाण्यात खेळत असतात.

"मुर्ती आमच्याकडे द्या... आम्ही ती प्रवाहात सोडतो" म्हणत मागे लागतात. काही जण त्यांच्याकडे देतातही. काही जण पँट गुडघ्यापर्यंत वळवुन शक्य होईल तेवढं पुढे पाण्यात शिरतात.

आता ती वेळ आलेली असते. गणपती आता खरंच त्याच्या घरी जाणार असतो. दहा दिवसांचा त्याचा सहवास... त्या आरत्या... नैवेद्य... सगळं सगळं आता संपणार असतं. नजर मुर्तीवरुन हलत नसते. शेवटी तीन वेळा पाण्यात बुडवून मुर्ती प्रवाहात सोडली जाते. क्षणार्धात दिसेनासी होते.

डोळे पाणावलेले असतात. मन रिकामं झालेलं असतं.

ganesh visarjan
श्रीगणेश व श्रीराम : सुंदर साम्यस्थळे!

कुठल्यातरी मुलाने दिलेली मुठभर वाळु रिकाम्या ताम्हानात टाकुन; उरलेली खिरापत वाटुन सगळेजण घरी येतात.

लाईटच्या माळा चालु असतात. प्रखर उजेडाच्या प्रकाशाने मखर उजळुन गेलेलं असतं. तेच मखमलीचे पडदे. तोच चौरंग. त्यापुढच्या समया. पळी. पंचपात्र. टाळ. आजुबाजुला विखुरलेली फुले. दुर्वा. सगळं सगळं तेच असतं. पण त्यात जान नसते. गेली दहा दिवस त्यावरुन नजर हटत नसते. आज तिकडे नजर टाकावीशी वाटत नसते..

पण. पण तरीही त्याचं अस्तित्व जाणवत रहातं. कारण विसर्जन तर मखरातल्या मुर्तीचं झालेलं असतं. तो सुखकर्ता तर कायम असतोच... मनाच्या एका कोपऱ्यात... आणि तिथे कायमच राहाणार असतो.

https://dai.ly/x849y84

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com