कोरोनाने केले गडाला शांत ; येथे ना ताशांचा तडतडाट ना बाप्पाचा जयघोष

corona impact ganesha festival celebration in panhala kolhapur
corona impact ganesha festival celebration in panhala kolhapur

पन्हाळा (कोल्हापूर) : बाप्पाच्या आगमनादिवशी गणपती बाप्पा मोरया... गणेश गणेश मोरया... च्या जयघोषानी पन्हाळगड निनादून जायचा. भगव्या टोप्या मस्तकी लेवून, भगव्या रिबीनी कपाळावर बांधून, कपाळी नाम ओढून, भगवे झेंडे मिरवत ट्रॅक्‍टर ट्रॉलीतून तरुणाई मोठमोठ्या गणेशमूर्ती घेऊन यायची. पुढे स्पीकर, अगर बेंजो निनादायचा नि त्या तालावर तरुणाई थिरकायची.. उभारलेल्या भव्य मंडपात गणेश विराजमान होईपर्यंत तरुणाई  आपली नाचण्याची हौस भागवून घ्यायची.. यावर्षी कोणता नवा देखावा करायचा, मिरवणूक कशी काढायची, महाप्रसाद कधी करायचा, याबाबत मंडळाच्या मंडपातच 
खलबते व्हायची.


गणेशेत्सवातच मोहरमही पुढेमागे ठरलेला. हिंदुमुस्लिम  ऐक्‍याचे प्रतिक असणारा हा मोहरम पन्हाळ्याची शान. गल्लीगल्लीत पंजांची स्थापना. कुदळ पडल्यापासून ते पंजे विसर्जनापर्यंत  ताशा नगाऱ्याचा आवाज टिपेला पोहोचलेला असायचा.. नगाऱ्यावर कुणाच्या हातची छडी थिरकतीय, कुठल्या पंजाची चाल कशी आहे, कोण कुठली पोज घेतोय, याकडे जाणकारांचे लक्ष असायचे. डोंगरकपारीतील पायवाटेने मंगळवारपेठ, नेबापूर, पावनगड येथील सातव्या दिवशी आणि कत्तलरात्री पंजे साधोबा दर्ग्यात भेटीला जमायचे.

मशालीच्या उजेडात रात्री बारा वाजता येणाऱ्या पंजांची भक्‍तांना आतूरता असायची. साधोबा दर्ग्यातील हसन, हुसेन पंजा, आगांचा चाँदसाहेब वली पंजा, मोकाशी बंधूंचा या अल हुसेनी पंजा, हिंदुंचा नाल्या हैदर पंजा हे ठराविक भक्‍तांचे आदराचे स्थान; पण यावर्षी कोरोनाने सर्वच हिरावून घेतलेय. सगळ्यांवरच बंधने आणलीत. साहजिकच हजरत पीर साधू खताल दर्गा ट्रस्टीसह हजरत नवापीर मसजीद (नाल्या हैदर पंजा) ट्रस्टने एका मर्यादेतच हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

 गणेश मंडळांनी ठराविक आकाराचाच मंडप घालायचा. ठराविक उंचीची मूर्ती बसवायची, मिरवणूक काढायची नाही. वाद्ये वाजवायची नाहीत. चार जणांपेक्षा अधिक जणांनी  एकत्र जमायचे नाही. साहजिकच हा उत्सव आनंदोत्सव राहिलेला नाही. युवकांच्या, भक्‍तांच्या मनात असूनही त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे शांत पन्हाळा एकाला दोन सण असूनही अधिकच शांत बनलाय, नव्हे कोरोनाने गडाला शांत बसायला भाग पाडलेय.


संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com