Video : ३१ वे वर्ष लोककल्याणासाठीच; नियमांचे पालन करून राबविणार उपक्रम, नागपुरातील या मंडळाचा निर्णय

अतुल मांगे
Sunday, 23 August 2020

मंडळाच्या देखाव्यातून दरवर्षी काही ना काही सामाजिक संदेश दिला जातो. श्रींची मूर्ती नागपूरच्या चितारओळीतील खास कारागीराकडे तयार होते. यंदा त्याच ठिकाणी मूर्ती तयार होणार असली तरी तिची उंची चार फूट राहणार आहे. मंदिराचा सभामंडपही दरवर्षीपेक्षा छोटा राहणार आहे.

नागपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या गणेशाचा उत्सव काही दिवसांवर आहे. यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव सामाजिक अंतर पाळत अगदी साध्या पध्दतीने साजरा होणार असला तरी भाविकांच्या भक्तीत कुठेही कमी पडणार नाही. किंबहुना कोरोनाला घेऊन जाण्यासाठी यंदा भक्त गणेशाची अधिक आळवणी करतील. धंतोली येथील अष्टविनायक बहुद्देशीय संस्था, मंडळही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहे. यंदा मंडळाचे ३१ वे वर्ष असून, लोकोपयोगी उपक्रम राबवून, सामाजिक बांधिलकी जपण्याचा संस्थेचा मानस आहे.

यंदा मंडळाचे ३१ वे वर्ष असून, गेल्या तीस वर्षात मंडळाने दरवर्षी वेगळेपण जपले आहे. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या गणेशाच्या दर्शनाला दहाही दिवस भाविकांची गर्दी असते. नवसाला पावणाऱ्या या गणेशाने अनेकांना प्रचिती दिल्याचे सांगितले जाते. दरवर्षी नित्यनेमाने गणेशाची आराधना करणाऱ्या एका दाम्पत्याचा अपंग मुलगा बाप्पाच्या दर्शनाला चक्‍क आठ फूट मंच चढून गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. तेव्हापासून त्याचे अपंगत्व दूर झाल्याचे मंडळाचे सदस्य नरेंद्र खवले यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी - कोरडी आत्महत्येच्या निमित्ताने! हे काही आयुष्यावर फुली मारण्याचे वय नव्हते

मूर्ती, सभामंडप छोटा...

गणेश मंडपाच्या चहूबाजूंनी रहिवासी नागरिकांसोबतच दवाखान्यांचे जाळे पसरले आहे. तरीही दरवर्षी अतिशय अरुंद गल्लीत सुंदर देखावा साकारला जातो. त्यासाठी गुजरातहून खास कारागीर येतात. मंडळाच्या देखाव्यातून दरवर्षी काही ना काही सामाजिक संदेश दिला जातो. श्रींची मूर्ती नागपूरच्या चितारओळीतील खास कारागीराकडे तयार होते. यंदा त्याच ठिकाणी मूर्ती तयार होणार असली तरी तिची उंची चार फूट राहणार आहे. मंदिराचा सभामंडपही दरवर्षीपेक्षा छोटा राहणार आहे.

सामाजिक उपक्रमांवर भर...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यावर मंडळाचा भर राहणार आहे. रक्तदान शिबिरांसोबतच नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येईल. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. हाताला काम नसल्याने कित्येक कुटुंबीयांची उपासमार होत आहे. गरजूंची नेमकी गरज लक्षात घेऊन त्यांना मदत करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष मुन्ना जैस्वाल यांनी सांगितले.

मनपाच्या नियमांचे कटाक्षाने पालन
कोरोनाची मार सर्वांनाच बसली. दिवसेंदिवस धोका वाढत असल्याने गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येईल. आगमनाला बॅंड राहणार नसून श्रींचे विसर्जनही घरच्या विहिरीत करण्यात येईल. सामाजिक अंतर ठेवूनच आरती आणि इतर विधी पार पडतील. मनपाच्या नियमांचे कटाक्षाने पालन करण्यावर मंडळाचा भर आहे.
- नरेंद्र खवले,
दस्य अष्टविनायक बहुद्देशीय संस्था, मंडळ, धंतोली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: By following the rules that Ganpati will sit