esakal | तब्बल एक हजार 22 गावांत "एक गाव, एक गणपती' पॅटर्न रुजला ; उत्सवाचा खर्च सामाजिक उपक्रमास
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल एक हजार 22 गावांत "एक गाव, एक गणपती' पॅटर्न रुजला ; उत्सवाचा खर्च सामाजिक उपक्रमास

गणेशोत्सव काळात दर वर्षी मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांकडून खर्च होतो. यंदा कोरोनामुळे त्या खर्चाला फाटा मिळालेला आहे. त्याचा विचार करून अनेक गणेश मंडळांनी तो खर्च सामाजिक उपक्रमासाठी वापरण्याचा निर्धार केलेला आहे.

तब्बल एक हजार 22 गावांत "एक गाव, एक गणपती' पॅटर्न रुजला ; उत्सवाचा खर्च सामाजिक उपक्रमास

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : कोरोनामुळे गणेशोत्सवाचा "ट्रेंड'च बदलल्याचे दिसून आले. यंदा दर वर्षी एवढा उत्साहच नाही. मात्र, या संकट काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी समाजभान राखून जिल्हा पोलिस दलाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत "एक गाव, एक गणपती'चा सातारा पॅटर्न सुरू केला आहे. मागील वर्षी फक्त 450 गावांत "एक गाव, एक गणपती' होता. यंदा मात्र, दीड हजार गावांपैकी तब्बल एक हजार 22 गावांत "एक गाव, एक गणपती' हा पॅटर्न रुजवण्यात मंडळांच्या सहकार्याने पोलिसांना यश आले. जिल्ह्यातील तब्बल 200 हून अधिक गावांत गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशमूर्ती न बसवण्याचा निर्धार केला आहे. संकटकाळात मंडळांनी दाखवलेले हे औदार्य गर्दीला फाटा देऊन कोरोनाला दूर ठेवण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे.
शाहूनगरीत हर्षोल्हासात बाप्पांचं आगमन
 
सातारा जिल्ह्यात दर वर्षी गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणेश मंडळे नावीन्यपूर्ण देखावे, सजावटी करून सामाजिक उपक्रमही राबतात. अनेक गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकीतून गावागावांत सीसीटीव्ही बसवले आहेत. अनेक मंडळांनी गावांचे दिशादर्शक फलक, माहिती फलक, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, मोफत चष्मे वाटप यासारखे अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यासाठी त्यांनी आजपर्यंत मोठा खर्च केला आहे. यंदा मात्र सर्वत्र कोरोना महामारीचे संकट आले आहे. त्यामुळे अनेकांवर आर्थिक कुऱ्हाडच आली आहे. अनेकांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना नोकरीस मुकावे लागले आहे. त्याचा प्रभाव प्रामुख्याने आबालवृद्धांवर आहे. त्याचा विचार करून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी "एक गाव, एक गणपती' जास्तीतजास्त गावात बसवावे आणि अनावश्‍यक गर्दी टाळून कोरोनाला दूर ठेवावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यांनी तेथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावागावांत त्यासंदर्भात बैठका घेऊन जनजागृती केली.

मुस्लिम कुटुंबियांच्या पुढाकाराने कोरोनाबाधित कुटुंबात उत्सवास प्रारंभ

त्याचा विचार सामाजिक बांधिलकीतून जिल्ह्यातील बहुतांश गावातील गणेश मंडळांनी केला आणि पोलिस दलाच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यानुसार गणेश मंडळांनी समाजभान राखून जिल्ह्यात "एक गाव, एक गणपती' हा सातारा पॅटर्न यशस्वी केला आहे. सध्या जिल्ह्यातील एक हजार 500 ग्रामपंचायतींपैकी तब्बल एक हजार 22 गावांत "एक गाव, एक गणपती' हा पॅटर्न राबवण्यात येणार असल्याचे पोलिस दलाकडे नोंद झाली आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तब्बल 200 हून अधिक गावांत गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशमूर्तीच न बसवण्याचा निर्णय घेतला आहे. 

डॉक्‍टर, इतकं खरं बोलायचं नसतं हो...! - 
 

उत्सवाचा खर्च सामाजिक उपक्रमास 

गणेशोत्सव काळात दर वर्षी मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांकडून खर्च होतो. यंदा कोरोनामुळे त्या खर्चाला फाटा मिळालेला आहे. त्याचा विचार करून अनेक गणेश मंडळांनी तो खर्च सामाजिक उपक्रमासाठी वापरण्याचा निर्धार केलेला आहे. त्याअंतर्गत काही गणेश मंडळांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन पोलिस दलाला दिले आहे. त्याचबरोबर मंडळांकडून वृक्षारोपणासारखे अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. 

पोलिस दलाने जिल्ह्यातील गणेश मंडळांना केलेल्या आवाहनाला मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कोरोनामुळे अनेक गावांतील मंडळांनी गणेशमूर्तीच न बसवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय आहे. 

 धीरज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सातारा.

साताऱ्यातील या गणेशाेत्सव मंडळाने कोराेनाच्या लढ्यासाठी दिले एक लाख 11 हजार 111 रुपये


कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाने केलेल्या गणेशोत्सव साधेपणाने करण्याच्या आवाहनास सर्व मंडळांनी प्रतिसाद दिला आहे. ते आवश्‍यकच होते. आता उत्सव साधेपणाने करण्याने वाचलेल्या पैशातून गरजूंना मदत केली पाहिजे. उत्सवावर अवलंबून असणाऱ्या बॅण्ड, मंडपवाले, रांगोळी कलाकार यांनाही मदत केली पाहिजे. 

- श्रीकांत शेटे, कुटुंब प्रमुख, प्रकाश मंडळ, सातारा 

भाविकांचे श्रध्दास्थान श्री शंकर पार्वती गणपती (महादेव)
 

कोरोनामुळे उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्‍यकच होते. आम्ही विविध प्रकारे सामाजिक कार्य करत होतो. आता आम्ही कोरोनाशी लढत असलेल्या योद्‌ध्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचा सत्कार करून मदत करणार आहे. कोरोनाने मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणारे, सफाई कामगारांनाही भरीव मदत करणार असून, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे आयोजित करणार आहे. 

- बाळासाहेब तांबोळी, अध्यक्ष, श्रीमंत महागणपती सम्राट मंडळ, सातारा.

Edited By : Siddharth Latkar

go to top