गणेशोत्सव2019 : ११९ वर्षांची परंपरा असलेला टेंबे गणपती

कमलेश जाब्रस
Thursday, 5 September 2019

सामाजिक बांधिलकी जोपासत टेंबे गणेश मंडळाकडून मागील अनेक वर्षांपासून दुष्काळग्रस्त, पूरग्रस्तांसाठी सामुदायिक विवाह सोहळा, स्मशानभूमीत वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश वाटप आदी उपक्रम राबविले जातात. पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येते. 
- अनंत शास्त्री जोशी, सदस्य.

गणेशोत्सव2019 : माजलगाव - शहरातील ११९ वर्षांची अखंड परंपरा असलेल्या टेंबे गणपतीची स्थापना सोमवारी (ता. नऊ) होणार आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करणारे हे गणेश मंडळ युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

शहरातील श्रीराम मंदिरात टेंबे गणपतीची स्थापना केली जाते. निजामकालीन राजवटीत या गणेशाची स्थापना मिरवणूक परवानगीच्या कारणावरून अडविण्यात आली होती. हैदराबाद येथे घोड्यावर जाऊन गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ताम्रपटावर रीतसर परवाना आणला होता. यामुळे या गणेशाची स्थापना भाद्रपद एकादशीला म्हणजेच सोमवारी (ता. नऊ) करण्यात येणार आहे. मागील ११८ वर्षांपासून या मंडळाचे सदस्य पर्यावरणपूरक गणेश मंडळाच्या मूर्तीची स्थापना शहरातील श्रीराम मंदिरात करतात. गणेशोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. विसर्जन मिरवणुकीमध्ये सामाजिक, धार्मिक, पौराणिक देखावे सादर केले जातात. पाच दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात टेंबे गणपतीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून भाविक गर्दी करतात. 

असे पडले ‘टेंबे’ नाव
निजामकाळात १९०१ मध्ये विजेची सुविधा नसल्याने श्री विसर्जन मिरवणुकीत उजेड असावा म्हणून भाविक प्रकाशासाठी टेंबे धरत असत. यानंतर काहीजण नवसपूर्ती व वंशवृद्धीसाठी मानाचे टेंबे घेऊन मिरवणुकीत सहभागी होत. त्यामुळे या मंडळाला ‘टेंबे गणपती’ असे नाव पडले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Tembe Ganpati