गणेशोत्सव2019 : पोलिसांची घाई, कार्यकर्त्यांची नाराजी

Pune Ganpati Visarjan
Pune Ganpati Visarjan

गणेशोत्सव2019 : पुणे - मिरवणूक आटोपती घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने गणपती मंडळांना मिरवणूक रथ घाईने पुढे घेण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी सर्वच विसर्जन मार्गांवर पाहायला मिळाले. टिळक चौकातून सकाळी दहा वाजता नवतरुण मित्र मंडळ हे शेवटचे मंडळ मार्गस्थ झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा रथ अलका चौकातून पुढे गेल्यानंतर सर्वच मार्गांवरील मंडळांचे ध्वनिवर्धक पोलिसांनी बंद केले होते. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडे ध्वनिवर्धक पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही ते सुरू करण्यास परवानगी न दिल्याने मंडळातील नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काही काळ ठिय्या मांडला होता. त्यामुळे सकाळी नऊच्या सुमारास मिरवणुकीचा वेग मंदावला होता. अनेक मंडळे संभाजी पूल आणि जंगली महाराज रस्त्यावर थांबलेली होती. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत मंडळे पुढे जात होती. स्पीकर बंद असले, तरी एलईडी लाइटचा झगमगाट मात्र सुरू होता.

भाऊ रंगारी मंडळाच्या मूर्तीचे साडेसहा वाजता, अखिल मंडई मंडळाच्या मूर्तीचे सकाळी सात वाजता, त्यानंतर दगडूशेठ मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन आठ वाजता व हुतात्मा बाबू गेनू मंडळाच्या श्रींचे पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी पांचाळेश्वर विसर्जन घाटावर विसर्जन झाले. 

नटेश्वर विसर्जन घाटावर ९४ मंडळांच्या गणपतींचे विसर्जन झाले. खंडोजीबाबा चौकातून एकूण २३८ मंडळे मार्गस्थ झाली. त्यातील खडकमधील गोकूळ वास्तद तालीम मंडळ शेवटचे ठरले. कासेवाडीतील महाराष्ट्र तरुण मंडळाच्या श्रींचे सर्वांत शेवटी एक वाजून २१ मिनिटांनी विसर्जन झाले.

कुमठेकर रस्ता - लक्षवेधक रथ...
‘मयूर रथ’, ‘पार्वती नंदन रथ’, ‘कासव रथ’ यांसारखे विविध प्रकारचे देखणे रथ, तर दुसरीकडे ढोल-ताशा पथकांचे पारंपरिक वादन आणि ध्वनीवर्धकाच्या भिंतींमधून बाहेर पडणाऱ्या कर्णकर्कश आवाजावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई ही कुमठेकर मार्गावरील यंदाच्या मिरवणुकीची वैशिष्ट्ये होती. मात्र मिरवणुकीचा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदतीचा हात देत माणुसकीचे दर्शन घडविण्याचे कामही काही मंडळांनी केले. यंदा या मार्गावरील मिरवणूकीत ४६ मंडळांनी सहभाग घेतला होता. 

या मार्गावर यंदा ज्ञान प्रबोधिनीच्या ‘श्रीं’ची मिरवणूक सव्वादहा वाजता आली. त्यानंतर तब्बल थेट पावणेदोन वाजता मयूरेश मित्र मंडळ आले. श्री गुरुदत्त तरुण मंडळाचा ‘पार्वती नंदन गणेश रथ’, पाच पांडव मित्र मंडळाचा ‘तुळजाभवानी रथ’, आराधना मित्र मंडळाचे ‘शिव मंदिर रथ’, रणवीर मित्र मंडळ ‘मणीचा महाल’, श्री अचानक मित्र मंडळाचा ‘गजरथ’, वडार समाज मंडळाचा ‘ओम नमः शिवाय’ या मंडळांच्या देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

केळकर रस्ता - तरुणाई थिरकली
केळकर रस्त्यावर दुपारनंतर शनिवार आणि नारायण पेठेतील दोन  मंडळे आली. त्यानंतर सायंकाळी सहानंतर मंडळांचे आगमन झाले अन्‌ डीजेवर तरुणाई थिरकली.

केळकर रस्ता म्हणजे डीजेच्या तालावर फुल्ल जल्लोष असे जणू समीकरणच बनले आहे. त्यामुळे डीजेच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईची पावले या रस्त्याकडे वळली. सायंकाळी सहापासून रात्री बाराचा ठोका पडेपर्यंत हा रस्ता जल्लोषात बुडाला होता. दुपारी सव्वाच्या सुमारास शनिवार पेठेतील गणेशकृपा मित्र मंडळ, नारायण पेठेतील विजय मित्र मंडळाचे आगमन झाले. सायंकाळी जिजामाता तरुण मंडळ, गजानन मित्रमंडळ, कसबा पेठेतील जनार्दन पवळे संघ, शनिवार पेठेतील सह्याद्री मित्रमंडळ, नारायण पेठेतील संयुक्‍त प्रसाद मित्र मंडळ, विनायक मित्र मंडळ, शनिवार पेठेतील नेने घाट गणेश मित्रमंडळ, रविवार पेठेतील हिंदू तरुण मंडळ, उदय मंडळ, सत्यशोधक मारुती मंडळ, जनवाडी येथील लालबहादूर शास्त्री तरुण मित्र मंडळासह इतर मंडळांचे आगमन झाले.

सुंदर देखाव्यांनी वेधले लक्ष
सूर्योदय मित्र मंडळ, जागृत गणपती मंडळ, बाल विकास मित्र मंडळ, नारायण पेठेतील विनायक मित्र मंडळ, कसबा पेठेतील भारतमाता मित्रमंडळ, विजय मंडळ ट्रस्टचा श्री त्रिशुंड मयूरेश्‍वर गणपती, साईनाथ मंडळ, केळकर रस्त्याचा राजा असलेल्या बुधवार चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह इतर गणेश मंडळांचे सुंदर देखावे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

टिळक रस्ता - पारंपरिक वाद्यांच्या तालावर जल्लोष
वर्षानुवर्षे ध्वनिवर्धकाने (डीजे) दणाणून निघणारा टिळक रस्ता यंदाच्या मिरवणुकीत मात्र पारंपरिक वाद्यांनी निनादून निघाला. मंडळांनी सजविलेले रथ आणि त्यातील वैविध्याची परंपरा कायम होती. या रस्त्यावरील मिरवणूक २२ तास सुरू होती. मराठी, हिंदी गाण्यांच्या रिमिक्‍सवर थिरकणाऱ्या तरुणाईमुळे रात्री आठनंतर या मार्गावर

महाउत्सवच रंगला...   
मध्यवर्ती भागातील काही मंडळांसह दक्षिण पुण्यातील मंडळांची मिरवणूक टिळक रस्त्यावरून निघते. प्रथेनुसार गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता आझाद मित्र मंडळाच्या मिरवणुकीने विसर्जला सुरवात झाला. दुपारपर्यंत नऊ मंडळे या मार्गावरून पुढे सरकली. सायंकाळी आकर्षक देख्यांची परंपरा असलेली मंडळे या मार्गावर आली.  

हत्ती गणपती आणि श्री छत्रपती शिवाजी गुलटेकडी मार्केट यार्ड मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी रात्री मोठी गर्दी झाली. त्याचवेळी श्री साने गुरुजी मित्र मंडळ, शिवदर्शन मित्र मंडळांसह बहुतांशी मंडळांच्या आकर्षक देखाव्यांनी मार्ग उजळून निघाला.

रात्री साडेअकरापर्यंत २५ मंडळे या रस्त्यावरून मार्गस्थ झाली. त्यानंतर सकाळी सव्वानऊपर्यंत १२२ मंडळांची या मार्गावर नोंद झाली.

लक्ष्मी रस्ता - महोत्सवी मंडळे ठरली गणेशभक्तांसाठी आकर्षण
रथांना फुलांची आरास, विद्युत रोषणाई, ढोल-ताशा पथकांचे तालबद्ध वादन, बाप्पाचा जयघोष अन्‌ वरुणराजाची हजेरी अशा भक्तिमय वातावरणात लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक रंगली.  

दुपारी तीनच्या सुमारास बेलबाग चौकातून मानाचे पाच गणपती गेल्यानंतर सुवर्ण महोत्सवी व शताब्दी वर्ष साजरे करणारी मंडळे रांगेत आली. त्वष्ठा कासार समाज संस्था गणेशोत्सव मंडळाने ज्योतिबा देवस्थानचा देखावा केला होता. १२५वे वर्ष साजरे करणारे पत्र्या मारुती मंडळ, सुवर्ण सराफ गणपती ट्रस्ट, शताब्दी वर्ष साजरे करणारे निंबाळकर तालीम, हीरक महोत्सवी वर्षात असलेल्या जनता जनार्दन मंडळाची मिरवणूक खास आकर्षण ठरले. रामेश्वर चौक तरुण मंडळाने विठ्ठल-रुक्‍मिणी, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांचा आकर्षक रथ केला होता. सुवर्ण महोत्सवी वर्षात आलेल्या नाना हौद तरुण मंडळाने कमळ रथात ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान केली होती. होनाजी तरुण मंडळाचा पांडुरंगाच्या मूर्तीचा देखावा लक्षवेधी ठरला. 

ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात असल्याने वीर हनुमान मित्र मंडळाने ‘जन्मशताब्दी रथ’ तयार केला होता. मुठेश्‍वर मंडळाने मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण केली. गर्जना पथकाने केलेले नावीण्यपूर्ण ढोलवादन लक्षवेधी ठरले. 

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पावसाला सुरवात झाल्यानंतरही ढोल-ताशा पथकांनी जोशपूर्ण वादन सुरू ठेवले. सकाळी साडेदहाला मिरवणूक सुरू झाल्यानंतर रात्री १२ या साडेतेरा तासांत केवळ २९ मंडळे बेलबाग चौकातून पुढे गेली.  

ध्वनिवर्धकाच्या दणदणाटावर थिरकणारी तरुणाईची पावले बाराच्या ठोक्‍यावर थांबली. तोपर्यंत जिलब्या मारुती मंडळाचा रथ बेलबाग चौकातून पुढे सरकला होता.  पारंपरिक वाद्यांच्या निनादात बाबू गेनू मंडळाचा मयूर रथ बेलबाग चौकाच्या दिशेने निघाला. गजलक्ष्मी, शिवतेज आणि रुद्रगर्जना यांच्या ढोलवादनानंतर मंडळाचा मयूर रथ चौकात दाखल झाला. गर्दीतच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे पहिले पथक दाखल झाले. तासाभराने आकर्षक फुलांची सजावट केलेल्या पारंपरिक रथात विराजमान झालेल्या गणरायाची मूर्ती मध्यरात्री बेलबाग चौकात आली. दोन वाजता मिरवणूक मार्गस्थ झाली.

काय करतात गणेश मंडळे? 
गणेशोत्सवानंतर वर्षभर पुण्यातील विविध गणपती मंडळे सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवतात. याची माहिती देण्यासाठी बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने ‘काय करतात गणेश मंडळे?’ असा प्रश्‍न करत मंडळांच्या कार्याची माहिती देत रथाची सजावट केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com