esakal | #बाप्पामोरया : अवघाचि जल्लोष!
sakal

बोलून बातमी शोधा

Bappa-Moraya

मानाच्या गणपतींचे गुरुवारी विसर्जन
कसबा गणपती - संध्याकाळी ४.२८
तांबडी जोगेश्वरी - संध्याकाळी ४. ५४ 
गुरुजी तालीम - संध्याकाळी ५.५२  
तुळशीबाग - संध्याकाळी ६ .० ५ 
केसरीवाडा - संध्याकाळी ६.३० 

शुक्रवारी विसर्जन झालेले गणपती
भाऊसाहेब रंगारी - सकाळी ६.३० 
अखिल मंडई मंडळ - सकाळी ७.०५ 
दगडूशेठ हलवाई - सकाळी ७.५४ 

#बाप्पामोरया : अवघाचि जल्लोष!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव2019 : पुणे - तरुणाईचा जल्लोष, आकर्षक देखावे, बॅंडचे सुरेल वादन, ढोल-ताशांच्या निनादात शहरातील विसर्जन मिरवणुकीचा शुक्रवारी सकाळी जल्लोषात समारोप झाला. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणांमध्ये पुणेकरांनी लाडक्‍या गणरायाला निरोप दिला.

वरुणराजाच्या हजेरीमुळे निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणामुळे अवघे वातावरण गणेशमय झाले. विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये अंतर राहण्याची ‘प्रथा’ यंदाही कायम राहिली. लाखो भाविक रस्त्यावर असूनही कोणतीही दुर्घटना न घडता मिरवणूक सुरळीत पार पडली.

महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यावर महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार अनंत गाडगीळ, तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मानाच्या गणपतींची आरती झाली. त्यानंतर मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. दुपारनंतर केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्त्यावरील मिरवणुकांना प्रारंभ झाला. या चारही मार्गांवर सुमारे ८२५ मंडळांनी मिरवणूक काढली.

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या पुढे कामायनी, झाशीची राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे कलावंत पथक होते. पाठोपाठ मानाचा दुसरा तांबडी जोगेश्‍वरी, तिसरा गुरुजी तालीम मंडळ व चौथा तुळशीबाग सार्वजनिक मंडळाचा गणपती सायंकाळी बेलबाग चौकातून टिळक चौकाच्या दिशेने रवाना झाला. पुढे मिरवणुकीत केसरीवाडा हा मानाचा पाचवा गणपती सहभागी झाला. परदेशी पर्यटकांचीही उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. बेलबाग चौकातून मानाचे पाच गणपती मार्गस्थ झाल्यावर सुवर्णमहोत्सवी, शताब्दी वर्ष साजरी करणारे मंडळे रांगेत आली. टिळक चौकात महापालिकेच्या मंडपात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही वेळ उपस्थिती लावली. महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी यांनी मंडळांचे स्वागत केले.

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पावसाला सुरवात झाल्यानंतरही ढोल-ताशा पथकांनी जोशपूर्ण वादन सुरू ठेवले. लक्ष्मी रस्त्यावर ध्वनिवर्धकाच्या दणदणाटावर थिरकणारी तरुणाईची पावले बरोबर बाराच्या ठोक्‍यावर थांबली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टिळक चौकातून मार्गस्थ झाल्यावर चारही विसर्जन मार्गांवरील मंडळांचे ध्वनिवर्धक पोलिसांनी बंद केले होते. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी काही काळ ठिय्या मांडला होता.

मिरवणुकीचे आकर्षण असलेले गणपती विसर्जनासाठी रवाना झाल्यावर गर्दी ओसरली अन्‌ उर्वरित मिरवणुकीला वेग आला. कासेवाडीतील महाराष्ट्र तरुण मंडळाच्या श्रींचे सर्वांत शेवटी दुपारी एक वाजून २१ मिनिटांनी विसर्जन झाले.

हलगी व पिपाणीचा आवाज
अलका चौकासह सर्वच मार्गांवर सकाळी सातनंतर पोलिसांनी स्पीकर लावण्यास बंदी केली होती. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी पिपाणी वाजवत हलगीवर ठेका धरला होता. ध्वनिवर्धक लावू नये म्हणून पोलिसांनी अनेक मंडळांच्या ध्वनिवर्धकाचे मशिनच काढून नेले होते. ध्वनिवर्धकामधील मुख्य भाग असलेले स्पीच नावाचे मशिनच पोलिसांनी जप्त केले होते. 

लक्षवेधी ‘रुद्र’ अवतार 
समर्थ ढोल-ताशा पथकाने भगवान शंकराच्या रुद्र अवताराच्या थीमवर ढोलवादन केले. या पथकातील तरुण-तरुणींनी  डोक्‍यावर जटा, कपाळावर मोठे गंध आणि तिसरा डोळा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा व ढोल वाजवताना चेहऱ्यावरील हावभावामुळे हे पथक मिरवणुकीतील लक्षवेधी ठरले. या पथकाने ढोल-ताशांसह डमरू, झांज, टाळांच्या ठेक्‍यावर हलगी, लावणी, सुडोवादन, ट्राश हे ताल वाजवले. 

सकाळीच टिळक चौक मोकळा
नवतरुण मित्र मंडळाचा रथ शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास टिळक चौकातून मार्गस्थ झाला. त्यानंतर काही मिनिटांतच चौक मोकळा झाला होता. मिरवणूक लवकर संपण्याची चिन्हे दिसताच पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम चौकात दाखल झाले होते. पोलिसांची परेड झाल्यानंतर लगेच चौक मोकळा झाला होता. त्यानंतर काही वेळात तेथून वाहतूकदेखील खुली करण्यात आली. 

पोलिसांसाठी भोजनाची व्यवस्था
स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने बंदोबस्तावरील पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचा लाभ १२०० जणांनी घेतला. असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र धावडे यांनी सांगितले. पेठकर प्रोजेक्‍ट’तर्फे डेक्कन परिसरात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना जेवण देण्यात आले. याचा २५० जणांनी लाभ घेतल्याचे जितेंद्र पेठकर यांनी सांगितले.