गणेशोत्सव2019 : चिंचवडमध्ये १०, तर पिंपरीत १२ तास मिरवणूक

Ganpati-Visarjan
Ganpati-Visarjan

‘मोरया मोरया’चा अखंड जयघोष
पिंपरी - भंडारा - फुलांची मुक्तहस्ते उधळण... ढोल-ताशांच्या गजर... ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत चिंचवडमधील ३६ सार्वजनिक मंडळांसह अनेक घरगुती गणेशमूर्तींचे गुरुवारी (ता. १३) मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. लाडक्‍या गणरायाला निरोप देताना काहींना अश्रू अनावर झाले होते. चिंचवडगावातील विसर्जन मिरवणूक दहा तास चालली. 

दुपारी दोन वाजता दळवीनगर येथील मित्र मंडळाच्या गणेश विसर्जनाने मिरवणुकीला प्रारंभ झाला. मंडळाचे अध्यक्ष विशाल ढमढेरे यांच्या हस्ते मूर्तीचे विसर्जन झाले. त्यानंतर सुमारे साडेपाच तासांनंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीएनबी हाउसिंग गणेश उत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन झाले. पाठोपाठ बाल तरुण मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जनानंतर मिरवणुकीने वेग घेतला. दर पाच ते २० मिनिटांच्या अंतराने मिरवणुका चापेकर चौकात दाखल होत होत्या. चिंचवड पोलिस ठाणे व महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. त्या ठिकाणी नगरसेवक राजेंद्र गावडे, भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अभिनेत्री आशा नेगी यांनी गणेश मंडळांचे स्वागत केले. 

गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक पाहणे हा सुंदर अनुभव असतो. तसाच तो या वेळीही होता. अनेक मंडळांचे एकाहून एक सरस देखावे पाहायला मिळाले. एकाच ठिकाणी एकाच दिवशी एवढे देखावे पाहायला मिळाल्याने डोळ्यांचे पारणे फिटले, अशी प्रतिक्रिया नागेश जोशी यांनी नोंदविली. 

भाविकांची गर्दी
मंडळांच्या मिरवणुकांमधील भव्य तसेच आकर्षक देखावे पाहण्यासाठी टप्प्याटप्प्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिस तसेच पोलिस मित्र व स्वयंसेवी संस्था-संघटनांच्या स्वयंसेवकांकडून गर्दीचे नियोजन करण्यात येत होते. त्यामुळे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन मिरवणूक पार पडली. 

दिवसभर उघडीप दिलेल्या पावसाने सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अचानक जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मिरवणुकीच्या तयारीत असणाऱ्या कार्यकर्त्यांची चांगलीच धांदल उडाली. तसेच मार्गस्थ झालेल्या मिरवणुका काही काळ रेंगाळल्या. त्यानंतरही अधूनमधून पावसाची भुरभुर सुरू होती. रात्री नऊनंतर मिरवणुकीत विशेष रंग भरला. त्यानंतर रात्री सव्वाअकराच्या सुमारास पावसाची जोरदार सर बरसली. मात्र कार्यकर्ते व गणेशभक्तांचा उत्साह कायम होता. पावसाच्या सरी अंगावर झेलत कार्यकर्ते वादन आणि नाचण्यात मग्न होते. 

आयुक्तांचाही सहभागी
यंदा नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहाला वेग होता. त्यामुळे भाविकांनी काठालगतच्या पाण्यात मूर्ती विसर्जित केल्या. भाविकांनी विसर्जन केलेल्या मात्र वाहून न गेलेल्या गणेशमूर्ती बाहेर काढण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर व ‘ब’ प्रभाग अधिकारी संदीप खोत यांनीही सामाजिक संस्थांना मदत केली.

ढोल-ताशांचा घुमला गगनभेदी गजर
पिंपरी - भंडाऱ्याची उधळण... ढोल-ताशाचा गजर.. फुलांची उधळण...रंगलेल्या फुगड्या... रिमझिम पाऊस... तालात थिरकणारी पावले..’ अशा उत्साही वातावरणात पिंपरीत ६८ मंडळांनी गुरुवारी (ता. १२) वाजतगाजत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी शगुन चौकात मोठी गर्दी केली होती. तब्बल बारा तास मिरवणुकीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

येथील डीलक्‍स चौकातील साईनाथ मित्र मंडळ गणपतीचे गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजता पहिले, तर सर्वांत शेवटी रात्री बारा वाजता राष्ट्रतेज मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन झाले. गुरुवारी दुपारी काही काळ मिरवणूक रेंगाळली होती. सायंकाळी पाच वाजता पुन्हा सुरवात झाली. पावसातही गणेश भक्तांचा उत्साह कायम होता. पिंपरी चौकापासून ते शगुन चौक ते झुलेलाल घाटापर्यंत मिरवणूक वाजत गाजत एकामागे एक सुरू होत्या. 
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी काही मंडळाचा सत्कार केला. विसर्जनाची काही क्षणचित्रे मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह त्यांनाही आवरला नाही. महापौर राहुल जाधव यांनी मंडळांना शुभेच्छा दिल्या. महापालिकेच्या वतीने मंडळाच्या अध्यक्षांना नारळ हार देऊन सत्कार केला. नगरसेविका अर्चना बारणे उपस्थित होत्या. भाजी मंडईतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईचा ४९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बैलगाडीचा देखावा आकर्षक ठरला. बैलजोडीची फुलांची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हलगी आणि ढोलताशे पथकाचे वादन लक्षवेधक ठरले.

प्रशासनाची धावपळ 
रात्री दहानंतर पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. ‘आवरतं घ्या’ म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली. शिट्ट्या वाजवून मंडळांना ‘पुढे चला.. पुढे चला’ म्हणावे लागत होते. महापालिका तसेच वैद्यकीय विभागही भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत होता.

स्वच्छता दूतांची दमछाक 
पाऊस आणि फुलांच्या उधळणीने रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे दुचाकी घसरत होत्या. भाविकांच्या काळजीपोटी महापालिकेच्या स्वच्छतादूतानी स्वच्छता केली. 

घाटावर दक्षता 
अग्निशामक विभाग विसर्जनादरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी नदीत दोर लावून मूर्ती विसर्जन करण्यास भाविकांना मदत करीत होते. पोलिसांचाही या ठिकाणी बंदोबस्त होता. बोटीने गणपती मूर्ती सुरक्षित पाण्याच्या आत सोडल्या जात होत्या. 

हौदात विसर्जनास प्रतिसाद 
घरगुती गणरायाचे मोठ्या संख्येने हौदात विसर्जन झाले. पिंपरीगाव वैभवनगरमध्ये १८ व २४ फुटांच्या हौदात ११८० मूर्तींचे विसर्जन झाले. आसवानी असोसिएट्‌स व ॲस्पिफला इन्व्हायर्न्मेंट यांच्या वतीने हौदांची उभारणी केली होती.पान ६ वर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com