"श्रीं'च्या स्थापनेत मोठ्या मंडळांमध्ये वाढ 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 September 2019

नाशिक : गतवर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या गणेशोत्सवामध्ये मोठ्‌या सार्वजनिक मंडळांची संख्येत वाढ झाली आहे. त्या तुलनेत मात्र लहान सार्वजनिक मंडळांची संख्या घटली आहे. तर, मौल्यवान गणपतीमध्ये गतवर्षापेक्षा एकाने वाढ नोंदली गेली आहे. सालाबादाप्रमाणे सर्वाधिक मौल्यवान गणपती हे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्‌दीत असून, सर्वाधिक मंडळांची नोंदणी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून "श्रीं'ची स्थापना करणाऱ्या सार्वजनिक मंडळांच्या संख्येत चढउतार होताना दिसत आहे. 

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 13 पोलीस ठाण्यानिहाय "श्री'ंची प्रतिष्ठापना करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांसह लहान-सहान मंडळांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार यंदा 194 मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी तर 501 लहान गणेश मंडळांनी "श्रीं'ची प्रतिष्ठापना केली आहे. यामध्ये यंदा 36 मौल्यवान गणपती असून यात, आर.के.वरील रविवार कारंजा मित्र मंडळ, नाशिकचा राजा, मुंबई नाक्‍यावरील युवक मित्र मंडळ, उपनगर परिसरातील बालाजी फांऊडेशन, भद्रकालीतील भद्रकाली कारंजा मित्र मंडळ, राजमुद्रा मित्र मंडळ, सत्यम सांस्कृतिक मंडळ, जाणता राजा मित्र मंडळ आदी सार्वजनिक मंडळांचा समावेश आहे. 

गतवर्षी शहरात 172 मोठ्या तर 594 लहान गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. यामध्ये 35 मौल्यवान गणपतींचा समावेश होता. नेहमीप्रमाणे पोलिसांनी मौल्यवान श्रींच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविली आहे. त्यादृष्टीने संबंधित मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सुरक्षारक्षकांचीही नेमणूक केली आहे. तसेच मंडळांचे कार्यकर्त्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्त आहे. 

गतवर्षांतील आकडेवारी 
वर्ष मोठे मंडळ (कंसात मौल्यवान) लहान मंडळ एकूण 
2019 194 (36) 501 695 
2018 172 (35) 594 766 
2017 179 (39) 567 746 
2016 185 (34) 669 854 
2015 -- (33) -- 506 

पुरग्रस्तांना मदत 
शहरातील काही गणेश मंडळांनी यंदा पश्‍चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करण्याच्या हेतूने श्रींची प्रतिष्ठापना केलेली नाही. सदरचा खर्च त्यांनी पुरग्रस्ताना दिला आहे. त्याचप्रमाणे काही मंडळांनी गणेशोत्सवात सहभाग घेतला परंतु खर्च करून तो खर्च पुरग्रस्तांना दिला जाणार आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक मंडळांच्या संख्येत घट झाली असावी असे सांगितले जाते. 
 
पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त 
शहरात पोलीस ठाण्यानिहाय पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानुसार, पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे, परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय खरात यांनी आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यांना भेट देत बंदोबस्तांच्या नियोजनाची माहिती घेतली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना चोख बंदोबस्ताच्या सूचना केल्या आहेत. यंदा गणेशोत्सवासाठी सुमारे अडीच हजार पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Mandal Increase in this year