गणेशोत्सवात श्रीफळाचे दर वाढले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

गणेशोत्सवादरम्यान नारळाची मागणी वाढत असल्यामुळे एपीएमसी बाजारात नारळाची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नारळ खरेदीसाठी बाजारात गर्दी होत असल्याचे दिसते. नारळाची मागणी वाढल्याने परिणामी दरातही वाढ झाली आहे.

नवी मुंबई : गणेशोत्सवादरम्यान नारळाची मागणी वाढत असल्यामुळे एपीएमसी बाजारात नारळाची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नारळ खरेदीसाठी बाजारात गर्दी होत असल्याचे दिसते. नारळाची मागणी वाढल्याने परिणामी दरातही वाढ झाली आहे.

नारळाचे सर्वाधिक उत्पादन हे तमिळनाडूमध्ये होते. त्यामुळे बाजारात ८० टक्के नारळ तमिळनाडूमधून येतात. बाकी इतर २० टक्के नारळ हे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून येत असतात. केरळमधून येणारे नारळ हे सर्वाधिक चांगले मानले जातात. मात्र, त्यांची आवक फेब्रुवारी ते मे दरम्यानच होते. तमिळनाडूमधून मात्र वर्षभर नारळाची आवक होत असते. वर्षभर घाऊक बाजारात नारळाच्या १५ ते ४० गाड्या दररोज बाजारात येत असतात. मात्र, गणेशोत्सवादरम्यान नारळाची आवक वाढते. त्यानुसार सध्या ५० ते ७० गाड्या नारळ दररोज बाजारात येत आहेत. आकारानुसार नारळाचा दर ठरत आहे. घाऊक बाजारात लहानात लहान नारळ सध्या ८ रुपयांपासून ते मोठ्यात मोठा नारळ ३० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. घाऊक बाजारात नारळाच्या आकारानुसार, गोणीवर नारळाचा दर ठरत असतो. त्यानुसार किरकोळ बाजारात लहानात लहान नारळ १५ रुपयांपासून ते ४० ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

दोन ते पाच रुपयांची वाढ
गणेशोत्सवादरम्यान गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक प्रत्येकाच्या घरी बनवले जातात. मोदक बनवण्यासाठी आणि देवाला अर्पण करण्यासाठी या दरम्यान नारळाला मागणी वाढते. त्यामुळे नारळ खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळते. नारळाच्या किमतीत प्रत्येक नारळामागे २ ते ५ रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती मुंबई श्रीफळ मर्चंट असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coconut prices increased during Ganeshotsav