गणरायाचे विसर्जन खड्ड्यांतूनच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवर पडलेले सर्व खड्डे बुजविण्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. मात्र, हे खड्डे बुजविण्यात महापालिकेला सपशेल अपयश आले असून, बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच झाले आहे; तर आता विसर्जनदेखील खड्ड्यातूनच करावे लागेल का? अशी चिंता गणेश भक्तांकडून व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई : गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवर पडलेले सर्व खड्डे बुजविण्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. मात्र, हे खड्डे बुजविण्यात महापालिकेला सपशेल अपयश आले असून, बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच झाले आहे; तर आता विसर्जनदेखील खड्ड्यातूनच करावे लागेल का? अशी चिंता गणेश भक्तांकडून व्यक्त केली जात आहे.

पावसाळा सुरू झाला, की दोन-चार दिवसांत शहरात खड्डे पडण्यास सुरुवात होते. वारंवार हे खड्डे भरूनदेखील पुन्हा खड्डे पडतच जातात. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मात्र, तारेवरची कसरत करावी लागते; तर कधीकधी हे खड्डे वाहनचालकांच्या जीवावरदेखील बेतले आहेत. त्याचप्रमाणे या वर्षीही पावसाळ्यात शहरातील अंतर्गत रस्त्यांची दैना झाली होती. गणेशोत्सवापूर्वी शहरातील हे सर्व खड्डे बुजविण्यात येतील, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. त्यानुसार शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे भरले तर अंतर्गत रस्त्यावरील व गावठाण परिसरातील खड्डे भरण्याचा पालिकेला विसर पडल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यावर पडलेल्या या खड्‌ड्‌यांमध्ये काही ठिकाणी खडीचा भराव टाकून तात्पूर्ती डागडुजी केली गेली. मात्र, पावसात खडी वाहून गेल्याने खड्ड्यांची परिस्थिती पुन्हा जैसे थेच आहे; तर काही ठिकाणी डांबर टाकून खड्डे भरले आहेत. मात्र, त्यांचीदेखील पुन्हा दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या खड्डयांतूनच बाप्पांचे आगमन झाले असून, दीड दिवसांचे विसर्जनदेखील या खड्डयांतूनच करण्यात आले. त्यामुळे आता पुढील विसर्जनदेखील खड्ड्यांतूनच करावे लागणार का? अशी चिंता गणेश भक्तांना सतावत आहे. त्यामुळे किमान हे खड्डे पुढील गणेश विसर्जनापूर्वी तरी बुजवावे, अशी मागणी गणेश भक्तांकडून करण्यात येत आहे.

बोनकोडे गावात पुन्हा उखडलेल्या खड्डयांचे साम्राज्य पहावयास मिळत असून, या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी तर होतच आहे; शिवाय बाप्पाचे आगमनही या खड्ड्यांतूनच करावे लागले. मागीलवर्षी बोनकोडे गावाचा विसर्जन तलाव बुजविण्यात आला. त्यामुळे मूर्ती विसर्जन करायला इतर ठिकाणी पायपीट करावी लागेल. त्यामुळे बाप्पाला घेऊन या खड्ड्यांतूनच पायपीट करावी लागत आहे.
- प्रदीप म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते, बोनकोडे गाव.

गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक, काँक्रीटीकरण तर काही ठिकाणी खडीचा भराव टाकण्यात आला होता. यावर्षीपासून रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता परिमंडळनिहाय ठेका देण्यात आला असून, त्या अंतर्गत ही कामे केली जात आहेत.  
- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh immersion into the pits