पारंपरिक गणेशमूर्तींना वाढती मागणी

पारंपरिक गणेशमूर्तींना वाढती मागणी
पारंपरिक गणेशमूर्तींना वाढती मागणी

नवी मुंबई : चित्रपट, दूरचित्रवाणींवरील प्रमुख भूमिकांचा परिणाम दरवर्षी गणेशोत्सवात दिसून येतो. बाहुबली हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर गाजला. तसेच जय मल्हार ही मालिकादेखील तितकीच लोकप्रिय ठरली. याचेच प्रतिबिंब गेल्या दोन वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळाले. बाहुबली आणि जय मल्हार या रूपातील गणरायाच्या मूर्ती गेल्या दोन वर्षी प्रकटल्या होत्या. याच पार्श्‍वभूमीवर यंदा लालबागचा राजासह चिंचपोकळी, वसईचा राजा व बालगणेश यांच्या वेशातील मूर्तींना ग्राहकांची पसंती आहे.

गणरायाची मूर्ती घेताना पिवळे पितांबर, लाल सोवळे, डोळे, सोनेरी मुकूट या बाबी कटाक्षाने पाहिल्या जातात. यातील रचनेमध्ये थोडाही फरक आढळला, तर तो अनेकांना खटकतो. म्हणूनच उत्सवाबरोबर पारंपरिक मूर्ती घेणे हेही दिव्यकार्यच असते; मात्र स्पर्धेच्या युगात ही परंपरा जपली जात असल्याने पारंपरिक गणेश मूर्ती यंदा बाजारात दाखल झाल्या असून, या मूर्तींना मागणी वाढत आहे.

नवी मुंबईमधील कारखान्यात तयार होत असलेल्या मूर्तींमध्ये सुमारे ४० ते ५० टक्के मूर्ती या पद्धतीच्या आहेत. शाडू मातीच्या गणेशमूर्ती पर्यावरणस्नेही असल्या, तरी त्या किमतीला पीओपी मूर्तींपेक्षा सुमारे ३० ते ४० टक्के अधिक महाग असतात. शाडू मातीच्या मूर्ती वजनाला जड असतात. या मातीपासून बनवलेल्या मूर्ती अधिक नाजूक असतात. त्यामुळे आठ फुटांपेक्षा जास्त मोठ्या मूर्ती बनवू शकत नाहीत. पीओपीपासून बनवलेल्या मूर्ती किमतीला कमी, वजनाला हलक्‍या, अधिक मजबूत व मोठ्या मूर्ती सहज बनवता येतात. मात्र या मूर्ती पर्यावरणस्नेही नसतात. यंदा मात्र शाडू मातीच्या मूर्तींना अधिक पसंती असल्याचे विक्रांत कला निकेतन केंद्राचे मालक संतोष चौलकर यांनी सांगितले.

यावर्षी लालबागचा राजा, चिंचपोकळी, वसई व बालगणेश पद्धतीच्या सिंहासनावर बसलेल्या गणेश मूर्तींना अधिक मागणी आहे. त्यामुळे कारखान्यात तयार होत असलेल्या मूर्तींमध्ये सुमारे ४० ते ५०  टक्के मूर्ती या पद्धतीच्या आहेत.
- संतोष चौलकर, मूर्तिकार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com