बॅनरबाजीसाठी गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचा आधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

गणेशोत्सवात विनापरवाना बॅनरबाजी करणाऱ्या राजकारण्यांकडून चौका-चौकात शुभेच्छांचे अनधिकृत होर्डिंग उभारून प्रसिद्धीची पोळी भाजली जात आहे. शहराचे विद्रूपीकरण होत असताना राजकीय नेते मात्र, त्याकडे तितक्‍याशा पोटतिडकीने पाहत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावर शुभेच्छा आणि स्वागताच्या कमानी उभारल्या आहेत; तर दुसरीकडे विनापरवाना बॅनरबाजी करणाऱ्या राजकारण्यांकडून चौका-चौकात शुभेच्छांचे अनधिकृत होर्डिंग उभारून प्रसिद्धीची पोळी भाजली जात आहे. शहराचे विद्रूपीकरण होत असताना राजकीय नेते मात्र, त्याकडे तितक्‍याशा पोटतिडकीने पाहत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

उच्च न्यायलयाने अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत; तर नवी मुंबई महापालिकेडूनही शहरात बॅनर लावण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, प्रभाग कार्यालयांच्या प्रभाग आधिकाऱ्यांनी चौका-चौकातील या अनधिकृत बॅनरकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गासह शहरातील मध्यवर्ती गावठाण भागातून जाणारे रस्ते सध्या राजकीय नेत्याच्या बॅनरमुळे झाकले गेलेले आहेत. पालिका क्षेत्रातील सर्वच नोडमध्ये अनधिकृत बॅनरबाजी केली जात असल्याचे दिसून येत आहे. तर एखाद्या चौकातून जात असताना संपूर्ण चौकालाच बॅनरचा विळखा असल्याने नेमके कुठे जात आहोत, याची विचारणा बाहेरून आलेल्या नागरिकांना करावी लागत आहे. बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रूपीकरण मोठ्या प्रमाणात होत असताना पालिका प्रशासनाकडून मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या संदर्भात अतिक्रमण उपायुक्त अमरिश पटनीगिरी यांच्याशी सपंर्क साधला असता होऊ शकला नाही.

राजकीय नेत्यांकडून पुरेपूर फायदा
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू नसल्याने राजकीय नेत्यांकडून गणेशोत्सवात मिळालेल्या सवडीचा पुरेपूर फायदा घेतला जात आहे. शहरात सर्वाधिक बॅर्नर हे नामांकित राजकीय नेत्यांचे लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the political publicity support of banner in Ganeshotsav's wishes