
सोन्याळ - चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवणाऱ्या गावांना मोफत गणेश मूर्ती देण्याचा मानस व्यक्त केला आहे. दुष्काळी व पूरस्थितीचा विचार करून जत तालुक्यातील गणेश मंडळांनी प्रत्येक गावात एक गाव एक गणपती हा अभिनव उपक्रम राबवावा. हा उपक्रम राबवणाऱ्या गावातील गणेश मंडळाला मोफत मूर्ती व वृक्ष भेट देण्यात येणार आहेत.
गणेश मंडळांनी 29 ऑगस्टपर्यत संख येथील बाबा मंगल कार्यालय येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहन चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराजांनी पत्रकार परिषदेत केले. चिकलगी मठाच्या वतीने 2010 पासून जत तालुक्यातील गुडडापूर, गोधळेवाडी, संखसह अन्य गावात आतापर्यत 100 मंडळाला मोफत श्रीच्या मूर्ती देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक गावाला नवरात्र उत्सव काळात देवीची मूर्ती देण्यात येतात.
यावर्षी जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून गावातील मंडळांनी गावात एक गाव एक गणपती हा अभिनव उपक्रम राबवावा. हा अभिनव उपक्रम राबविणाऱ्या गावाला श्री ची मोफत मूर्ती तर देण्यात येईलच पण त्याचबरोबर त्या गावात चिकलगी मठ व गणेश मंडळाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करण्यात येणार आहे. त्यासाठी आपण मोफत वृक्ष देणार असल्याचे सांगितले.