
पुण्यातील गणेशोत्सवाचा लौकिक देशभर पसरलेला आहे. तरुणांना एकत्र आणून स्वातंत्र्यासाठी जनमत निर्माण करण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळक, भाऊसाहेब रंगारी यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बनलेल्या या उत्सवास सव्वाशेपेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. शहरातील अनेक गणेश मंडळांचे यंदाचे शताब्दीचे वर्ष आहे. त्यानिमित्त अशा गणेश मंडळांचा हा आढावा.
पुणे : निंबाळकर तालमीतील तरुण पैलवांनी एकत्र येत 1920 साली गणेशोत्सवास सुरवात केली. ध्यानस्थ, जटाधारी गणेश मूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. उत्सवाच्या पहिल्या वर्षी तालमीच्या खिडकीत श्रींची प्रतिष्ठापना केली होती. गेल्या शंभर वर्षात मंडळाने अनेक सामाजिक कार्यक्रम केले आहेत.
तालमीतील पैलवान ग्यानबा अभंग, गणपतराव कोंढाळकर, बापूसाहेब गोराडे, सोनबा शितोळे, अनंतराव काशीद, बापूसाहेब शिंदे आदींनी पुढाकार घेत 1920 मध्ये गणेशोत्सव सुरू केला. मंडळाचा रौप्य महोत्सव 1945 साली साजरा करण्यात आला. शास्त्रीय गायिका श्यामला माजगावकर यांच्या गायनाचा कार्यक्रम त्यानिमित्ताने झाला होता. तेव्हापासून मंडळाची शास्त्रीय गायनाची परंपरा सुरू झाली. तर 1970 ला सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भारतरत्न बिस्मिल्ला खॉं यांच्या शहनाई वादनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. सुवर्ण महोत्सवी वर्षात पं. भीमसेन जोशी, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे कार्यक्रम झाले.
निंबाळकर तालीम मंडळाने शंभर वर्षांत अनेक सामाजिक कार्यक्रमही केले. पानशेत धरण फुटल्यानंतर पूरग्रस्तांना मदत, दरवर्षी गरजूंना धान्यवाटप, दिवाळीत वंचित-गरजू मुलांना कपडेवाटप, शहीद जवानांच्या माता व पत्नींचा सन्मान, विद्यार्थ्यांना शालेय साहित्यवाटप, दुष्काळी भागात चारावाटप, धान्यवाटप असे विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात. तसेच दरवर्षी देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी सांगितले.
शताब्दी वर्षानिमित्त मंडळाने तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती हा देखावा उभारला आहे. तसे शताब्दी वर्षात मंडळाकडून वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महिला दिनाचे औचित्य साधत कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. कोल्हापूर-सांगली भागातील पूरग्रस्तांसाठी धान्याचे वाटप केले. तसेच पुढील काळात विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जाणार आहे. असे पवार यांनी सांगितले.
शतकोत्तरी रौप्य महोत्सवी, शताब्दी महोत्सव, हीरक महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी आणि रौप्य महोत्सवी मंडळांनी आपली माहिती 'सकाळ'कडे पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.