बाप्‍पांच्‍या स्‍वागतात कोंडीचे विघ्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

कल्याण - गणपतीचे आगमन होणार असल्याने गुरुवारी (ता. २४) नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडल्याने बाजारपेठा आणि रस्ते फुलून गेले होते. सकाळी कल्याण-शिळ फाटा रोड, कल्याण-वालधुनी रस्ता, दुर्गाडी पूल, शहाड पूल परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. चार तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक पोलिसांनी ही कोंडी फोडली. सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांचे यात हाल झाले.

कल्याण पत्रीपुलाजवळ कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मोठी बाजारपेठ आहे. फूल आणि फळ बाजारात पहाटे वाहने येतात. शुक्रवारी (ता. २५) गणपतीचे आगमन होणार असल्याने अनेकांनी सकाळीच खरेदीसाठी घर सोडले. कल्याण पत्रीपुलाजवळ सकाळी ७ वाजता वाहनांची गर्दी वाढून कल्याण-शिळ फाटा रोडवरील टाटा पावरपर्यंत रांग लागली. शिवाजी चौक, सहजानंद चौक, वालधुनी पूल, शहाड पुलावर वाहने अडकून पडली होती. त्यामुळे शहर आणि प्रमुख रस्त्यांवर वाहनांची रांग असे सर्वत्र चित्र होते.

कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी वाहतूक कोंडी झालेल्या ठिकाणी वाहतूक पोलिसांना पाठवून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. कल्याण-शिळ फाटा रोडवरील डोंबिवलीच्या दिशेकडेही वाहने खोळंबल्याने कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले. डोंबिवलीमधील सामाजिक संघटना ईगल ब्रिगेडचे विश्‍वनाथ बिवलकर, चंद्रकांत घाग, समीर कांबळी, संजय गायकवाड, नीलेश चंद्रशेखर, मंदार लेले आदींनी वाहतूक पोलिसांना मदत केली. चार तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत झाली.

गणेशमूर्ती नेण्यासाठी लगबग
गणेशोत्सवानिमित्त लागणारे साहित्य विकणाऱ्या फेरीवाल्यांनी दुकाने थाटली होती. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने शिवाजी चौक ते महंमदअली चौक व्हाया दीपक हॉटेल हा परिसर फुलून गेला होता. या परिसरात वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. शिवाजी चौकाच्या काही अंतरावर कुंभारवाडा असल्याने तेथील गणेशमूर्ती नेण्यासाठी भक्तांची लगबग सुरू होती. 

Web Title: ganesh festival 2017 kalyan ganesh ustav