पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 September 2017

कऱ्हाड - कऱ्हाड पालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन उपक्रमास प्रतिसाद वाढू लागला आहे. गौरी विसर्जनादिवशीपर्यंत काल  एक हजार ७०० गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. 

कऱ्हाड - कऱ्हाड पालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन उपक्रमास प्रतिसाद वाढू लागला आहे. गौरी विसर्जनादिवशीपर्यंत काल  एक हजार ७०० गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. 

येथील पालिकेने २००६ पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी एन्व्हायरो फ्रेंड्‌स नेचर क्‍लबच्या सहकार्याने पुढाकार घेतला. गेल्यावर्षी विसर्जन मूर्तींची संख्या दीड हजारांपर्यंत पोचली होती.  पालिकेने यंदाही शहरात सहा ठिकाणी जलकुंड तयार केले आहेत. त्यात विसर्जित होणाऱ्या मूर्ती एकत्र करून त्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रानजीक तयार केलेल्या दोन कृत्रिम तलावांत सोडल्या जात आहेत. काल (ता. ३१) घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यंदा आजअखेर विसर्जित गणेशमूर्तींची संख्या सतराशेपर्यंत पोचली आहे. त्यात सर्वाधिक सुमारे एक हजार २०० मूर्तींचे विसर्जन कृष्णा घाटावरील जलकुंडात झाले. त्या पाठोपाठ शिवाजी सोसायटी उद्यानातील जलकुंडात २००, कृष्णा नाका १३०, आदरणीय पी. डी. पाटील उद्यानानजीक ८६ मूर्तींचे विसर्जन झाले. कोयनेश्वर घाट, दत्त चौक, मार्केट यार्ड गेट क्रमांक एकनजीकच्या जलकुंडातही काहीसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते. 

नऊ ट्रॉली निर्माल्य जमा
पर्यावरणपूरक गणशोत्सव साजरा करताना नदीकाठांसह जलकुंडानजीक निर्माल्य जमा करण्यासाठी पालिकेने वाहनांची सोय केली आहे. यंदा नऊ ट्रॉली निर्माल्य जमा झाले आहे. निर्माल्य जमा करण्याच्या उपक्रमासही मिळणारा प्रतिसाद लक्षणीय असून लोकांमध्ये त्याबाबत जागरूकता होत असल्याचे दिसून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 karad ganesh ustav ganes visarjan