गवताचा बाप्पा आशीर्वादासाठी सज्ज! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई - कोणीही मोठा देणगीदार नाही... गणेशोत्सवासाठी वर्गणी नाही... अशा प्रतिकूल परिस्थितीतही दरवर्षी "भुताचा गणपती' विराजमान होतो. धारावीतली बच्चे कंपनीच बाप्पाची मूर्ती साकारते अन्‌ तीही फक्त 1200 रुपयांमध्ये... कोणाकडूनही वर्गणी न घेता! अवघ्या काही दिवसांत गवतापासून बनवण्यात आलेली धारावीतील इलेव्हन्स एविल्स क्रिकेट क्‍लब गणेशोत्सव मंडळाची सहा फुटी मूर्ती प्रोफेशनल कलाकारांना लाजवेल अशी आहे. 

आम्ही गणेशोत्सवासाठी एकाही रहिवाशाकडून वर्गणी स्वीकारत नाही. मोठ्या मूर्तीचा खर्च आमच्या मंडळाला परवडणारा नाही. म्हणूनच मंडळातील दहा वर्षांपासून कॉलेजला जाणाऱ्या मुलांनीच मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांपासून आमचा बाप्पा आम्हीच साकारतो. यंदाही अवघ्या 1200 रुपयांमध्ये आम्ही मूर्ती साकारली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये एक वेगळा पायंडा आम्ही घातला आहे, असे इलेव्हन्स एविल्स क्रिकेट क्‍लब गणेशोत्सव मंडळाचे सदस्य अरविंद कटके यांनी सांगितले. 

गेल्या वर्षीही मंडळाने कागदाच्या लगद्याचा वापर करून मूर्ती साकारली होती. मंडळाच्या देखाव्याला शोभेल, अशी इको-फ्रेंडली मूर्ती यंदाही मंडळाने केली आहे. यंदाचा देखावा प्रतिज्ञेवर आधारित आहे. त्याला अनुसरून मंडळाने मूर्ती साकारली आहे. शाळेचा अभ्यास पूर्ण करत, कॉलेजचे लेक्‍चर करून मंडळातील मुले बाप्पाच्या कार्यशाळेत काम करत असतात. वेळप्रसंगी रात्री जागूनही मूर्तीचे काम केले जाते. यंदा मूर्तीसाठी त्यांनी अवघ्या तीनशे रुपयांचे गवत आणले. अडीचशे रुपयांचे वॉटरकलर मूर्तीसाठी लागले. उर्वरित रक्कम शाडूच्या मातीसाठी खर्च झाली. महत्त्वाचे म्हणजे धारावीसारख्या ठिकाणी पहिल्या माळ्यावर ती उभारण्यात आली आहे. रोजचे दोन ते तीस तास काम करून मुलांनी मूर्तीला आकार दिला आहे. पीओपीचा अजिबात वापर न करण्यात आलेली मूर्ती आतापासूनच अनेकांचे आकर्षण ठरली आहे. 

...म्हणून भुताचा गणपती 
अनेक मंडळे देवाचे नाव आपल्या मंडळाला देतात; पण काही तरी हटके असावे म्हणून "इलेव्हन्स एविल्स क्रिकेट क्‍लब गणेशोत्सव मंडळ' असे नाव अंतिम झाले. "भुताचा गणपती' म्हणून धारावीतील हे मंडळ प्रसिद्ध आहे. दरवर्षी गणपतीच्या देखाव्यात सामाजिक विषय हाताळतानाच समाजातील विकृती भुताच्या रूपात मांडण्यात येते म्हणून "भुताचा गणपती'. महत्त्वाचे म्हणजे, मंडळाच्या देखाव्याचाच एक भाग म्हणजे एविल्स झोन आहे. ज्यात मंडळातील कार्यकर्ते त्या विकृतीच्या भुताच्या रूपात असतात. 

Web Title: ganesh festival 2017 mumbai ganesh ustav