आता ध्यास पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा...

File Photo
File Photo

गणेशोत्सव पर्यावरणपूरक असायला हवा. तमाम गणेशभक्तांची ती धारणा आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक ‘सकाळ’ने आयोजित केली होती, त्यात हाच सूर उमटला. उत्सवातून भक्तीबरोबरच राष्ट्रप्रेम, एकात्मता, बंधुतेचा संदेश मिळावा. देखाव्यांतून प्रबोधन व्हावे. या लोकोत्सवातून नव्या दमाचे नेतृत्व तयार व्हावे. नवीन कलाकारांसाठीचे हे व्यासपीठ आणखी व्यापक व्हावे, अशाही सूचना आल्या. एक मात्र नक्की की, उत्सवाला विधायक वळण लागावे म्हणून सर्वांचीच तळमळ आहे. आजवर पोलिस, महापालिका आणि धर्मादाय आयुक्त यांनीसुद्धा अशा बैठका घेतल्या. ‘सकाळ’च्या व्यासपीठावर कार्यकर्ता म्हणून गणेश मंडळांचे पदाधिकारी अधिक खुलेपणाने व्यक्त झाले. पर्यावरण, प्रदूषणवर वर्षभर काम करण्यासाठी सर्वांची तयारी आहे. या एका विषयावर सर्व मंडळांनी वज्रमुठ केली तरी फार मोठी ताकद निर्माण होईल. शहराच्या विकासात लोकांचा हातभार लागेल. एक सकारात्मक दिशा मिळेल.

नदी प्रदूषण कसे होते?
शहरात नोंदणीकृत दीड हजार आणि कोणताही परवाना नसलेली सुमारे दोन हजारावर लहान गणेश मंडळे गल्लीबोळात आहेत. पाच लाखांवर कुटुंबांपैकी किमान दोन लाख घरांतून घरगुती मूर्ती प्रतिष्ठापना होते. दहा दिवस मूर्तीची हरळीची जुडी, हार फुलांनी षोडशोपचारे पूजा होते. अर्धेअधिक भक्त सत्यनारायण घालतात. उत्सवाच्या शेवटी मूर्तीसह सर्व निर्माल्य नदीत विसर्जित करण्याची प्रथा आहे. पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या, तलाव, विहिरींतून मूर्ती विसर्जित होतात. नव्वद टक्के मूर्ती प्लॅस्टरच्या असल्याने त्या विसर्जित होतच नाहीत. मूर्तीचे रासायनिक रंग पाण्यात विरघळतात. निर्माल्य पाण्यावर तरंगते, कालांतराने कुजते. उथळ पाण्यात या मूर्ती पात्रातच थबकतात, अनेकदा तुटतात, फुटतात. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीचे पवनेच्या पात्रातील दृष्य अक्षरशः बघवत नाही. पात्राच्या प्रदूषणापेक्षाही धार्मिक भावनेला इथे मोठी ठेच पोचते. दुसरे म्हणजे आजही शहरातील असंख्य गटारांचे सांडपाणी थेट नदीत मिसळल्याने आधीच या नदीचे महागटार झालेले आहे. अशा पाण्यात मूर्तींचे विसर्जन करणे हेसुद्धा मनाला पटत नाही. या दोन्ही मुद्यांचा विचार करता नदीत विसर्जन करणे टाळले पाहिजे. निर्माल्य दान केले तर अधिक उचित होईल. आजच्या पिढीला हे पटले म्हणून त्यांनी हा बदल स्वीकारला. हे परिवर्तन आहे, ते शंभर टक्के झाले पाहिजे.

मूर्तिदान चळवळीला प्रतिसाद 
नदी प्रदूषणावर मात करण्यासाठी २२ वर्षांपूर्वी मूर्तिदान ही संकल्पना पुढे आली. सुरवातीला कडवा विरोध झाला. मात्र, आज लोक स्वतःहून मूर्तिदान करतात. हा बदल काळाशी सुसंगत आहे. संस्कार प्रतिष्ठान, टाटा मोटर्सचे कर्मचारी, पर्यावरणप्रेमी असे सर्व मिळून ३५० वर कार्यकर्ते त्यासाठी दिवसरात्र राबतात. महापालिकेची यंत्रणा वाहन उपलब्ध करून देते. आता घरगुतीबरोबरच मंडळाच्या मोठ्या मूर्तीसुद्धा दान केल्या जातात. त्या सर्व एका ट्रकमधून वाकडच्या दगडी खाणीत अगदी विधिवत विसर्जित करण्याचे काम हे कार्यकर्ते करतात. गतवर्षी हे मूर्तिदान २५ हजारांवर गेले  होते. त्याशिवाय अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी नदीपात्रात भंगलेल्या अशा दहा हजारांवर मूर्ती या कार्यकर्त्यांनी बाहेर काढून खाणीत विसर्जित केल्या. या मंडळींच्या पाठीशी तमाम गणेशभक्तांनी, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी उभे राहिले पाहिजे. सर्व मंडळांचे  दोन-दोन कार्यकर्ते या कामासाठी जोडले तरी पवनामाई निर्मळ राहील, मोकळा श्‍वास घेईल. 

महापालिकेचीही तितकीच जबाबदारी -
नदी प्रदूषणाला फक्त गणेशोत्सव कारणीभूत होत नाही. सर्वांत मोठे प्रदूषण कोण करते तर महापालिका आणि उद्योग. नदीचे गटार होण्यास सर्वथा ते जबाबदार आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त नोटीस देऊन गप्प बसते. या संस्थांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. सर्व गणेशभक्तांनी यानिमित्ताने त्याचाही सोक्षमोक्ष लावला पाहिजे. प्रश्‍न आरोग्याचा आहे आणि भावनेचाही आहे. शहरात रोज ४५० दशलक्ष लीटर पाणी महापालिका वितरित करते. एमआयडीसीचे २०० दशलक्ष लीटर पाणी उद्योगांना मिळते. यातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यापैकी पालिकेचे ७० टक्के पाणी प्रक्रिया करून नदीत सोडले जाते. एमआयडीसीचे सुमारे ७५ टक्के रसायनमिश्रीत सांडपाणी थेट नाल्यातून नदीत मिसळते. दौंड शहराला हेच सांडपाणी प्यावे लागते म्हणून १५ कोटी रुपयांचा दंड हा दोन्ही महापालिकांना द्यावा लागला. नदीत कुठे-कुठे सांडपाणी मिसळते, शौचालयांचे पाणी कोणत्या नाल्यांतून नदीत जाते याचा शोध घेऊन कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांचे कान धरले पाहिजे. मंडळांचे सर्व गणेशभक्त, संस्कार प्रतिष्ठान, इंद्रायणी सेवा संघ, शहरातील सर्व पर्यावरणप्रेमींनी मनावर घेतले तरी पुरे....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com