"ड्रोन कॅमेरा'च्या वापरासाठी सात दिवस पूर्वपरवानगी हवी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 August 2017

पुणे - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर छायाचित्रणासाठी व्यावसायिक, खासगी व्यक्ती, गणेश मंडळे किंवा संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर "ड्रोन कॅमेरे' वापरले जातात; परंतु त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित पोलिस ठाण्याची सात दिवस अगोदर लेखी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे; अन्यथा दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

पुणे - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर छायाचित्रणासाठी व्यावसायिक, खासगी व्यक्ती, गणेश मंडळे किंवा संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर "ड्रोन कॅमेरे' वापरले जातात; परंतु त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित पोलिस ठाण्याची सात दिवस अगोदर लेखी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे; अन्यथा दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वास्तू, धार्मिक स्थळे तसेच केंद्रीय संस्था शहराच्या मध्यवर्ती तसेच लगत आहेत. सुरक्षितता आणि खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस प्रशासनाकडून "पुणे जिल्हा ग्रामीण फौजदारी संहिता 1973'च्या कलम 144 नुसार प्रतिबंध आदेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान, कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा व्यावसायिकांना ड्रोन कॅमेरे वापरापूर्वी सात दिवस अगोदर ज्या त्या स्थानिक पोलिस ठाण्याची लेखी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी सात दिवस अगोदर पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या संदर्भात पोलिस प्रशासनाला लेखी आदेश देण्यात आले आहेत. 

या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र मुठे म्हणाले,""जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ड्रोन कॅमेरे वापरण्यापूर्वी लेखी अर्ज स्वीकारले जातात. ते सर्व अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पोलिस आयुक्तालयाकडे पाठविण्यात येतात. ज्या त्या पोलिस ठाण्यामध्ये संबंधितांनी सात दिवस अगोदर पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे; अन्यथा दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.'' 

पोलिस प्रशासनापुढे आव्हान 
गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गणेश मंडळे, व्यावसायिक छायाचित्रकार, संस्था किंवा व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी लेखी पूर्वपरवानगी देण्याशिवाय अनधिकृत ड्रोन कॅमेरे शोधण्याची स्वतंत्र यंत्रणा पोलिस प्रशासनाकडे नाही. त्यामुळे आकाशामध्ये झेपावणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यांपैकी अधिकृत किंवा अनधिकृत कोणते हे शोधणे पोलिस प्रशासनापुढे आव्हान असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 pune ganesh ustav Drone camera