Ganesh Festival : सेलिब्रिटींचा पर्यावरणपूरक बाप्पा...

अरुण सुर्वे
Friday, 14 September 2018

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटी आपल्या घरी गणेशोत्सव साजरा करीत आहेत. काय म्हणताहेत याबद्दल रुपेरी पडद्यावरील तारका...

सायली संजीव (परफेक्‍ट पती) - गणेश चतुर्थी माझ्यासाठी नेहमीच स्पेशल राहिली आहे. आम्ही घरी नेहमीच शाडूच्या मातीचा गणपती आणायचो, कारण ही पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती असते. इतकंच नव्हे तर मला सजावटसुद्धा पर्यावरणपूरकच हवी असते. मला मातीचे दिवे लावायला खूप आवडतं. थोडक्‍यात जितकं साधं तितकं सगळं करायला आवडतं. यंदाही आमच्या घरी जवळचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांबरोबर पूजा करणार आहे. मला कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी प्रार्थना बाप्पाजवळ करायची आहे.

हृता दुर्गुळे (फुलपाखरू) - आमच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. या निमित्तानं सर्व भावंडं आणि नातेवाईक घरी जमतात. या दोन दिवसांमध्ये सर्व जण आपापली कामं बाजूला ठेवतात. सगळ्यांचीच भेट होते. आमच्या घरी लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली गणेशमूर्ती आणली जाते. गणेशात्सवातली खास गोष्ट म्हणजे माझा जन्म गणेशोत्सवादरम्यानचाच असल्यानं जवळपास प्रत्येक वर्षीचा गणेशोत्सव माझ्यासाठी खास असतो.

शुभांगी अत्रे (भाभीजी घर पर है) - मी जरा जास्तच आध्यात्मिक आहे. गणेशोत्सवात मी उपवास करते किंवा माझ्यातील नकारात्मक सवयी काढून टाकण्याचे गणेशाला वचन देते. अनेक जण गणपती विसर्जनाची परंपरा मानतात, परंतु मला वाटतं आपण अशा प्रकारे सण साजरा केल्यानं प्रदूषण होतं. त्यासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापन करून प्रदूषण कमी करू शकतो आणि भविष्यातील पिढीला वेगळा आणि सकारात्मक संदेश देऊ शकतो. माझ्या आयुष्यातील योग्य निर्णय घेण्यासाठी बाप्पा मला मदत करतो.

सौम्या टंडन (भाभीजी घर पर है) - आमच्याकडे गणपती बाप्पा असतो, पण आम्ही त्याचं विसर्जन करत नाही. कारण, गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे पाणी प्रदूषण होतं, त्यामुळे मी विसर्जनाच्या ठाम विरोधात आहे. मला वाटतं की, सण शांतपणे साजरे व्हायला हवेत. आपल्यामुळं इतरांना त्रास होऊ न देणं म्हणजेच खऱ्या अर्थाने सण साजरा करणं होय. गणेशोत्सवानिमित्त आम्ही घर सजवतो आणि गोडधोड पदार्थही करतो. मला गणेश चतुर्थी अशीच साजरी करायला आवडते.

फरनाझ शेट्टी (सिद्धिविनायक) - गणेशोत्सव हा अतिशय सुंदर आणि आपुलकीचा सण आहे. त्यामुळं संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. गणरायाची मी नेहमीच पूजा करते. मला सातत्यपूर्ण यशही मिळतं. मला खात्री आहे की आपण गणपतीच्या कानात आपली इच्छा व्यक्त केली की ती खऱ्या आयुष्यात नक्कीच पूर्ण होते. भाविकांनी हा सण कुणालाही त्रास होणार नाही, अशा प्रकारे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा.

समृद्धी केळकर (लक्ष्मी सदैव मंगलम) - मला आवडणाऱ्या उत्सवांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव. आमच्याकडे गणरायाची प्रतिष्ठापना करत नाहीत. मात्र, आत्या व मावशीकडे जाऊन मी बाप्पाच्या आगमनाची तयारी करते. मी नेहमीच बाप्पा आले की, त्यांच्यासमोर कथक सादर करते. एका अर्थाने हा नमस्कारच असतो. आपण सर्वांनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करावेत.

भाग्यश्री लिमये (घाडगे अँड सून) - गणेशोत्सव म्हणजे माझ्यासाठी उत्साहाला उधाण आणणारा, समाजाभिमुख करणारा सण. आमच्या कॉलनीत आम्ही गणपती बसवायचो. रात्री गणपतीच्या आरतीला झांज वाजवायला मला खूप आवडायचं. रात्री आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटायचा आणि उरलेला प्रसाद सर्वांच्या घरी द्यायचं काम आम्हा छोट्या मंडळींवर असायचं. हे काम केल्याबद्दल आम्हाला दुप्पट प्रसाद मिळायचा. आमच्या घरी पाच दिवसांचा गणपती असतो.

हर्षदा खानविलकर  (नवरा असावा तर असा) - माझं आणि बाप्पाचं खूप खास नात आहे, असं मी समजते. मला असं वाटत की, त्याचंदेखील माझ्यावर प्रेम आहे. माझ्या वडिलांची गणरायावर खूप श्रद्धा होती. माझा स्वभाव खूप श्रद्धाळू आहे. माझ्या घरात बरेच छोटे मोठे गणपती आहेत, जे मला भेट म्हणून मिळाले आहेत. दर वेळी मला कोणी ना कोणी भेट म्हणून गणपतीची मूर्तीच देतं. त्यामुळं मला वाटतं की, माझी आणि गणपतीची मैत्री आहे आणि मी त्याला माझा खूप मोठा आधार मानते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival celebrity ganpati celebration