Ganesh Festival : बांबूच्या वस्तूंपासून गणेशाची आरास 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 September 2018

रत्नागिरी - प्लास्टिकला बांबूच्या वस्तूंचा पर्याय ठरू शकतो, असा संदेश देणारा देखावा धनावडेवाडी (कारवांचीवाडी) येथील संजय व गणेश धनावडे यांनी साकारला आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलवरील बंदीमुळे पर्यावरण पूरक असा हा देखावा सर्वांसाठी आदर्शवत आहे. 

रत्नागिरी - प्लास्टिकला बांबूच्या वस्तूंचा पर्याय ठरू शकतो, असा संदेश देणारा देखावा धनावडेवाडी (कारवांचीवाडी) येथील संजय व गणेश धनावडे यांनी साकारला आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलवरील बंदीमुळे पर्यावरण पूरक असा हा देखावा सर्वांसाठी आदर्शवत आहे. 

गणेशोत्सव साजरा करतानाच सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोचावेत अशी ओळख धनावडे कुटुंबीयांची आहे. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय शासनाने घेतला. प्लास्टिक बंदी केली. मात्र त्याला पर्याय काय हे या संदेशातून सुचविले आहे. गावागावात आढळणारा बांबू हा दुर्लक्षितच आहे. त्यापासून तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू दैनंदिन वापरासाठी उपयुक्‍त ठरतात. यामधून स्थानिक लोकांना रोजगाराचेही साधन निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने शासनाने बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले आहे. घरात वापराची भांडी, खुर्च्या प्लास्टिकच्या असतात. त्याऐवजी बांबूच्या वस्तूंचा वापर करता येतो, हे देखाव्यात दिसते. 

यासाठी धनावडेंनी 35 बाबूंचा वापर केला आहे. बाबू लागवड, रोवळी, सूप, डोलारे, टोपल्या, फुलदाणी, रोवळी, आंबे काढण्याचे घळ, ईरले, गुढीसाठीचे चित्र, बांबूचा वापर केलेल्या झोपड्या, मासे व खेकडे पकडण्यासाठीचे कोयनी, बाक व पलंग या वस्तू ठेवल्या असून त्याचा उपयोग दर्शविणारे फलक लावले आहेत. बांबूची लागवड कशी करावी,याची माहितीही दिली आहे. थर्माकोलवरील बंदीमुळे गणपतीच्या मखरासाठी पर्याय म्हणून त्यांनी बांबूच्या वस्तू वापरल्या आहेत. 

गेली बारा वर्षे सतत काही ना काही सामाजिक संदेश धनावडे कुटुंबीय गणेशोत्सवाच्या माध्यमातून देत आहेत. यावर्षी प्लास्टिक बंदीला पर्याय दर्शविणारा हा उपक्रम लोकांना माहिती देणारा आहे.
- तानाजी कुळ्ये

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival decoration made from Bamboo