Ganesh Festival :करड्याळ, अर्जुनवाड्यात चारशे वर्षापूर्वीची ‘नाल’ची प्रथा कायम

प्रकाश कोकितकर
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

सेनापती कापशी - अर्जुववाडा व करड्याळ (ता. कागल) येथे गणेशोत्सवात चिकोत्रा नदी पात्रात जाऊन एकमेकांवर पाणी मारुन वाद घालण्याची प्रथा आहे. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे नदी पात्रात पुरेसे पाणी असल्याने मोठ्या उत्साहात ही प्रथा पार पडली. गतवर्षी पाणी टंचाईमुळे डबक्यातील पाणी मारुन येथील सुमारे चारशे वर्षाची परंपरा कायम राखली होती.

अर्जुनवाडा व करड्याळ चिकोत्रा नदीपात्राच्या परस्पर विरुद्ध बाजूला आहेत. या दोन गावातील महिला दरवर्षी गौरी विसर्जनावेळी मोठ्या संख्येने दोन्ही बाजूने पात्रात उतरतात. गौरींचे विसर्जन करुन लिंगड, करंजीचे डहाळे हातात घेऊन समोरच्या महिलांवर पाणी मारतात. पाण्यावर लाथा मारुन, प्रसंगी अपशब्द वापरुन एकमेकींबद्दल राग व्यक्त करतात.

‘अल्याड गौरी धुणं धुते, पल्याड शंकर नाल गं’ अशा गीतांतून राग व्यक्त केला जातो. हा सुमारे तासभर कार्यक्रम चालतो. त्यानंतर दोन्ही बाजूने प्रतिष्ठित व्यक्ती त्यांना बाजूला करुन घरी पाठवितात. यावर्षी नदी पात्रात चांगले पाणी असल्याने महिलांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाल साजरा केला.

या प्रथेतून राग कमी होतो. करड्याळ व अर्जुनवाडा ही शेजारील गावे आहेत. मध्ये केवळ चिकोत्राचे पात्र. या प्रथेमुळे एकमेकांबद्दलचा राग, द्वेष, मत्सर येथेच व्यक्त होतो. त्यामुळे त्याची तीव्रता कमी होऊन  त्यानंतर दोन्ही गावे गुण्यागोविंदाने राहतात. अशी येथील सुमारे चारशे वर्षापूर्वीपासूनची प्रथा आहे. त्यासाठी दोन्ही बाजूने पात्रावर गावेच जमा होतात.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival nal tradition in Arjunwada, Kardyal