ढोलांचा दणदणाट अन्‌ हलगीचा कडकडाट! 

ढोलांचा दणदणाट अन्‌ हलगीचा कडकडाट! 

सातारा - एक ठेका पडला अन्‌ ढोल-ताशाच्या वादनाचा जल्लोष सुरू झाला... विसर्जन मिरवणुकी जशी पुढे सरकत होती, तसा हा नाद बहरत गेला... ढोल-ताशांच्या वैशिष्ट्यपूर्ण वादनाबरोबर हलगीच्या कडकडाटाने भाविकांची मने जिंकली अन्‌ त्या तालावर तरुणाई थिरकतच राहिली. सलग 13 तासांच्या मिरवणुकीनंतर सातारकरांनी लाडक्‍या गणरायाला निरोप दिला. पारंपरिक वाद्यांचा वापर व महिलांचा लक्षणीय सहभाग ही मिरवणुकीची वैशिष्ट्ये ठरली. आज सकाळी सातपर्यंत बुधवार नाक्‍यावरील कृत्रिम तळ्यात 73 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले होते. 

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते पालिकेच्या श्री गणेशाचे पूजन झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्या वेळी नगराध्यक्षा माधवी कदम, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, मुख्याधिकारी शंकर गोरे, नगरसेविका लता पवार आदी उपस्थित होते. गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली. श्री शिवाजी उदय मंडळाने पालखीतून गणेशाची मिरवणूक काढली. निरीक्षण गृहातील मुला- मुलींनी लेझीमचे सादरीकरण केले. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक पुढे सरकत होती. शनिवार पेठेतील मानाच्या श्री शंकर पार्वती गणपतीच्या मिरवणुकीचा प्रारंभ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाला. राजपथावर सातारा पालिका, नगर विकास आघाडी, भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने मंडळांचे स्वागत करण्यात येत होते. पालिकेच्या व्यासपीठावर नगराध्यक्षा कदम, नगर विकास आघाडीच्या व्यासपीठावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपच्या व्यासपीठावर भाजपचे नगरसेविक, नगरसेविका तसेच पदाधिकारी हे मंडळांच्या कार्यकर्त्यांना सन्मानचिन्ह देत होते. 

रात्री नऊनंतर एकेक मंडळांच्या गणेशमूर्ती राजपथवार आल्या. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी झाली होती. रात्री बारानंतर मंडळांनी ढोल-ताशांचा गजर थांबविला. त्यानंतर एकेक मंडळ मुख्य मिरवणूक मार्गावरून बुधवार नाक्‍यावरील कृत्रिम तळ्याकडे मार्गस्थ होत होती. तळ्यावर घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी पायाड उभे केले होते, तर मंडळांच्या मूर्ती क्रेनच्या साह्याने विसर्जित केल्या जात होत्या. आज सकाळी सात वाजता श्री शंकर पार्वती गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीची सांगता झाली. 

विसर्जन मिरवणुकीतील वैशिष्ट्ये 
 मुख्य मिरवणुकीत युवती आणि महिलांचा लक्षणीय सहभाग 
 बेंजोचे पुनरुज्जीवन, 90 च्या दशकातील गाण्यांच्या ठेक्‍यावर थिरकली तरुणाई 
 स्वाइन फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांसह नागरिकांकडून मास्कचा वापर 
 मिरवणुकीत हलगी पथकांची संख्या लक्षणीय 
 मोठ्या उंचीच्या गणेशमूर्तींमुळे तळ्यावर विसर्जन धिम्म्या गतीने 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com