नव्या करामुळे गणेशमूर्तींची दरवाढ

शंकर भोसले
Monday, 21 August 2017

सांगली - देशात वस्तू व सेवाकर लागू झाल्याचा परिणाम यंदा गणेशोत्सवावर झाला आहे. मूर्तींसाठी लागणारे प्लास्टर आणि रंगांवर 28 टक्के कर लागू करण्यात आला आहे. परिणामी, मूर्तींच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. गावोगावी गणेशमूर्ती पोचल्या असून, छानशी मूर्ती निवडून ती आपल्या नावे निश्‍चित करण्यासाठी भक्तांची गडबड सुरू झाली आहे. 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आकर्षक मूर्ती बनविण्याचे आणि त्यांना रंग देण्याच्या कामाला वेग आला आहे. बाप्पा सुबक आणि आकर्षक व्हावेत, यासाठी मूर्तिकार प्राण ओतून काम करीत आहेत. आतापर्यंत 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. मोठ्या मूर्तींवर शेवटचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे. यंदा लालबागचा राजा, बाहुबली, दगडूशेठ, विष्णू आसन, बालगणेश, गरुडावर विराजमान, बालाजी रूप, शिव रूप, साईरूप, बाजीराव प्रतिमा आदी गणेशमूर्ती आकर्षक आहेत. 

मूर्ती खरेदी करताना दरात मात्र चांगलीच वाढ झाल्याचे ग्राहकांच्या लक्षात येत आहे. त्यामागे रंग, प्लास्टरवरील करवाढीचा परिणाम असल्याचे मूर्तिकार व विक्रेते समजावून सांगत आहेत. मूर्ती दरातील वाढ 15 ते 25 टक्के आहे. मूर्तिकार मोहन पेंडसे म्हणाले, की 20 किलो प्लास्टर ऑफ पॅरिस 160 वरून 190 रुपयांवर पोचले आहे. रंगांच्या दरात 30 टक्के वाढ झाली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पाच फुटी मूर्तींचे दर 5500 ते 6000 वरून 7500 रुपयांवर गेले आहेत. शाडू मूर्तींचे दर स्थिर आहेत. त्या 351 रुपयांपासून उपलब्ध आहेत. 

गेल्या वर्षी जय मल्हार रूपातील गणेशमूर्तींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यंदा ग्राहकांनी "बाहुबली' आणि बाल रूपातील गणेशमूर्तींना पसंती दिली आहे. पहिल्या टप्प्यात नोंदणीत या मूर्ती अधिक पसंतीस उतरल्याचे लक्षात येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: miraj news ganesh festival ganeshotsav